आज गीता जयंती : मानव समाजाला जगण्याची हिंमत गीतेतून

आज गीता जयंती : मानव समाजाला जगण्याची हिंमत गीतेतून

मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो. तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल.

विश्वातील लोक भावपूर्ण अंतःकरणाने गीताजयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात. एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात गीतेची आगळीवेगळी विशेषता आणि महानता प्रकर्षाने दिसून येते, म्हणूनच थोर संत विनोबाजींनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की,' माझे शरीर आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी यांचे गीतेच्या दुधावर अधिक पोषण झाले आहे गीता माझे प्राणतत्त्व होय.'

समग्र महाभारताचे नवनीत व्यासांनी भगवद्गीतेत दिले आहे. गीता ही व्यासांची मुख्य शिकवण आणि त्यांच्या मननाची संपूर्ण साठवण आहे. प्राचीन काळापासून गीतेला उपनिषदाचा नान मिळाला आहे. गीता उपनिषदांचेही उपनिषद आहे. गीतारूपी अमृत भगवंतांनी धनुर्धर अर्जुनाच्या निमित्ताने जगाला दिले आहे. जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रायः प्रत्येक विचार गीतेत आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोष आहे.

हजारो वर्षापासून ते आजपर्यंत ऋषी, साधू, संत, भक्त, चिंतक, योगी, कर्मवीर, ज्ञानी मग तो कोणत्याही देशातील, भूप्रदेशातील,काळातील असो कोणत्याही धर्माचा, जातीचा, पंथाचा असो, त्या सर्वांना गीतेतील श्लोक माधुर्याने आणि सौंदर्याने मुग्ध केले आहे. गीतेने मानव समाजाला जगण्याची हिंमत आणि तेज दिले. जीवनाचा पुरुषार्थ दाखविला. भगवंतांनी अर्जुनाला निमित्तमात्र बनवून विश्वातील समग्र मानव जातीला गीता ज्ञानाद्वारे जीवनाभिमुख करण्याचा चिरंतन मार्ग दाखवला आहे.

पांडुरंगशास्त्री आठवले यांनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की,'वेद,उपनिषदे यांचा महान ज्ञानसागर गीतेने स्वतःच्या लहानसा घागरीत सामावून घेतलेला आहे. गीता ही सर्व शास्त्रमयी आहे. 'गीतेत सर्व शास्त्रांचा समन्वय पहायला मिळतो. गीता हा वैश्विक ग्रंथ आहे. गीता हा आमचा विश्व धर्मग्रंथ आहे. साहित्य शौकिनांची लालसा गीता पूर्ण करते. कर्मवीरांना गीता उत्साह देते. भक्तांना गीतेत भक्तीचे रहस्य आढळते. व्याकरणकारांचे हृदय गीतेतील शब्दांचे लालित्य पाहून डोलू लागते.

पांडुरंगशास्त्री सांगतात की, निराशावादी मनुष्य गुलाबावरील काटे पाहतो, गीता त्याला काट्यांमध्ये गुलाब पाहण्याची दृष्टी देते. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता म्हणजे भारताच्या गौरवाची शान आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. स्वधर्म जाणणे आणि प्राणांतीही तो न टाकणे ही एक मनाची घडण आहे. आपल्या प्राणप्रिय देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजलेले वीर, क्रांतिकारक देशभक्त, गीता हृदयाशी धरून फासावर चढले, याचाच अर्थ असा की, मृत्यूलाही हसतमुखाने सामोरे जाण्याचे आत्मिक आणि मानसिक बळ, शक्ती गीतेने दिली. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी गीतेवर चिंतन केले आहे.

विद्या प्राप्त करावयाची असेल तर माणसांमध्ये विनम्रता, जिज्ञासा आणि सेवावृत्ती या तीन गोष्टी असल्या पाहिजेत, असा जीवनाला दृष्टी देणारा संदेश गीतेने जगाला दिला आहे.

भगवद्गीतेच्या स्तुतीचा श्लोक तर गीतेच्या अभ्यासाचे अपरंपार महत्व अधोरेखित करतो....

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन: |

पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ||

(सर्व उपनिषदे ह्याच गाई, श्रीकृष्ण हाच त्यांचे दूध काढणारा, अर्जुन(आणि गीताभ्यास करणारे) हा ते दूध प्राशन करणारा भोक्ता (जणु वासरुच) आणि त्या गाईंचे दूध म्हणजे गीतारूपी अमृत.....अर्थात गाईचे दूध हे आपण गोमातेच्या ठायी असलेल्या सर्व उत्तम गोष्ट समजतो त्यामुळे या उपमेतून गीतेचे आपल्या आयुष्यातील महत्व समजेल !

उपनिषदे ही वैदिक वाङमयाचा अभिन्न असा भाग म्हणता येतील. अशा उपनिषदांमधील तत्वज्ञानाचे दुग्ध अर्थात ज्ञानमय सार अशी उपमा भगवद्गीतेला दिलेली आहे यातच तिची महती स्पष्ट होते.

भगवद्गीतेचे लहानसे पुस्तक घेतल्यास त्यातही श्लोकाखाली संशिप्त अर्थ असतो आणि पुढे अभ्यासण्यासाठी अनेक विद्वांनाची विस्तृत विवेचने भाष्ये उपलब्ध आहेत. तेच ज्ञान संत ज्ञानेश्वरानी (ज्ञानेश्वरी) विस्तृतरूपात मराठी माणसासाठी लिहिले तशीच एका संस्कृत श्लोकाला एक मराठी श्लोक या साच्यात विनोबा भावे यांनी गीताई सुद्धा लिहिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com