स्पंदन : गर्जा महाराष्ट्र माझा...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांची खास ‘देशदूत’च्या वाचकांसाठी पाक्षीक ‘ स्पंदन ’ ब्लॉगमालिका...
स्पंदन : गर्जा महाराष्ट्र माझा...

एक मे. आपल्या राज्याचा स्थापना दिवस. लहानपणी फार आतुरतेने या दिवसाची वाट पाहायचो आपण. विशेषतः शालेय जीवनात. इयत्ता नववीपर्यंत. कारण याचं दिवशी परीक्षेचे निकाल जाहीर केले जायचे. तेव्हा मार्चच्या अखेरीस अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक परीक्षा संपायच्या.

एक मे रोजी परीक्षेचा निकाल लागेल असं सांगितलं जायचं. पण आमच्या शाळेत एक मे ला निकाल क्वचित जाहीर व्हायचा. मुलं मनात धाकधूक-भीती-उत्सुकता अशा संमिश्र भावना घेऊन शाळेत जायचे. महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण व्हायचं नि परीक्षेचा निकाल उद्या लागेल असं शाळेतून जाहीर केलं जायचं. परिणामी आम्ही हिरमुसले होऊन घरी परतायचो. काही शाळांमध्ये मात्र एक मे रोजीच निकाल जाहीर केला जायचा. आम्हांला मग अशा शाळांचा हेवा वाटायचा. का कोणास ठाऊक एरवी प्रिय वाटणारी, सगळ्यात उत्तम भासणारी शाळा यावेळी मात्र नावडती व्हायची. पण ही भावना तात्पुरतीच असायची. दिवसभर मग पुन्हा मनात तेच तेच विचार घर करत राहायचे. किती गुण मिळणार, टक्केवारी किती असेल, एखादा विषय राहून तर जाणार नाही ना? ( विशेषतः गणित. मला गणिताची फार भीती वाटायची. ) गणित विषय सोडला की बाकी सर्व विषयांची जराही भीती वाटायची नाही. अगदी विज्ञान आणि इंग्रजीची सुद्धा! उलट ह्या सर्व विषयांत वर्गात पहिल्या पाचात आपण यावर्षी वर्गात कितव्या क्रमांकावर असू याची उत्सुकता असायची. आणि व्हायचेही तसेच. गणितातल्या लो स्कोरिंगमुळे एकूण टक्केवारी बरीच खाली यायची. मग पहिल्या ऐवजी दुसऱ्या किंवा कधी-कधी तर तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागायचं. एकूण काय गणिताने कधी मला वर्गात पहिला येण्याचं सुख आणि आनंद मिळू दिला नाही ! ( मराठी, समाजिकशास्त्रे या विषयांत मात्र हा आनंद उपभोगता आला...)

त्याकाळात बहुतांशी मुले राज्य मंडळाच्या शाळेतच आणि मराठी माध्यमातूनच शिकायचे. गावात एखाद-दुसरी इंग्रजी माध्यमाची शाळा असायची. पण ती सुद्धा स्टेट बोर्डाचीच. इथं शिकणाऱ्या मुलांचा तेव्हा हेवा वाटायचा. त्यांचा शाळेचा युनिफॉर्म इतरांपेक्षा वेगळा असायचा. शिवाय त्यांच्या सदऱ्यावरचा ‘टाय’ पाहून ते कोणीतरी भारी आहेत असं वाटून जायचं. मला चांगलं आठवतं. माझे आई-वडिल मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकण्याचा विचार करत होते. इयता पहिलीत. पण कुठे माशी शिंकली कोणास ठाऊक. त्यांनी तो निर्णय बदलून मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं ( १९९२ मध्ये जेव्हा मी मुंबईच्या प्रख्यात Tata Institute of Social Sciences मध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी गेलो तेव्हा मात्र तिथल्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी ऐकून वडिलांना म्हणालो, तुम्ही पण मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला हवं होतं! )ते सुद्धा रेल्वेच्या. मी थेट पहिलीत दाखल झालो. बालवाडी वगैरे प्रकार नाही.

