बोरावके महाविद्यालयात 120 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

0

31 ऑगस्टपर्यंत तुकडीला मान्यता मिळाली नाही तर पालक उपोषण करणार

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – चालू शैक्षणिक वर्षातील सहामाई परीक्षा दोन महिन्यांवर ठेपलेली असताना बोरावके महाविद्यालयात विज्ञान शाखेतील 120 विद्यार्थी नवीन तुकडी येण्याची वाट पाहत आहेत. आपल्या पाल्याचे नवीन शैक्षणिक वर्षे वाया जाऊ नये म्हणून शेकडो पालक दररोज महाविद्यालयाचे उंबरठे झिजवत आहे.
बोरावके महाविद्यालयात बारावी (विज्ञान) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत. या 120 विद्यार्थ्यांना बीएससी साठी पहिल्या वर्गात प्रवेश पाहिजे. महाविद्यालयाने गुणानुक्रमाणे विद्यार्थी घेतलेले आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन तुकडीसाठी तातडीने प्रस्ताव पाठवावा, त्यात मंजुरी देऊ असे सांगितले आहे.
त्यानुसार महाविद्यालयाने प्रस्ताव पाठविला. मुंबई, पुणे, अहमदनगर येथील सर्व महाविद्यालयांनी पाठपुरावा केला पण अद्यापही परवानगी मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. शैक्षणिक वर्षाचा ऑगस्ट महिना उजाडला तरीही पालक नवीन तुकडीची मान्यता आली की नाही हे महाविद्यालयात येऊन विचारत आहे. जर शासनाकडून तुकडीची परवानगी आली नाही तर या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले असून हे सर्व विद्यार्थी 50 ते 60 टक्के गुण प्राप्त केलेले आहेत. बारावीचे शिक्षण याच बोरावके महाविद्यालयात घेतले त्या महाविद्यालयात पदवीच्या शिक्षणासाठी पुढील वर्गात प्रवेश मिळत नाही ही मोठी शोकांतीकाच आहे. 31 ऑगस्ट पर्यंत नवीन तुकडीची परवानगी मिळाली नाही.
तर हे 120 विद्यार्थी व पालक महाविद्यालयासमोर 1 सप्टेबर रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा पालक विजय सोपानराव उंडे, रावसाहेब भोसले, वाय. जी. बनकर, बाळासाहेब गुंजाळ, शिवाजी रक्टे, बाळासाहेब कदम, अनिल यादव, विजय बोर्डे, भालचंद कालंगडे, राजेंद्र झुराळे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*