महिला दिन विशेष : भारतीय स्त्री व समाज

महिला दिन विशेष : भारतीय स्त्री व समाज

एकविसावे शतक (Twenty-first century) सुरु होऊन आता २२ वर्षे लोटली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. तरीही भारतीय स्रीच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. निरक्षरता, कुपोषण, पिळवणूक, जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद तसेच आहेत. घराघरात व घराबाहेरही स्रीवर अजूनही अन्याय होत आहे. वारंवार होणारी बाळंतपणे, घरात व बाहेर उपसावे लागणारे कष्ट, आरोग्याबद्दलची हेळसांड व गरिबी यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात स्रियांच्या (women) मृत्युचे प्रमाण जास्त आहे.

भारतीय स्रिया जास्त निरक्षर आहेत. ज्या शिकल्या त्यापैकी बऱ्याच विवेकी व विज्ञानवादी नाहीत. परिणामी बुरसटलेले विचार, वाईट रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यातून त्या बाहेर पडायला तयार नाहीत. ज्या शिकल्या त्यातील काही वेगवेगळया ठिकाणी संघर्ष करीत आहेत. मोठमोठी स्वप्ने उराशी बाळगून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी झगडत आहेत. उदा. आदिवासींच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या समाजसेविका मेधा पाटकर, लेखक अरुंधती रॉय, २००२ च्या गुजरात दंगलीतील पीडितांसाठी लढणारी तिस्ता सेटलवाड आदी सर्वांचे मनापासून आभार! वेगवेगळया क्षेत्रात अगदी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व नावलौकीक मिळवणाऱ्या आहेत, पण लोकसंख्येच्या (Population) तुलनेत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

१४० कोटी लोकसंख्या असणाऱ्या या लोकशाही देशात बऱ्याच स्रियांचे जिणे असे आहे.... एकतर ती कुणाची मुलगी आहे, कुणाची तरी पत्नी आहे व कुणाची तरी पत्नी आहे. या भूमिकेमुळे तिला माणूस म्हणून फारच कमी प्रमाणात वागवले जाते. याला काही प्रमाणात स्रीच जबाबदार आहे. कारण पिढ्यानपिढ्या तिच्यावर समाजाने व येथील सनातनी व्यवस्थेने विषमतेचे संस्कार केले आहेत. मुलाला व मुलीला मिळणारी वागणूक आजही समान आहे का? जोपर्यंत समाज स्रीला माणूस मानत नाही तोपर्यंत हे असेच चालेल. म्हणून ज्या स्रिया शिकल्या आहेत त्यांनी प्रथम स्वत:त बदल केला पाहिजे. समतेचे विचार देणारी फुले, आंबेडकर यांची पुस्तके वाचावीत. चूकीच्या गोष्टीवर बोलले पाहिजे. स्वत:ला माणूस मानले पाहिजे. जात, धर्म डोक्यातून काढला पाहिजे. कर्मकांड, नवस यापासून स्वत:ची सुटका करुन घेतली पाहिजे. मुला-मुलीला कुटुंबात समान संधी दिली पाहिजे. वाईट रुढी-परंपरा नाकाराव्यात. चांगल्या रुढी-परंपरा पाळाव्यात. बाबा, बुवा व भगत यांच्या नादी लागू नये. चांगले काय व वाईट काय? यासाठी विचार करायला शिकले पाहिजे.

