जामनेर : सोशल डिस्टन्सचे पालन : मोहाडी येथे संपन्न झाला आदर्श विवाह !

jalgaon-digital
2 Min Read

मोहाडी, ता.जामनेर –

गेल्या दीड दोन महिन्यापासून देशभरात कोरोनाचा संसर्ग जोमाने फैलावत आहे. सर्व सामाजिक कार्यक्रम किंवा कोणतीही गर्दी असणारे कार्यक्रम रद्द झालेले आहेत. करोनाची भीती आणि जनतेतील जागरूकता या दोन्ही गोष्टी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यास कारणीभूत आहेत. ऐन लग्न सीझनमध्ये करोनाने आपले आक्रमण केल्यामुळे अनेकांचे व्यापार-धंदे कोलमडले आहेत.

यात कापड व्यापारी, सोने-चांदी व्यापारी, केटरर्स, ब्युटी पार्लर, टेंट हाऊस, साऊंड सिस्टीम, इव्हेंट मॅनेजमेंट, ब्राम्हण, न्हावी अशा सर्वांच्या धंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. खुप धडाक्यात आणि आनंदाच्या थाटात आपल्या पाल्याचे लग्न लावण्याचे स्वप्न बघणाऱ्या आई-वडिलांच्या स्वप्नांवर सुद्धा कोरोनाने पाणी फिरविले आहे.

या सगळ्या गोष्टींना फाटा देत मोहाडी (ता.जामनेर) येथे दि.५ मे रोजी चक्क पाच लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला, जो एक आदर्श म्हणावा लागेल.

मोहाडी येथील शेतकरी प्रभाकर आत्माराम पाटील यांचे सुपुत्र किरण व कुऱ्हे पानाचे येथील शेतकरी बाळकृष्ण बाबुराव पवार यांची सुकन्या जयश्री यांचा शुभमंगल विवाह मोहाडी येथे मुलाच्या घरी अगदी साध्या पद्धतीने आणि फक्त वधू-वर, त्यांचे मामा आणि ब्राम्हणाच्या साक्षीने पार पडला.

किरणचा विवाह दि.५ एप्रिल रोजी थाटात संपन्न होणार होता, पण कोरोनाया महामारीमुळे जगासहित अख्ख्या भारत देश झुंजत आहे. हे संकट किती काळ सुरू राहील हे कुणालाही सांगणे शक्य नाही. शेकडो हजारो विवाह आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक कुटुंबांच्या आनंदावर यामुळे विरजण पडले आहे.

अशावेळी मोहाडी गावचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रभाकर पाटील यांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून आणि सोशल डिस्टन्सचे पूर्ण पालन आपल्या चिरंजीवाचा विवाह अल्प संख्येत का होईना साजरा करून समाजात एक आदर्श घालून दिला आहे.

याबाबत मोहाडी गावचे सुपुत्र प्रा.शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अशाच पद्धतीने विवाह संपन्न होत राहिलेत तर कोणताही शेतकरी आत्महत्या करणार नाही. कारण आपल्या मुला-मुलींसाठीच्या शिक्षणापासून ते त्यांच्या विवाहापर्यंत खर्च करुनच आई-वडील कर्ज बाजारी होत असतात.

हा विवाह नक्कीच आदर्श विवाह म्हणून ओळखला जाईल. माजी मंत्री गिरीष महाजन, रतनलाल सी.बाफना ज्वेलर्सच्या जनसंपर्क अधिकारी मनोहर पाटील व मोहाडीसह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी या विवाहाचे कौतुक करून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *