Type to search

Featured सार्वमत

बोराटे यांच्या माफीसाठी महापालिकेत गोंधळ

Share

महापौरांवरील टीकेमुळे माफी नाट्यावर केवळ चर्चाच प्रेक्षक गॅलरीतूनही घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापौर बाबासाहेब वाकळे आणि शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यातील पातळी सोड़ून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांचे पडसाद मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेतही उमटले. प्रथम नागरिक असलेल्या महापौरांवर आरोप केल्याने बोराटे यांनी माफी मागावी म्हणून भाजप, राष्ट्रवादी आक्रमक झाली. महापालिकेची मंगळवारी दि. 25 जूनला अर्थसंकल्पीय सभा होती. सभा सुरू झाल्यानंतर ‘या सभेत अर्थसंकल्पावरच चर्चा होईल’ असे महापौर वाकळे यांनी स्पष्ट केले असतानाही सभागृहनेते स्वप्नील शिंदे यांनी माफीनाम्याचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले, ‘महापौर शहराचे प्रथम नागरिक असतात. त्यांच्याबद्दल बोराटे यांनी अपशब्द काढले. नागरिकांमध्ये यामुळे चुकीचा संदेश गेला. त्यामुळे बोराटे यांनी महापौरांची माफी मागावी’, शिंदे यांच्या या वक्तव्याला पाठिंबा देत राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांनीही बोराटे यांनी माफी मागण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले, ‘बोराटे यांनी जे पातळी सोडून आरोप केले, त्याचा आम्ही निषेध करतो. महापौरपदाच्या खुर्चीला मान आहे. महापौर शहराचा मान असतो.’ शिंदे व बारस्कर यांच्यानंतर बोराटे स्वतः उभे राहिले. ‘आरोपाची पहिली सुरूवात महापौरांकडून झाली. त्यांनी अगोदर माझी लायकी काढली. त्यामुळे अगोदर त्यांनी माफी मागावी, नंतर मी माफी मागतो.’

त्यांच्या या वक्तव्याने भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आणखी आक्रमक झाले. राहुल कांबळे यांनी तर माफी मागेपर्यंत सभागृह चालू न देण्याचा इशारा दिला. तर दिपाली बारस्कर, रवींद्र बारस्कर यांच्यासह काही नगरसेवकांनी माफी मागितलीच पाहिजे, असा आग्रह धरला. एवढा गोंधळ सुरू असताना महापौर मात्र ‘आपण सभागृहाचे कामकाज सुरू करू’ असे सांगत होते. राष्ट्रवादी आणि भाजपचे नगरसेवक मात्र ऐकत नव्हते. विशेषतः संपत बारस्कर अधिक आक्रमक होते.
विशेष म्हणजे ही सर्व चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नगरसेवक मात्र शांत होते. त्यांनी प्रतिउत्तर न देता शांत बसून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कटाला शह दिला. बोराटे यांच्यावर कठोर शब्दात टीका होत असताना स्वतः बोराटे आणि त्यांचे सर्व सहकार्‍यांनी शांतता धरणे पसंत केले. एवढेच नव्हे, तर प्रेक्षक गॅलरीत देखील वाकळे व राष्ट्रवादी समर्थक आलेले होते. त्यांनीही माफ़ी मागावी, अशा घोषणा दिल्या. तरीही शिवसेनेचे नगरसेवक शांत होते. अखेर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनी घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. मात्र हे सांगताना वाकळे यांनी पत्रकारांशी बोलतानाच जे शब्द वापरले, त्यामुळे एवढे सगळे घडल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. तसेच ‘जे घडले त्याबद्दल मी वैयक्तिक…’ असे म्हणत असतानाच संपत बारस्कर यांनी त्यांना अडवत, ‘तुम्ही माफी मागू नका, जे बोलले त्यांनी माफी मागावी’ असा पुन्हा आग्रह धरला. त्यानंतर महापौरांनीच मध्यस्थी करत ‘आपण सभेला सुरूवात करू’, असे सांगत विषयाला पुर्णविराम दिला.

दुःख राष्ट्रवादीलाच अधिक
शिवसेनेचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर केलेल्या टीकेचे दुःख भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच अधिक झाल्याचे सभेत दिसून आले. बोराटे यांचा निषेध करण्यापासून त्यांनी माफी मागावी यासाठी भाजपचे मोजके नगरसेवक वगळता सर्वाधिक आग्रह राष्ट्रवादीचाच होता. ‘बोराटे यांनी टीका करण्यापूर्वी आरशात पाहिले असते, तर आपली पात्रता त्यांना कळली असती’ अशा शब्दांत राष्ट्रवादीने बोराटे यांच्यावर हल्ला केला.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!