आज अगदी शिकलेल्या स्रियासुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आढळतात. बऱ्याच स्रियांनी धर्माच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या केल्या जाणाऱ्या कर्मकांडात स्वत:ला वाहून घेतले आहे. तासनतास अशा कर्मकांडात त्या वेळ घालवतात. आपण याबाबतीत डोळस केव्हा होणार? त्याऐवजी आपल्या मुलाबाळांकडे लक्ष दिले व त्यांचा अभ्यास घेतला तर चालणार नाही का? काही स्रिया गरज नसतानाही नोकऱ्या करतात. ज्यांना गरज आहे व आवडही आहे त्यांनी जीव ओतून नोकरी करावी. नाही तर भौतिक सुखासाठी कुटुंब स्वास्थ्याचा बळी जाईल. मुलांकडे दुर्लक्ष होईल. खरे तर स्री व पुरुष यापैकी कोणीही मुलांकडे लक्ष दिले तरी चालेल. अर्थात याचा निर्णय त्या उभयतांनी घ्यावा. उलट 'सर्वांनी कष्टकरी व्हावे' असे एका खंडात फुले म्हणतात. प्रत्येक व्यक्तीस काम मिळाले पाहिजे याची तजवीज सरकारने करावी. सध्या मात्र शासन हे करताना दिसत नाही. आपली मुले जातीयवादी व धर्मवादी राजकारणात जाणार नाही याची दक्षता आई व वडिलांनी घ्यावी. अन्यथा, उद्या ते दंगेखोर बनतील. देशद्रोही बनतील. देशाची एकता धोक्यात येईल.

विज्ञानाने आज माणसाची भौतिक प्रगती झपाट्याने केली, पण आपण त्याच विज्ञान व तंत्रज्ञानाची काय दशा केली? गर्भजल परीक्षणाच्या अत्याधुनिक शास्रीय पद्धतीची माहिती असलेली माता आपल्या कुशीतील स्रीगर्भाचा नाश करून घेत आहे. अर्थात बऱ्याच वेळा ते करण्यासाठी तिचा पती व इतर घटक तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणतात. काही स्रियांना तर मुलगाच हवा असतो. 'माझे अपत्य आहे. ते काहीही असो' असा स्रियांनी विचार करावा. कारण कुटुंबाच्या संतुलनापेक्षा समाजाचे व देशाचे संतुलन गरजेचे आहे. काही महाभाग असा युक्तीवाद करतात की, मुली आई-वडिलांचे पालनपोषण करण्यास समर्थ आहे का? त्यांना असे विचारावेसे वाटते की, किती मुलगे आपल्या आई-वडिलांचा व्यवस्थित सांभाळ करतात? आज तर स्वत:च्या मुलाविरोधात पोटगी मिळवण्यासाठी आई-वडिलांना कोर्टात खेटा घालाव्या लागतात. शहरात वृद्धाश्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे कसले द्योतक? स्री व पुरूष या दोघांनीही या प्रश्नाबाबत नीट विचार करण्याची वेळ आली आहे.

सर्व धर्माच्या परित्यक्ताबाबत समान कायदे नाहीत. कष्टकरी स्री व पुरुष यांच्या वेतनातही तफावत आढळते. कामगार स्री व पुरूष यातील कोणालाच न्याय मिळत नाही. सरकारविरुद्ध संघर्ष, सामाजिक प्रबोधन व परिवर्तन केले तर नुसत्या स्रीचा विकास होईल, असे नव्हे तर संपूर्ण समाजाचा व देशाचा कायापालट होईल. कार्ल मार्क्सने म्हटले आहे, माणसाला दु:खे भोगू द्या पण ती माणसाची, जनावरांची नाही. नीतीमूल्ये ही समाज सुधारणेसाठी अत्यंत गरजेची आहेत. ती समाजाने अंगीकारलीच पाहिज़ेत. तरच व्यक्ती, कुटुंब समाज, पर्यायाने देशाचा विकास होईल. देशात शांतता व एकात्मता नांदेल. यासाठी स्रियांनी देशप्रेम, सहिष्णुता, सच्चेपणा, कष्टाळूवृत्ती, समानता आदी नीतीमूल्ये अंगीकारुन ती आचरणात आणावीत. कारण एक स्री सुधारली की संपूर्ण कुटुंब सुधारते, असे महात्मा फुले यांनीच म्हटले आहे.

- प्रा. आशा लांडगे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com