आमच्यावेळी मुलांसाठी खाकी pant आणि पांढरा हाफ शर्ट असा युनिफॉर्म असायचा. तर मुलींसाठी निळा स्कर्ट व पांढरा शर्ट. शक्यतो शहरातल्या सर्वच शाळांचा युनिफॉर्म एकसारखाच असायचा. मग विद्यार्थी कोणत्या शाळेत शिकता आहे हे लक्षात येण्यासाठी शाळेचे नाव असलेलं स्टीकर/बिल्ला/ badge शर्टावर लावण्याची पद्धत सुरु झाली. इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्वत:ची बस असायची. मुले या बसमधून शाळेत जातात याचं सुद्धा अप्रूप वाटायचं. शाळा घरापासून जवळच असल्याने आम्ही पायीच शाळेत जायचो. तसं ही त्यावेळी शाळेपासून लांब राहणारे मुले देखील पायीच यायचे. तुरळक मुलांना त्यांचे पालक- नातलग सायकलवरून अथवा रिक्षाने शाळेत सोडायचे. आपल्या घराच्या आसपास राहणारे सर्व मुले-मुले सोबत, एकत्रित शाळेत यायचे. अर्थात मुलगे आणि मुलींचा गट वेगळा असायचा. मुलगे व मुलींची शाळाही आमची वेगळी होती. संस्था एक असल्याने मुलगे व मुलींच्या शाळा एकाच कॅम्पसमध्ये भरायच्या. शाळेच्या शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या व्हायच्या. इकडचे शिक्षक तिकडे तर तिकडचे शिक्षक इकडे बदलून यायचे. दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक वेगळे होते.

शनिवार १ मे च्या निमित्ताने ह्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यापासूनच निकालाच्या दिवसाचे वेध लागायचे. आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे count down सुरु व्हायचं. तेव्हा मार्क्स सुद्धा प्रमाणातच मिळायचे. आजच्या सारखे भरमसाट, मुबलक, खोऱ्याने, धो-धो, सुसाट ( नेमका कोणता शब्द समर्पक आहे ते कळत नाही !) मार्क्स नाही मिळायचे.संपूर्ण शाळेत पहिला क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला ८० टक्के किंवा त्यापेक्षा थोडे जास्त गुण मिळायचे. काही विद्यार्थी ७० ते ७९ या वर्गवारीत असायचे. त्यापेक्षा जास्त ६०ते ६९ टक्के या गटात असायचे. आणि सर्वात जास्त मुले ३५ ते ५९ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण व्हायचे. पालक देखील आपल्या पाल्यांच्या प्रगतीवर समाधानी असायचे. फारशी आदळआपट करायचे नाहीत. काही अपवाद होतेही पण ते अत्यंत अल्पसंख्यांक असायचे. आपलं अपत्य उत्तीर्ण झालं, त्याचं किंवा तिचं एक वर्ष वाया गेलं नाही यातच पालकांना आनंद असायचा.

‘ओपन हाउस’च्या आजच्या जमान्यात हे सारं विचित्र किंवा अनाकलनीय वाटू शकतं. पण हेच वास्तव होतं आमच्या लहानपणी. शिक्षक आणि पालक यांची गाठभेट क्वचित व्ह्यायची. शिक्षकाने पालकांना भेटायला बोलवलं म्हणजे नक्की काही तरी चूक किंवा गुन्हा आपल्या पाल्याने केला असावा अशी ठाम खात्री पालकांची होत असायची. बरोबरच होतं ना. कारण मुलांच्या प्रगतीविषयी, वर्तनाविषयी पालकांशी विचारविनिमय-संवाद-चर्चा-अनुभवांचे आदानप्रदान करण्याची पद्धतच नव्हती तेव्हा.एवढंच काय की वर्गात किंवा शाळेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील फार आग्रहाने शाळेत निमंत्रित केलं जायचंच असं नाही. पालक देखील सहज शक्य असेल तरच शाळेत सत्कार समारंभाला जायचे. शाळेने निमंत्रण दिलं नसेल तर वाईट वगैरे वाटायचं नाही पालकांना असं मला वाटतं. मुलांना शाळेत घातलं आहे, आता त्याच्या शिक्षणाची सर्वस्वी जबाबदारी शाळेची आहे, असा समज त्याकाळी बहुतांशी पालकांचा होता. मुलांच्या शिक्षणाबाबत, त्यांच्या भवितव्याबाबत, त्यांच्या करिअर बाबत जागरूक असलेले पालक तेव्हाही होतेच, नाही असं नाही पण त्याचं प्रमाण मात्र तसं कमीच होतं. आजच्यासारखे चिंताग्रस्त, अती काळजीग्रस्त, अवास्तव विचार करणाऱ्या पालकांचा उदय तेव्हा झालेला नव्हता. याचं कारण म्हणजे परिस्थिती. तत्कालीन परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यात प्रचंड फरक पडलेला दिसून येतो. टोकाचा म्हणवा इतका बदल झालेला आहे. म्हणूनच मग आताचे पालक जसं वर्तन करतात यासाठी केवळ त्यांना दोष देण्यात वा त्यांनाच जबाबदार धरण्यात अर्थ नाही. प्रचंड वाढलेली स्पर्धा, हे या मागचं मुख्य कारण म्हणता येईल. वाढती स्पर्धा अनेक अडचणी, समस्या, चिंता, असुरक्षितता यांना जन्मास घालते.

