विविध पैलू असलेलं दूरदृष्टी नेतृत्व

jalgaon-digital
4 Min Read

आधुनिक महाराष्ट्राची उभारणी करण्यामध्ये ज्या-ज्या व्यक्तींनी कष्ट घेतले, प्रयत्न केले त्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विकास म्हणजे केवळ रस्ते, तलाव आणि इमारती बांधणे नव्हे, तर त्यासोबत माणसाची, पर्यायाने समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि भौतिक प्रगती करणे अभिप्रेत असते. म्हणूनच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा त्यांचा ध्यास होता.

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर केवळ अडीच वर्षांत यशवंतरावांनी जे कार्य केले, त्यामुळे संपूर्ण भारतात एक कार्यक्षम, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला कर्तबगार व दूरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांची देशभर ख्याती झाली. पंचायतराज, कसेल त्याची जमीन, १८ सहकारी साखर कारखान्यांची निर्मिती, पाटबंधारे आणि उद्योग विकास मंडळ, साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना, इत्यादी महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी आपल्या कारकिर्दीत घेतले. ज्ञानमंदिरे उभे करणारा नेता म्हणूनही त्यांचा सर्वदूर परिचय झाला.

सामान्य माणसाचे सुख हेच लोकशाही राज्याचे अंतिम ध्येय असते. ते साध्य करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या गरजेबरोबरच समाजाच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यावर त्यांनी विशेषत्वाने भर दिला. त्यांनी घेतलेले आर्थिक, सामाजिक शैक्षणिक निर्णय पुढे महाराष्ट्राच्या प्रगतीची पाऊलवाट ठरले. शिक्षणातून समाज परिवर्तनाची त्यांची भूमिका महाराष्ट्राला वैचारिक अधिष्ठान देणारी ठरली.

महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. रा. शिंदे ही यशवंतरावांची श्रद्धास्थाने होती. त्यांच्या समाजसुधारक विचारसरणीवर, समाजाला शिक्षित करण्याच्या प्रयत्नांवर यशवंतरावांचा गाढ विश्वास होता. म्हणूनच बौद्धधर्मीयांना शैक्षणिक सवलती अथवा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना त्यांनी स्वत:चे मुख्यमंत्रीपद पणाला लावून भारतात, प्रथम महाराष्ट्रात मोफत शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला होता. त्या काळात असे निर्णय घेणे महत्त्वाचे आणि गरजेचे होतेच. शिवाय आजचे महागडे होत जाणारे शिक्षण आणि त्यातील विषमता बघता यशवंतरावांचे शैक्षणिक धोरण पुन्हा राबवण्याची गरज अधोरेखित होत आहे.

यशवंतराव शिक्षणाला सामाजिक आणि अत्यावश्यक सेवेचा एक भाग मानत. सर्व प्रगतीची पाळेमुळे शिक्षणात आहेत, अशी त्यांची पक्की धारणा होती. म्हणून आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षणविषयक धडाकेबाज निर्णय घेतले. ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये, कृषी व अकृषी विद्यापीठे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. याकामी पुढाकार घेणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या पाठीशी तन-मन-धन व राजकीय पाठबळ त्यांनी उभे केले. त्यापैकी शिवाजी विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ. मराठवाडा विभागावर निजामाची राजवट होती. शिक्षणाची अतिशय दयनीय अवस्था होती. विद्यापीठ हैदराबादेत होते. शिक्षणाचे माध्यम उर्दू होते. १९५० मध्ये औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर नांदेड येथे स्वामी रामानंदतीर्थ यांनी महाविद्यालय सुरू केले आणि इतर ६, अशी एकूण ८ महाविद्यालये होती.

यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजकारणी होते असे नाही. त्यांच्या जीवनाला विविध पैलू होते. जितक्या सहजतेने ते राजकीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात वावरत, तितकीच सहजता ते जेव्हा विचारवंत, साहित्यिक, विद्वान, शास्त्रज्ञ, कारखानदार यांच्या सहवासात असत तेव्हाही पहायला मिळे, हे कसब त्यांनी प्रयत्न पूर्वक साधले होते. त्यांचे नेमके वेगळेपण येथेच दिसून येते.

त्यांच्या चरित्रग्रंथात एके ठिकाणी म्हटले आहे ‘सत्तास्पर्धेच्या राजकारणात नेत्याला प्रसंगी डावपेचांचा अंगीकार करावाच लागतो.’ यशवंतराव हे डावपेचांपासून दूर राहणे शक्यच नव्हते., परंतु सामाजिक हेतूंच्या सिद्धीसाठीच ते डावपेच खेळले हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्टय आहे. साहस केव्हा करायचे आणि परिस्थितीच्या चक्रव्यूहात प्रत्यक्ष केव्हा शिरायचे यासंबंधीचे त्यांचे गणित मनाशी पक्के झालेले असायचे.

यशवंतरावांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये मंत्रीपदे भूषविलीच, पण सहकारी चळवळ, शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना, पंचायत राज्य व जिल्हा परिषदांची स्थापना, सहकारी साखर कारखाने, दलित व दुर्बल घटकांच्या उद्धारासाठी निरनिराळे कार्यक्रम, साहित्य व सांस्कृतिक मंडळाची स्थापना, गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण इत्यादी योजनांची महाराष्ट्र राज्यात मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात निर्माण केले. साहित्यिक, कलावंत, पत्रकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी मित्रसंग्रह केला. अशा प्रकारे ते सर्वत्र वावरत आणि रमत सुद्धा. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना प्रवासही खूप घडला. त्या प्रवासात आपल्या आवडत्या लेखकांचा मुद्दाम शोध घेऊन त्यांची भेट घेण्याची व जगप्रसिद्ध साहित्यिकांच्या व कलावंतांच्या स्मारकांचे आवर्जून दर्शन घेण्याची त्यांची त्यामागील श्रद्धा, विनम्रता त्यांच्या सुसंस्कृत व कलाप्रेमी मनाला साजेशीच म्हणावी लागेल. राजकारणात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन सावधतेने, धोरणी वृत्तीने, कष्टपूर्वक साध्य केलेला सुसंस्कृतपणा याच्या बळावरच त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला खंबीर नेतृत्व दिले.

राजेंद्र पाटील, पुणे

मो.- 9822753219

संदर्भ –यशवंतराव चव्हाण एक विविधांगी व्यक्तिमत्व

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *