Blog : विस्मरणाचे स्मरण करुया!

Blog : विस्मरणाचे स्मरण करुया!

नाशिक | Nashik

स्मृती आणि विस्मृती एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आणि घटनाही! या दोन्ही घटना लहानपणापासून अगदी शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या, पण त्यांची जाणीव नसणाऱ्या; इतक्या की आपले आयुष्य म्हणजे यांचा पाठशिवणीचा खेळ असतो. मात्र सगळे आपल्या जाणिवेच्या पलीकडे घडत असते. (world alzheimer day)

त्यामुळे दुर्लक्षित! स्मृती आपले आयुष्य घडवते. समृद्ध करते तर विस्मृती ते सुखावह करते. परंतु उत्तम आयुष्य आणि आरोग्यासाठी या परस्परविरोधी घटना संगनमताने काम करतात बरं का! पण म्हणतात ना, जेवणात मीठ नसल्यावर त्याची जाणीव होते. यांचे तसेच असते.

त्यातही प्रामुख्याने स्मृतीचे; जेव्हा तिचा प्रमाणाबाहेर ह्रास होतो तो मात्र त्या व्यक्तीसाठी आणि तिच्या कुटुंबियांसाठी खूपच त्रासदायक असतो आणि त्या वेळेस स्मृतीचे महत्त्व लक्षात येते. अशा आजाराला आम्ही स्मृतिभ्रंश म्हणतो.

आज जागतिक अल्झायमर (world alzheimer day) दिवस! हा दरवर्षी 21 सप्टेंबरला या आणि अशा प्रकारच्या आजारांविषयी जनजागृती व्हावी या हेतूने साजरा केला जातो. स्मृती जाणे आणि त्याबरोबर होणारे मेंदूतील बदल डॉ.अलोईस अल्झायमर या जर्मन मनोविकारतज्ञाने पहिल्यांदा जगासमोर मांडले. त्यामुळे या आजाराला त्यांचे नाव देण्यात आले. जस-जसे संशोधन पुढे गेले तसे याप्रकरच्या आजारांमध्ये भर पडत गेली. अशी लक्षणे असणाऱ्या आजारांना 'डिमेन्शिया' या मोठ्या गटात सामील केले गेले.

'डिमेन्शिया'ला (dementia) मराठीत 'स्मृतिभ्रंश' असे नाव देण्यात आले. नावावरून सगळ्यांना वाटते की, हा फक्त विसमरणाचा आजार आहे, पण यात वेगवेगळ्या लक्षणांचा समावेश असतो. उदा. व्यक्तीच्या आधीच्या बुद्धीमत्तेत घसरण होणे, वारंवार गोष्टी विसरणे, सतत एकटे आणि हरवल्यासारखे राहणे, विचारांमधील सूसूत्रता हरवणे, निर्णयक्षमता कमी होणे आणि सगळ्यात महत्वाचे शिकलेल्या दैनंदिन क्रिया यांना जमत नाहीत. जसे की दात घासणे, चहा पिणे, कपडे घालणे, नाडी बांधणे वगैरे-वगैरे. सांगायचा मुद्दा फक्त स्मृती नाही तर दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या क्षमता यात कमी-कमी होत जातात.

हा आजार बरेच दिवस दुर्लक्षित राहण्याची कारणे म्हणजे.....


1) आपण याला वयानुसार येणारा विसरभोळेपणा समजतो.
2) हा अगदी हळूहळू हात पाय पसरवणारा आजार आहे. त्यामुळे ती व्यक्ती आजारी आहे हे लक्षात येत नाही.
3) उतारवयातील इतर शारीरिक आजारांची लक्षणे असतील असे समजले जाते.
4) उतारवयातील आजार सहन करण्याची प्रवृत्ती.
5) या आजाराविषयी माहिती नसणे.

उदा. अहो सर, माझ्या वडिलांचा चिडचिडेपणा आजकाल प्रचंड वाढलाय. परत-परत तीच गोष्ट विचारतात. जेवले तरी नंतर थोड्या वेळाने परत जेवायला मागतात. त्यांच्या गोष्टी कुठेही ठेवतात. परवा तर फ्रीजमध्ये चप्पल ठेवली होती. कधी-कधी बोलताना एकदम शांत होतात आणि काय बोलत होतो ते विसरून जातात. आपण काही बोललो तर समजलेच नाही असे पाहतात. नावांचा गोंधळ करतात. शूजची लेस बांधता येत नाही. असे होतेय दोन वर्षांपासून, पण अलीकडे खूप वाढलंय म्हणून तुमच्याकडे घेऊन आलोय.

आम्ही मनोविकारतज्ञ 'स्मृतिभ्रंश' (Amnesia) हा शब्द वापरतो त्यावेळी ते म्हणतात, 'असे काही नाही. जुने सगळे ठणठणीत लक्षात आहे'. इथे नातेवाईकांनी लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की, या आजारांत आठवणी तयार होण्याची प्रक्रिया बिघडलेली असते. जुन्या आठवणी चांगल्याच असतात. त्यामुळे सकाळी काय खाल्ले हे त्या व्यक्ती विसरून जातात, पण कधी रिटायर्ड झाल्या ते अगदी तारीख वेळेसह सांगतील. आजार खूप वाढला तर मात्र जुन्या आठवणीसुद्धा विसरल्या जातात. लक्षात घ्या, हा सातत्याने वाढत जाणारा आजार आहे आणि एकदा झालेले मेंदूचे नुकसान भरून येणारे नसते. आपण वेळीच घेतलेली औषधांची मदत त्या व्यक्तीचे आयुष्य सुखकर करते आणि आजाराच्या वाढीचा वेग कमी करते.

नवीन संशोधन सांगतंय की, हा आजार पस्तिशीमध्येच सुरू झालेला असतो, पण त्याची लक्षणे साठीनंतर नजरेस येतात. त्यामुळे शारीरिक व्यायाम (सगळ्यांनी करा हो चालू. आणखी किती फायदे सांगावेत व्यायामाचे), आवडणाऱ्या आणि डोकं वापराव्या लागणाऱ्या गोष्टी केल्यास आपल्याला या आजारापासून दूर राहण्यास मदत करतील. असा आजार असणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाईकांची मात्र कठीण परीक्षा असते. तथापि त्यांनी शास्त्रीय माहिती घेतली आणि त्यानुसार वागले तर त्यांचा बराच त्रास कमी होतो हे नक्की!

वेळीच घेतलेली तज्ञांची मदत रुग्णाचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे जीवन सुसह्य करणारी ठरते. बऱ्याच वेळा काही इतर आजारांमुळेसुद्धा अशी लक्षणे दिसतात. त्यावेळी काही रक्त तपासण्यांची आणि मेंदूच्या इमेजिंगचीसुद्धा गरज पडू शकते. निदान पक्के झाल्यानंतर मात्र औषधे नियमित घेतली पाहिजेत. औषधे नातेवाईकांनी द्यावीत, असे आम्ही आग्रहाने सांगतो. कारण रुग्ण त्याच्या आजारामुळे बऱ्याच वेळा चुकीची आणि चुकीच्या पद्धतीने औषधे घेतो. 'स्टिल एलिस' आणि मराठीत 'अस्तु' (Astu) या चित्रपटांत या आजाराचे सुंदर सादरीकरण केलेले आहे. अवश्य पाहा! इतरांना ही वेळीच माहिती पुरवा.


- डॉ. मुक्तेश दौंड, मनोविकारतज्ञ, निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड, नाशिक

Related Stories

No stories found.