परत येतील का ‘ते’ दिवस...?

- अशोक निसाळ
नागपंचमी
नागपंचमी

‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे,

पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’...

या कवितेच्या ओळी सासूरवाशिणींना जुन्या आठवणींचा उजाळा करून देतात. माहेरच्या सुखद गारव्याची आस निर्माण करून देतात. तसे पाहता श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी! या सणाचे काय महत्त्व ते सर्वांनाच ठाऊक आहे.

मात्र आधुनिक काळात शहरीकरणामुळे हा सण आता लोप पावत चालला आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी नागपंचमीला आजही पूर्वीसारखेच महत्त्व आहे. कारण परंपरागत चालत आलेल्या रुढीप्रमाणे हा सण अनेक गावांत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.

आमच्या गावातही नागपंचमी उत्साहात साजरी व्हायची. आताही होतेय. मात्र त्यावेळचा सण आणि आता साजरा होणार्‍या सणात बराच फरक दिसून येतो. शिंगवे बहुला हे माझे गाव! तिन्ही बाजूंनी लष्कराने वेढलेलं! गावच्या पश्‍चिम बाजूस लष्करी हद्दीत असलेले, हिरवा शालू नेसलेले सुईडोंगर, नाकिंद्या, खंडोबाची टेकडी आणि वनराई अगदी मन प्रफुल्लित करते. गावापासून एक किलोमीटर परिसरात लष्कराने सैन्य प्रशिक्षणासाठी बांधलेले छोटे-छोटे बट आहे.

या एका बटाजवळ एक छोटं वारूळ आहे. इतरही वारूळे आहेत. मात्र नागपंचमीला नऊवारी साडी नेसून नटून-थटून गावातील सर्व महिला नागपूजनासाठी याच वारुळाजवळ जमत. हातात पूजेचे ताट, त्यात दूध-लाह्या आदी साहित्य असायचे. त्याआधी सकाळी लवकर उठून महिला घराची स्वच्छता करीत. जमिनी शेणाने सारवत. अंगणात रांगोळी काढत. नागाची चित्रे भिंतीवर काढत आणि त्याची पूजा करीत. काही महिला जवळच्या किराणा दुकानातून नाग-नरसोबाचे चित्र आणून भिंतीला चिटकवत व त्याची विधिवत पूजा करीत. परिवारासाठी गोडधोड जेवण बनवत.

प्रत्येक जण घराच्या माळावर, दारासमोरच्या झाडाला तर कुणी चौकटीला झोका बांधून सणाचा आनंद द्विगुणीत करीत असत. सगळ्या माहेरवाशीण जमा होत. सासरच्या गप्पाही रंगायच्या. जुन्या मैत्रिणीही भेटायच्या. सणाच्या दोन दिवस आधी झोका बांधण्याची तयारी होत असे.

दिवसभर झोका खेळून झाल्यावर सायंकाळ होण्याची वाट बघत. सायंकाळी दरवर्षी ठरलेल्या ‘त्या’ वारुळाजवळ एकत्र जमत. पूजा करीत. फुगडी खेळत. येथे जवळच असलेल्या सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडांना दोर, सायकलचे टायर बांधून मुले, मुली व महिला या उंचच-उंच झोक्यांचा आनंद लुटायचे. घरी आल्यावर गोडधोड जेवणावर ताव मारायचे. या सणाची मज्जाच काही औरच होती. आता हे सण कधी येतात अन् कधी जातात तेच कळत नाही.

सामाजिक सलोखा कमी झाल्याने तसेच एकत्र कुटुंबपद्धती लयास गेल्याने, भाऊबंदकी वाद वाढल्याने, नोकरीसाठी शहरात काही कुटुंबे स्थायिक झाले आहेत. झोके खेळण्यासाठी उद्याने आल्याने आता कोणीही त्यावेळसारखा झोका खेळताना वा वारुळपूजनासाठी एकत्र महिलावर्गाचा जमाव दिसत नाही.

गावातील अनेक जण लष्करात विविध राज्यांत भरती आहेत. श्रावण आला की, त्यांना गावाकडच्या वातावरणाच्या ओढीमुळेे सुट्टीचे वेध लागायचे. 'सावन के झुलोंने मुझको बुलाया... मै परदेसी घर वापस आया...' असेच त्यांना वाटायचे. सुट्टीचा आनंद लुटायचे. वडाची झाडे आहे तेथेच आहेत. मात्र त्यांना झोके बांधून आनंद लुटणारी मुले, मुली, महिला आता दिसत नाहीत. गावात त्यावेळची ती मजा आता राहिलेली नाही. येतील का कधी पूर्वीचे ‘ते’ दिवस परत...? असाच प्रश्‍न नागपंचमीवेळी ती झाडे बघून सर्वांना पडत असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com