Monday, April 29, 2024
Homeब्लॉगBlog : दोन वर्षांनंतर अनुभवलेली जत्रा...

Blog : दोन वर्षांनंतर अनुभवलेली जत्रा…

मनाच्या अवस्थेला अंत नसतो, मग भरते भावनांची जत्रा, लागतात समाधानाची अन् आशा अपेक्षाची कैक दुकानं, जिथं वेदना देवुन विकत घेता यायला हवे होते काही सुखाचे क्षण….

दरवर्षी प्रमाणे चैत्रपौर्णिमेला (Chaitra Paurnima) भरणाऱ्या एकविरा मातेच्या (Ekvira Mata) यात्रेला, आज जरा जास्तच गर्दी होती, लॉकडाउन नंतरच्या दोन वर्षानंतर उत्साहात येणारी ही पहिलीचं यात्रा. पोरं दुपारपासून नाचत होते, तरी आमच्या बालपणा इतका त्यांच्यात उत्साह नव्हताच, आम्ही महिनाभर अगोदर यात्रेची वाट पहायचो, यात्रेत काय काय घ्यायचे त्याची मोठी यादी, प्रत्येकाकडं तयार असायची, कोणता ड्रेस घालायचा, कोण कोण मित्रमैत्रिणी सोबत येणार, कुठल्या पाळण्यात बसायचे, या सगळ्या गोष्टी आधीच ठरलेल्या असायच्या, आईने अन् काकूने केलेल्या गुळाच्या खजुरांचा दरवळ अख्ख्या गल्लीत, यात्रेचा जयघोष करत सुटायचा.

- Advertisement -

यात्रेच्या दिवशी सकाळी सकाळी कांदे भरून टॅक्टर मार्केट ला जायचा, संध्याकाळच्या यात्रेची तजवीज म्हणून, अन् त्याच टॅक्टरच्या टार्लीत एक झोऱ्या टाकला की आमच्या सगळ्या बहिण भावंडाची स्वारी निघायची यात्रेला, खर्ची म्हणून प्रत्येकाला पन्नास पन्नास रुपये मिळायचे, आमची यादी काही त्यात बसायची नाही, पण ते पन्नास रुपये खूप होते आमच्यासाठी, एक रुपयाचा लाल लाल गोळा आणि एक बालिया कुल्फी खावुन, मोठ्या पाळण्यात बसायचो, पाळणा उंच गेला, की मोठ्याने ओरडायचो. पोटात गोळा यायचा मोठा, तेव्हा सांगायचा हा पाळणा की मी वर घेऊन जावू शकतो तर खाली ही घेऊन येवु शकतो, परमेश्वरा सारखाच, म्हणून वर आल्यावर गर्व करू नको आणि खाली गेल्यावर हताश होऊ नको.

तेव्हा मौत का कुवा पाहिल्याशिवाय यात्रेत आल्यासारखं काही वाटायचं नाही, त्या गाड्या जेव्हा गोल गोल फिरायच्या तेव्हा त्याला मौत का कुवा का म्हणतात कळायचं. आयुष्य ही असचं असत ना मौत का कुव्या सारखं, पळता पळता थांबलं की संपलचं, मौत कुव्यामध्ये शर्यत कोणाशी आहे आणि मनोरंजन कुणाचं करायचं हे अचुक माहित असतं, तसं आयुष्यात सह स्पर्धक कोण हे माहित नसताना ही पळायचं शेवटपर्यंत, कधी स्वतः सोबत तर कधी स्वतःला सोडून अन् मनोरंजन तरी कोणाचं करायचं, समाजाच की आपल्याच मनाचं….

काकांनी एखादा दोन किलो शेवरेवडी घेतली की त्यातुन रेवडी निवडुन खायची मजा काही औरच होती, आता पावशेर शेवरेवडी घेतली तरी लोळते आठ दहा दिवस, कोणी ढुंकुनही पाहत नाही तिच्या कडे. गोड माणसांसोबत, गोड पदार्थ ही नकोशी झालीय आत्ताच्या पिढीला . दोन रुपयांचा पुठ्ठ्याचा भोंगा, पोरं साऱ्या गावात वाजवत फिरायची, आत्ताचे पोरं ते भोंगे हातात ही घेत नाही, पाणीपुरी, गोळा खा म्हटलं की “फ्रुडपॉयझनिंग” होतं असं म्हणतात.

आमच्या वेळी आम्ही असा शब्द कधी ऐकलेला ही नव्हता. अजुन ही वाटतं कचोरी समोसा पाणीपुरी रगडा या हातगाड्यावर जावं, हायजेनिंक वैगेरे ची चिंता न करता खावं मनसोक्त, आपलं पोट भरावं म्हणून नाही तर त्यांच्या घराची चुल ही पेटावी म्हणून, हॉटेलमध्ये गेल्यावर वेटरला सहज देतो टीप गरज नसतांना, पण हात गाड्यावर गेलं की नंतर मिळणारी फुकटाची सुकी पाणीपुरी ही सोडत नाही, ही आमची परंपरा….

यात्रा म्हटली की गावचं लग्नचं, बारा गाड्यांचा थाट, पुरणाच्या नेवैद्याचा ताट, गुळ खजुराची उधळण, गरिब असो वा श्रीमंत त्या वेचुन खाण्यासाठी चढाओढ, तमाशा, कुस्त्या, सारं काही अप्रूपच…काळ बदलला, दुकानं बदलली, लोकांची मानसिकता बदलली, पैशांची रेलचेल सोबतच महागाई ही वाढली पण यात्रे विषयी ओढ अजूनही तिचं आहे. कारण जत्रा त्यासाठीच भरते, माहेराला आलेल्या सासुरवाशीण भेटतात, त्यांच्या रापलेल्या चेहऱ्यावर ही दिसते, एक आनंदाची छटा, आपल्या दुःखाने एकविरा मातेची ओटी भरून, त्यातून सुखाचे चार दाणे घ्यावे वेचून. तिच्या पायावरचं कुंकू घ्याव लावून ललाटी, मागावं वरदान सुखसौख्याचं…

लेखिका : प्रतिभा खैरनार, नांदगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या