Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : ‘बम बम भोले’च्या गजरात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा

Share

नाशिक । गोकुळ पवार/गौरव परदेशी

‘श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ अशा निसर्गाच्या सान्निध्यात, चिखलाच्या वाटा तुडवत अन् बहरलेले निसर्गसौंदर्य न्याहाळत लाखो भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली. श्रावण म्हटला की आकाश निळा रंग पांघरते तर धरतीने हिरवा शालू नेसलेला असतो. यातच चाहूल लागते ती ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची.

श्रावण सुरू होताच सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. पहिल्या दोन सोमवारपेक्षा तिसर्‍या सोमवारी भाविकांची अलोट गर्दी दिसून येते. प्रदक्षिणेचा मार्ग सारखाच असल्याने भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. लाखो भाविक या प्रदक्षिणेला येतात.

तिसर्‍या प्रदक्षिणेसाठी जिल्ह्यातून तसेच राज्याबाहेरील भाविकांनीही हजेरी लावली. यामध्ये परभणी, बीड, लातूर तसेच मध्य प्रदेश येथील भाविक दाखल झाले होते. रविवारी मध्यरात्री बारा वाजेपासून कुशावर्तावरून प्रदक्षिणेला सुरुवात झाली. पुढे प्रयागतीर्थ (पेगलवाडी), पहिणे बारी, भिलमाळ, कोजुली या गावांवरून तेथे उजव्या हाताने वळण घेत गौतम ऋषी मंदिर (गौतमाचे मंदिर), तळेगाव धरण, सापगाव शिवार, गणपत बारीमार्गे एकूण पाच ते सहा तासांचे अंतर पार करत भाविकांनी पुन्हा त्र्यंबकेश्वर गाठले.

या प्रवासात ‘बम बम भोले’चा गजर मनाला भावून जातो. प्रदक्षिणेच्या वाटेवर ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवत पोलीस तैनात करण्यात आले होते. तळेगाव फाटा, तुपदेवी फाटा, पेगलवाडी, गणपतबारी, सापगाव शिवार या ठिकाणी पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती. भाविकांसाठी प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी मोफत चहा, फराळाची सोय सेवाभावी संस्थांनी केली होती. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी डस्टबिन ठेवण्यात आले होते. युवा प्रशिक्षण केंद्र, जय मातादी फाऊंडेशन यांच्यातर्फे भाविकांना लागणार्‍या औषधांची व्यवस्था करण्यात आली होती.

प्रदक्षिणा मार्गावर अबालवृद्धांसह तरुणांची संख्या अधिक दिसून आली. याचदरम्यान अनेक तरुण-तरुणी फेरीबरोबरच सेल्फी घेण्याचा आनंद लुटत होते, तर कुठे सहकुटुंब फोटो काढण्यात व्यस्त होते.


श्रावण सरींची हुलकावणी..

दरवर्षीप्रमाणे यंदा पाऊस नसल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. साधारण तिसर्‍या सोमवारी श्रावण सरींचे आगमन होते, परंतु यावेळी पावसाने दडी मारल्याने भाविकांचा हिरमोड झाल्याचे दिसले. काही भाविकांनी पाऊस येईल यामुळे छत्री, रेनकोटची व्यवस्था केली होती.


सलग पाचवी फेरी असून जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत फेरी करणार आहे. स्वतःला आनंद मिळवून देणारी ही प्रदक्षिणा असून माझ्या घरातील प्रत्येकाने ही प्रदक्षिणा पूर्ण केली आहे.
काशीबाई भोये, चिरापाली


दरवर्षी या फेरीसाठी येतो. पाऊस जास्त असल्याने यंदा भाविकांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर आहे. फेरीमुळे शरीराला आत्मिक आणि धार्मिक समाधान मिळते. जीवनात एकदा तरी ही प्रदक्षिणा करावी.
– अरुण चौधरी, शिर्डी


पहिलीच फेरी असून खूप छान अनुभव मिळाला. मला वाटले होते की मी फेरी पूर्ण करू शकणार नाही. परंतु हसतखेळत ही फेरी पूर्ण करत आहे. यापुढेही या प्रदक्षिणेला येणार आहे.
– सुनीता ढगे, ओझर


पहाटे फेरीला सुरुवात केल्याने ताणतणाव नाहीसा होतो. या मार्गावर प्रशासनाने ठिकठिकाणी कचरापेट्या उभाराव्यात आणि सार्वजनिक शौचालयाची सुविधा करावी, सूचना फलक लावावेत.
– नवनाथ भावनाथ, विल्होळी


पहाटे पाच वाजता फेरीला सुरुवात केली. गौतम ऋषीजवळचा रस्ता ठीक नसल्याने थोडा त्रास झाला. मागील वर्षीपेक्षा यंदा प्रशासनाने चांगल्या सुविधा केल्या आहेत. शरीर आणि मनाला फेरीद्वारे शांतता मिळते.
– रेश्मा रामसिंघानी, नाशिकरोड


निर्सगाच्या सान्निध्यात आंनद घेत फेरीचा आनंद लुटता आला. ही फेरी शारीरिक क्षमतेचा कस बघणारी असली तरी लोकांचा उत्साह पाहून आपल्याला होणारा त्रास विसरून फेरी पूर्ण होते.
– सनी त्रिभुवन, नाशिक


गौतम ऋषीजवळ चढ असल्याने पायर्‍या तयार कराव्यात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. भाविकांसाठी फराळाची तसेच महिलांना शौचालयाची सुविधा करणे आवश्यक आहे.
– मीनल ढगे, ओझर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!