कळसुबाईच्या पायथ्याशी…पांजरेत रंगला ‘बोहडा’

0

हजारो आदिवासी भाविकांची हजेरी; रात्रभर मुखवटे घालून सोंगे निघाली

अकोले/संगमनेर (प्रतिनिधी) – सनई…. तुतारी… तडामताशांच्या निनादात गणपती, सरस्वती, बजरंगबलीचे स्वागत….काळोखी रात्र…कडुलिंबाच्या पाल्यांनी दुतर्फा घातलेला मांडव….आबालवृद्धांसह मान्यवरांनी लावलेली हजेरी…निसर्गरम्य वातावरणात आदिवासी समाजाने पारंपरिक जपलेली कला म्हणजे ‘बोहडा’…कळसुबाई डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पांजरे गावात हजारोच्या उपस्थितीत आनंदाने हा उत्सव साजरा झाला. यानिमित्ताने दोन दिवस पांजरे गाव नटले होते…
सालाबादप्रमाणे यावर्षीही अकोले तालुक्यातील पश्‍चिम भागातील आदिवासी गावांमध्ये बोहडा हा उत्सव याहीवर्षी साजरा करण्यात आला. रविवार व सोमवारी पांजरे या गावात बोहडा उत्सव असल्याने आदिवासी समाजाने मोठी गर्दी केली होती. इतर भागांतील यात्रांप्रमाणेच आदिवासींचा बोहडा उत्सव वर्षातून एकदा उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळा सुरु होण्याच्या पूर्वी साजरा केला जातो. पांजरे, उडदावणे, शिंगणवाडी व घाटघर या गावांमध्ये हा साजरा होणारा उत्सव वैशिष्ट्ये सांगणारा आहे. या भागात ठाकर समाज जास्त असल्याने हा उत्सव दोन दिवस चालतो. पहिल्या दिवशी छोटा बोहडा व दुसर्‍या दिवशी मोठा बोहडा असे उत्सवाचे स्वरुप असते. बोहड्यामध्ये यात्रांप्रमाणेच विविध स्टॉल, खाद्यपदार्थ, खेळणी साहित्य, मिठाई दुकाने, रहाड गाडगे, लहान मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ यात्रेमध्ये असल्याने यात्रेला उत्साह भरतो.
रात्री 8 वाजेच्या सुमारास बोहडा उत्सवातील मुखवटे कार्यक्रमास सुरुवात झाली. महाभारत, रामायणामधील अनेक प्रसंग कलाकारांनी मुखवटे धारण करुन यावेळी सादर केले. संपूर्ण रात्रभर मुखवटे धारण केलेले सोंगे निघत होती. बघ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने उत्सवाला रंगत येत होती. हा बोहडा पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. बोहड्याबरोबर पर्यटकांनी काजवे पाहण्याचाही आनंद लुटला. बोहड्याचा उत्सव पाहण्यासाठी शेंडी, भंडारदरा, मुरशेत, घाटघर, साम्रद, रतनवाडी या भागातून आदिवासी बांधव सकाळपासून पायपीट करुन आले होते. बोहडा पाहण्यासाठी पुढची जागा मिळावी म्हणून काहींनी सकाळीच चादरी अंथरुन ठेवल्या होत्या. बोहड्यात विशेषतः तरुणांनीच सर्व सोंगे सादर केली.
बोहडा पाहण्यासाठी संगमनेरचे प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अजय देवरे, नाशिक एमटीडीसीचे उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, अकोले पंचायत समितीचे उपसभापती मारुती मेंगाळ, अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीपराव भांगरे, संगमनेर बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते संदीप डगळे, संजय मंडलिक, बोहडा कमिटी अध्यक्ष लक्ष्मण उघडे, शंकर उघडे, परशुराम मेंगाळ उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे बोहडा कार्यक्रमाला आदिवासी बांधवांनी हजेरी लावली. कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या पांजरे गावात देवीची यात्रा म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला जातो. रविवार, सोमवार या दोन दिवशी बोहडा असतो, मंगळवारी देवीची मिरवणूक काढण्यात येते. बोहड्यात प्रत्येक देवाचा मुखवटा केला जातो. आदिवासी भागातील देवांची पूजा करून मुखवटे दाखविले जातात, ही श्रद्धा आमच्या मनात आहे.
– भाऊराव उघडे, कलाकार

भंडारदरा पंचक्रोशीमध्ये पांजरे या गावात आदिवासी बांधवांची फार पुरातन लोककला आहे. बोहडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे भाविक जमले आहेत, जे यात्रेकरु जमले आहेत, त्यांना मी शुभेच्छा देतो,. मला आनंद आहे की, आपल्या आदिवासी बांधवांनी प्राचीन लोककला चांगल्या प्रकारे जतन करून ठेवली आहे.
– भागवत डोईफोडे, प्रांताधिकारी

‘बोहडा’ या कलेचा प्रसार होण्यासाठी फार लांबून आलेला आदिवासी बांधव या कार्यक्रमात आनंदाने सहभागी होताना दिसतोे. मनोरंजन आणि जागृती हे एकाच मंचावर या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. ही अतिशय चांगली प्रथा आहे.
– डॉ. अजय देवरे, डीवायएसपी, संगमनेर

LEAVE A REPLY

*