Blog : वाचा वाचा पुस्तक वाचा…
ब्लॉग

Blog : वाचा वाचा पुस्तक वाचा…

Dinesh Sonawane

इंटरनेट, मोबाइलच्या या जमान्यात नव्या पिढीने पुस्तकांकडे जणू पाठच फिरवली आहे. सध्या मोबाइलवर अनेक अॅप उपलब्ध आहेत इंटरनेटवर कोणत्याही शब्दाचा अर्थ चटकन मिळतो. अनेकदा या तरुण पिढीला पुस्तक वाचणं बोअरिंग वाटतं. इंटरनेटवर कोणतीही माहिती मिळून जाते ना मग पुस्तक का वाचायचं असं सध्याच्या पिढीला वाटतं. त्यामुळे सध्या पुस्तक वाचण्याकडे तरुणांचा कल कमी झाला आहे. जो तो मोबइलमध्ये बिझी झाला आहे. आपण जशा इतर गोष्टींची सवय लावतो, त्याप्रमाणे पुस्तक वाचनाचीही सवय लावली तर त्यात कुठे नुकसान आहे.

वाचकांना प्रेरित करून मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या साहित्यिकांचा आणि पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी १९९५ साली पॅरिस येथे झालेल्या परिषदेत युनेस्कोने २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन आणि कॉपीराइट दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. विल्यम शेक्सपिअर या लेखकाचा २३ एप्रिल या तारखेला जन्म – मृत्य झाला होता म्हणून या तारखेला अधिक महत्व प्राप्त झाले. आज जवळपास १०० देशांपेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस अगदी उत्साहात साजरा केला जातो.

आर्थिक संपत्ती असलेली व्यक्तीच श्रीमंत असते, असे आपण नेहमी समजतो. पण बॅंक बॅलेन्स नसताना देखील या जगातील एक व्यक्ती खूप श्रीमंत असते असे म्हटले जाते, आणि ती व्यक्ती म्हणजे ‘पुस्तक प्रेमी’. ज्याच्याकडे पुस्तकांचा खजिना असतो, त्याच्याकडे ज्ञानाचे भंडार असते.

चांगल्या पुस्तकांमुळे आपल्या संपूर्ण जिवनाला एक वेगळे वळण मिळते. कधीकधी न वाचलेल्या गोष्टी आपण एखाद्या पुस्तकात वाचतो आणि आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल घडतो. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. पुस्तकांमधील समृ़द्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कायमचा बदलून जातो.

वाचन म्हणजे एका अर्थाने परकाया प्रवेश असतो, जिथे लिहिणाऱ्याच्या नजरेतून आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो, तिथले अनेकविध अनुभव घेतो, त्यातील प्रत्येक क्षण प्रत्यक्ष जगतो. पुस्तकांशी मैत्री केली तर आयुष्यभराची साथ देणारे अनेक जिवाभावाचे सोबती आपल्याला मिळू शकतात, त्यांचं आणि आपलं एक वेगळं विश्व तयार होतं.

वाचनाने ज्ञानप्राप्ती, मनोरंजन, बौध्दिक आणि मानसिक विकास अशा अनेक गोष्टी साध्य होतात. एकदा वाचनाची गोडी लागली की ही वाचन भूक उत्तरोत्तर वाढत जाते आणि वाचनाचं व्यसन लागत जातं, अर्थात हे व्यसन असणं चांगलंच. तंत्रज्ञान आणि ‘ई-बुक’ मुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी कमी होत असल्याचे सत्य कोणीही नाकारू शकत नाही, असे मत, ‘भारत फॉर इंडिया’ या संकेतस्थळाच्या असोसिएट एडिटर राधिका गंगाधर यांनी व्यक्त केले.

वाचनाची गोडी लहानपणापासूनच असणे आवश्यक आहे. कामाचा वाढता व्याप आणि वेेळेचा अभाव, यामुळे ई-बुकला प्राधान्य मिळत असले, तरी पुस्तक वाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे आॅनलाईन साहित्याला प्राधान्य जरी मिळत असले, तरी कागदी पुस्तकांवर याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

भारतात पुस्तक दिन साजरा करण्यास फारसे महत्त्व प्राप्त झालेले नाही. इतर अनेक देशांमध्ये या दिवशी पुस्तके आणि गुलाबाचे फुल भेट देऊन हा दिवस साजरा केला जातो. तरूणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रकाशक यांच्या सहाय्याने लहान व मोठ्या शहरांमध्ये ‘बुक फेस्टिवल’चे आयोजन करून वाचन संस्कृतीला चालना देणे ही काळाची गरज बनली आहे.

जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

मृणाल पाटील, बी वाय के कॉलेज

Deshdoot
www.deshdoot.com