जळगाव | प्रतिनिधी
शहरातील अयोध्यानगरातील महादेव मंदिर परिसरातील रहिवासी व तहसील कार्यालया जवळील वेंडर दीपक लक्ष्मण पाटील (वय ४२) यांनी आज दि.१८ रोजी सकाळी ८ वाजेपूर्वी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
याबाबत दीपक पाटील यांचे लहान भाऊ चंद्रकांत लक्ष्मण पाटील यांनी खबर दिली. दुमजली इमारतीत चंद्रकांत पाटील हे वरील मजल्यावर, तर दीपक पाटील हे तळमजल्यावर कुटुंबासह राहत होते. दीपक पाटील यांची पत्नी व दोन मुले शहापूर (ता.जामनेर) येथे १७ एप्रिलपासून गेले होते.
दीपक पाटील यांच्या सासूचे कॅन्सरचे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांची पत्नी माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे दीपक पाटील हे घरात एकटेच होते. ते नेहमीच विचार करीत होते. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये राहायचे, असे त्यांचे बंधू चंद्रकांत पाटील यांनी खबरमध्ये म्हटले आहे.
घरात दीपक पाटील एकटेच असल्याने त्यांना चहा देण्यासाठी चंद्रकांत पाटील सकाळी ८ वाजेच्या सुमारास गेले. दरवाजा बंद होता. आवाज देवूनही घरातून प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून जाळीतून हात टाकून दरवाजा उघडला आणि चंद्रकात पाटील यांच्यासह त्यांच्या वडिलांनी घरात प्रवेश केला.
दीपक पाटील यांनी गळफास घेवून दोरी तुटली होती. त्यामुळे ते खाली पडून डोक्यास जखम होऊन रक्त निघाले होते. या वेळी दीपक पाटील यांचा मृत्यू झालेला होता. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.