Tuesday, April 23, 2024
Homeनगर‘ब्लू मॉरमॉन’ नगरी निसर्गात

‘ब्लू मॉरमॉन’ नगरी निसर्गात

रानफुलांच्या 122 तर फुलपाखरांच्या 34 प्रजाती

अहमदनगर (प्रतिनिधी) – पर्यावरण मित्र संघटना आणि जिल्हा निसर्गप्रेमी,जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राने जिल्हाभरात केलेल्या सर्व्हेक्षणात ‘ब्लू मॉरमॉन’ प्रजातीचे राज्यस्तरीय फुलपाखर नगरी निसर्गात आढळून आले आहे. नगरच्या निर्सगात 122 रानफुलांच्या तर 34 फुलपाखरांच्या प्रजाती या सर्व्हेक्षणात आढळून आल्याची माहिती निर्सगप्रेमी जयराम सातपुते यांनी दिली.

- Advertisement -

नगरमध्ये दरवर्षी जिल्हाभर पावसाळी रानफुलांचे व फुलपाखरांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदीचे संकलन केले जाते. निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर हे जिल्हास्तरीय सर्वेक्षण करण्यात आले. 205 विद्यार्थ्यांनी हे सर्व्हेक्षण पूर्ण केले.

जिल्ह्यातील गर्भगीरी डोंगर रांगा, लहान मोठे तलाव व धरणांचा परिसर आदी निसर्गवैभव असलेल्या भागात हे सर्वेक्षण प्रामुख्याने करण्यात आले. त्यात 122 वैशिष्ट्यपुर्ण पावसाळी रानफुलांची नोंद झाली आहे. भारंगी, दुधाली, वायाटी, सोनकी, सोमवल्ली, रानजीरे, रत्नमाला, गणेशफुल, केनी, निलवंती, घाणेरी, पंद, तिळवण, कल्प, दहाण, तेरडा, नीसुरडी, घोडेगुई, झरवड, चिमनाटी, तुंबा, सोळन ही रानफुले मुख्यत्वे लक्षवेधी ठरत आहेत.

रानफुलांसोबतच फुलपाखरांच्या एकुण 34 प्रजातींची नोंद झाली. यावर्षी ब्लु मॉरमॉन नावाचे राज्यस्तरीय फुलपाखराची नोंद दोन ठिकाणी झाली आहे. टायगर, ब्लु पॅन्सी, रेड पायरट, कूपिड, लिपर्ड, जझबेल, ब्लुमून, ऑरेंज टिप, वॅडरर, इमिग्रंट या आकर्षक फुलपाखरांच्या नोंदीही झाल्या आहेत.

या संस्थेतील अभ्यासक सचिन चव्हाण, प्रतीम ढगे, संदिप राठोड, अनमोल होन, डॉ.अशोक कराळे, अजिंक्य सुपेकर, रूषीकेश परदेशी, पार्थ देवांग, नम्रता सातपुते, दीपा मव्हारे, श्लोक लोटके, संजय बोकंद, दिनेश कलोसिया, मंगलाराम, अनिता ससाणे, मुकुंद दहिफळे, रूषीकेश लांडे, सुधीर दरेकर, संदिप साकुरे, शिवकुमार वाघुंबरे, संतोष शिरसागर, देवेंद्र अंबेटकर, परमेश्वर भवर यांच्यासह जिल्हाभरातील 205 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील जैवविविधता वृद्धींगत करण्याच्या हेतुने निसर्गोपयोगी वनस्पतींच्या बीयांचे जाणीवपुर्वक संकलन व रोपणही सदस्यांमार्फत केले जाते.

जैवविविधता धोक्यात
लष्करी सैनिकांच्या वसतीगृहांभोवती सजावटीसाठी वापरल्या गेलेल्या टीथोनिया व कॉसमॉस सल्फ्युरिअर या रानझेंडु अथवा मेक्सिकन सुर्यफुल या मराठी नावाने ओळखल्या जाणार्‍या परदेशी तणसदृश वनस्पतींची गेल्या तीन वर्षात खुप अनियंञीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील स्थानिक जैवविविधता धोक्यात आल्याचेही या सर्वेक्षणातुन निदर्शनास आले आहे. दिसायला आकर्षक परंतु पर्यावरणास घातक असलेल्या या वनस्पतीवर नियंञण मिळवण्यासाठी प्रशासनाची मदतही घेतली जाणार असल्याची माहिती सातपुते यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या