Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

अखेर त्या शाखाधिकार्‍याची झाली उचलबांगडी

Share

महाराष्ट्र बँक मुख्य शाखा पुणे व जिल्हा प्रबंधक अहमदनगर यांच्याकडे केलेल्या तक्रारीची दखल

टाकळीभान (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी पदावर कार्यरत असलेले शाखाधिकारी ग्राहकांची अडवणूक करून अरेरावी करीत असल्याने शाखाधिकार्‍याच्या मनमानी कारभाराने त्रस्त झालेल्या ग्राहकांनी पत्रकारांकडे धाव घेत कैफियत मांडली होती. त्यामुळे माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशीही शाखाधिकार्‍याने अरेरावी केल्याने याबाबतची तक्रार थेट वरिष्ठांकडे करण्यात आली होती. वरिष्ठांनी ग्राहकहिताचा निर्णय घेत त्या शाखाधिकार्‍याची उचलबांगडी करून नवीन शाखाधिकार्‍याची नेमणूक नुकतीच केली आहे.

टाकळीभान येथे सुमारे तीस वर्षांपासून बँक आफ महाराष्ट्रची शाखा कार्यरत आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्वभागासह नेवासा तालुक्यातील व औरंगाबाद जिल्ह्याच्या गोदा तिरावरील अनेक गावांचा या शाखेशी जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झालेला आहे. त्यामुळे या शाखेत मोठे आर्थिक व्यवहारही सुरू असतात. आतापर्यंत या शाखेत कामकाज केलेल्या सर्वच कर्मचार्‍यांनी ग्राहकांशी जिव्हाळा जपलेला आहे. मात्र गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वी या शाखेत नव्याने रुजू झालेले शाखाधिकारी यांनी या जिव्हाळ्याला छेद देण्याचे काम सुरू केले होते.

ग्राहकांशी अरेरावी व सेवा देण्यास दिरंगाई होत असल्याने ग्राहकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत होता. आपल्याच बँक खात्यातील पैसे काढण्यास दोन-तीन तासांचा वेळ खर्च करावा लागत होता. तर कधी कधी बँकेत पैसे शिल्लक नसल्याने हात हलवत परत जावे लागत होते. गेली चार पाच महिने ग्राहक हा प्रकार सहन करीत होते. मात्र कामकाजात सुधारणाच होत नसल्याने असंख्य ग्राहकांनी येथील पत्रकारांकडे शाखाधिकार्‍याच्या मनमानी कारभारामुळे होणार्‍या त्रासाची कैफियत मांडली होती.

ग्राहकांच्या तक्रारीनुसार काही पत्रकार चौकशीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या येथील शाखा कार्यालयात दिवाळी सणापूर्वी 25 ऑक्टोबर रोजी गेले होते. त्यावेळी ग्राहकांची मोठी लांब रांग दिसून आल्याने ग्राहकांकडे चौकशी केली असता बँकेत पैसे शिल्लक नसल्याने रांगेत उभे असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळी सणासाठीही बँकेत पैशाचा तुटवडा असल्याने ग्राहक संताप व्यक्त करीत होते. याबाबत संबंधित शाखाधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी पत्रकार गेले असता शाखाधिकारी यांनी पत्रकारांनाही अरेरावीची भाषा वापरून पोलिसांत देण्याची धमकी दिली होती.

पत्रकार समजावण्याचा प्रयत्न करीत असतानाही शाखाधिकारी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पत्रकारांनी स्थानिक प्रतिष्ठीत नागरिकांना बोलावून शाखाधिकारी यांनी कामकाजात सुधारणा करून ग्राहकांना योग्य सेवा देण्याची मागणी केली. प्रतिष्ठीतांच्या सूचनेलाही त्यांनी वाटाण्याच्या अक्षदा दाखवत मनमानी कामकाज सुरुच ठेवले होते.

अखेर पत्रकार संघटना व ग्राहकांच्यावतीने 29 ऑक्टोबर रोजी मुख्य शाखा पुणे व जिल्हा प्रबंधक अहमदनगर यांच्याकडे शाखा व्यवस्थापकाच्या मनमानी कामकाजाची व त्यामुळे बँक व ग्राहक यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते संंपुष्टात येत असल्याची ऑनलाईन तक्रार दाखल केली होती.

वरिष्ठांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकाराची बँक शाखेत येऊन चौकशी केली होती. चौकशीसाठी आलेल्या प्रबंधकांनी या तक्रारीत तथ्य असल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला होता. त्यानुसार वरिष्ठांनी तातडीने निर्णय घेऊन शाखाधिकारी यांची उचलबांगडी केली आहे. याबाबतचा आदेश त्यांना प्राप्त झाला आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!