Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिवंगत अभिनेते इरफान खान यांचे ‘नाशिक कनेक्शन’; निवांतक्षणी नेहमी फार्म हाऊसवर यायचे

Share

नाशिक | प्रतिनिधी 

बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचे आज वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

नाशिकचे वातावरण सर्वांनाच भावलेले आपण बघितले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात सुट्टीचा दिवस जावा यासाठी अनेकजण विकेंड साजरी करायला नाशिक आणि परिसर गाठतात. वातावरण आल्हाददायक असल्यामुळे नाशिक सर्वांनाच हवेहवेसे वाटते. यात सेलीब्रेटीदेखील मागे नाहीत. अनेक कलाकारांचे नाशकात अलिशान घरे असून फावल्या वेळात ते नाशिकमध्ये फेरफटका मारत असतात.

अवघ्या ५४ व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या अभिनेते इरफान खान यांचेदेखील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत अलिशान फार्म हाऊस आहे. याठिकाणी इरफान खान हे नियमित सुट्टी साजरी करायला यायचे. इगतपुरीकरांनी या अनोख्या व्यक्तिमत्वाला त्रिंगलवाडी येथे अनेकदा बघितलेही होते.

तीन वर्षांपूर्वी इरफान यांच्यावर परदेशात अतिशय अवघड आणि क्लिष्ट शस्रक्रिया झाली होती. मार्च २०१७ मध्ये ही शस्रक्रिया झाल्यानंतर जवळपास सात महिन्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इरफान यांना मायदेशी जाण्याची परवानगी दिली.

यावेळी ऑक्टोबर महिना असल्यामुळे महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे इगतपुरी येथे पावसाची संततधार सुरु होती. याच काळात इरफान यांनी इतरत्र कुठे न जाता थेट इगतपुरी गाठत निसर्गसान्निध्यात वेळ व्यतीत करायला याठिकाणाला त्यांनी पसंती दिली होती. इरफान आपल्या कुटुंबीयांसोबत जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक काळ याठिकाणी आले होते.

यादरम्यान, दिवाळीदेखील याच फार्म हाऊसवर साजरी केली होती. मुंबई ते इगतपुरी अंतर अतिशय कमी वेळेत पार करता येते त्यामुळे याठिकाणी नियमित इरफान खान यांचा राबता असायचा अशी माहिती येथील एका माहितीगाराने ‘देशदूत’शी बोलताना दिली.

इगतपुरीतील सुट्टी साजरी केल्यानंतर इरफान खान यांनी हिंदी मेडियम या चित्रपटाच्या सिक्वलच्या शुटींगला देखील प्रारंभ केला होता. इरफान खान यांचे इगतपुरीतील फार्म हाऊस सात ते आठ एकरमध्ये अलिशान असे आहे. याठिकाणी पावसाची संततधार सुरु झाली की तलावाला बेटाचेच जणू स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे अधिक आकर्षक असे ते याकाळात दिसते. नाशिकमध्ये वास्तव्यास असलेला त्यांचा भाचा ह्या फार्म हाऊसवर इतर वेळी असतो.

इगतपुरीच्या मार्केटमध्ये आपली ४४४४ क्रमांकाची Land Cruser ही मध्यप्रदेश पासिंगची अलिशान कार घेऊन निसर्ग सौंदर्याचा आनंद इरफान कधी कधी घेत असे. तसेच इगतपुरीच्या मार्केटमध्येही इरफान खान बऱ्याचदा तोंड झाकून आलेला अनेकांना नजरेस पडला होता.

यावर्षीय इरफान खान जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात इगतपुरीत आल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने ‘देशदूत’ला दिली. एकूणच नाशिकचे वातावरण खूप आल्हाददायक आहे. त्यामुळे याठिकाणी नियमित सेलेब्रेटीचा राबता बघावयास मिळतो. आज अकाली एक्झिट घेतलेले इरफान खान देखील त्यास अपवाद राहिले नाहीत एवढे नक्की.

आमचे प्रतिनिधी प्रशांत निकाळे यांनी थेट त्रिंगलवाडी येथील दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या फार्महाऊसचे काही छायाचित्रे काढली आहेत

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!