आज आपण आर्थिक उदारीकरणाच्या आणि तीव्र भांडवलशाहीच्या युगात जगत आहोत. त्यामुळे उपभोक्तावाद, चंगळवाद वाढीस लागलेला आहे. ‘खरेदी करा-वापरा आणि फेका’ हा जगण्याचा मूलमंत्र झाला आहे. पैसा हेच सर्वस्व झालं आहे. कधी नव्हते इतके महत्व पैसा, संपत्तीला आलं आहे. पैसा हेच साध्य व साधनही झालं आहे. पैसा हेच मूल्य झालं आहे. पैसा मिळवणे मग तो कोणत्याही मार्गाने का असेना लोकांना त्याचं फारसं काही वाटेनासं झालंय. विधिनिषेध-सचोटी-प्रामाणिकपणा-नैतिकता ही तत्वे कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून मग कोणतं क्षेत्र अथवा फिल्ड किंवा शिक्षण अमाप पैसा मिळवून देणारे आहे, याचा शोध घेऊन त्याच प्रांतात आपल्या पाल्याला घालायचा अट्टाहास पालक करताना दिसताहेत. मग त्यासाठी लागणारी बुद्धीमत्ता, कौशल्ये, अभिरुची, अभिवृत्ती, आवड, कुवत, क्षमता, आकलन, कष्ट करण्याची तयारी यासारख्या गोष्टी सर्रासपणे दुर्लक्षित केल्या जाताना दिसत आहेत. म्हणून काही विशिष्ट क्षेत्रांतच लोकांचा ओढा वाढलेला दिसतो. मेडिकल, आयटी, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धीमत्ता, मिडिया स्टडीज, इवेन्ट managemnet, रोबोटिक्स अशाच क्षेत्रात जायचा कल दिसून येतो आहे. यासाठी लागणारी मुलभूत क्षमता विचारात घेतली जात नाही. अलीकडच्या काळात ‘मुलभूत विज्ञान’ या शाखेकडे फारच दुर्लक्ष झालेलं दिसतं. याचं कारण म्हणजे हे फिल्ड तात्काळ भरपूर पैसा देणारे नाही. यात प्राविण्य मिळवण्यासाठी, तज्ज्ञता प्राप्त करण्यासाठी कठीण परिश्रम करावे लागतात. बराचसा वेळ जाऊ द्यावा लागतो.कमालीची चिकाटी, संयम आवश्यक असतो. पण केवळ पैसा आहे म्हणून पालक फारसा साधक-बाधक विचार न करता, तारतम्यभावाने निर्णय न घेता बजारशरण प्रवृत्तीला बळी पडतात. भविष्यात मात्र पाल्यांना याचा कमालीचा जाच होतो. प्रसंगी मुले आत्महत्या देखील करायला माहे-पुढे पाहत नाही.

सध्याच्या कोविड महामारीने विज्ञानाचे महत्व नि योगदान फार लख्खपणे अधोरेखित केलं आहे. आता आपल्या जुन्या खुळचट विचारांचा, धारणांचा, सांगोवांगी (भाकड) कथांचा, पुराणांचा त्याग करून विज्ञानाची कास धरली पाहिजे. आपल्या प्राचीन इतिहासात सर्वकाही होतं. ( जेट विमान, प्लास्टिक सर्जरी इत्यादी इत्यादी ) हा गंड/भ्रम टाकून देण्याची तातडीची गरज आहे. छद्मविज्ञान बाजूला सारून शुद्ध नि निखळ अशा मूलभूत विज्ञानाचा ध्यास घेऊन मार्गक्रमण करण्याची गरज आहे. आपण जर जुन्या प्रथा- परंपरा- चालीरीती-कर्मकांड यांना कवटाळून बसलो तर आपण काळाची चक्रे उलटी फिरवणारे ठरू. आणि याची परिणीती म्हणजे आपला देश मध्ययुगीन कालखंडात लोटला जाऊन आधुनिक जगाच्या नाक्षावरून आपलं अस्तित्व नष्ट व्हायला फार वेळ लागणारा नाही! तेव्हा सावध ऐका पुढच्या हाका..अशीच आपल्याला वाटचाल करायला लागणार आहे. सन २०२२ मध्ये साजरा होणारा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अतिशय धुमधडाक्यात, संपूर्ण उत्साह आणि जोशात साजरा करू अशी अशा व्यक्त करू या ! जयहिंद ! ! जय महाराष्ट्र !!!

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com