रुग्ण का पळतात?

jalgaon-digital
6 Min Read

कोवीड केअर सेंटर असो की, विलगीकरण कक्ष हे नागरिकांच्या सुविधेसाठी आहेत. असे असतांना अशा कक्षांमधून रुग्ण पळण्याचे प्रकार अधून मधून घडत आहेत. याठिकाणी असुविधा असून निकृष्ठ दर्जाचे जेवण मिळते. शिवाय राहण्यासारखी व्यवस्था नाही, चांगली वागणूक मिळत नाही असे पळून जाणार्‍या रुग्णांचे म्हणणे आहे. यात कितपत तथ्य आहे. हे खरे की खोटे, या खोलात जाण्यापेक्षा अशा कक्षांमधून रुग्णांना पळून जाण्याची इच्छाच होणार नाही, हे कक्ष आपलेसे वाटतील असा प्रयत्न होणे गरजेचे आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशीच त्यांचीही अपेक्षा आहे.

करोना विषाणूने सर्वदूर धुमाकुळ घातला असून अजूनही कोरोनाबाबत संभ्रम अवस्था आहे. एकीकडे कोरोना हा बरा होणारा आजार असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात बाधितांची संख्या अद्याप कमी असल्यामुळेच आपण ‘सेफ झोन’मध्ये असल्याचे सरकार सांगते आहे. मात्र भारताची लोकसंख्या विचारात घेवून जागतीक आरोग्य संघटनेने देशातील संभाव्य बाधितांची आणि मृतांची जाहीर केलेली अंदाजी आकडेवारी ही लाखो-करोडोच्या घरात आहे. विशेष म्हणून अद्याप यावर अचूक निदान, लस न निघाल्याने सध्यातरी प्रतिकार क्षमता वाढीची औषधी आणि खबदारीशिवाय पर्याय नाही.

यासाठी तयार झालेले नवीन कायदे, शासनाच्या वेळोवेळी बदलत्या सूचना, यंत्रणेकडून होणारी अंमलबजावणी आणि नागरिकांमध्ये कोरोनाबाबत असलेले समज, या सार्‍यांबाबत संभ्रमच आहे. तरीही जिल्हा पातळीवर प्रशासकीय, आरोग्य, मनपा, ग्रामपंचायत यंत्रणा गावागावात घेत असलेले निर्णय, प्रबोधन आणि उपाय योजना यासाठीचे परिश्रम पाहता या सार्‍यांना कडक सलाम ठोकावा असेच आहे. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन, कर्मचारी, सफाई कामगार तसेच अत्यावश्यक सेवेतील सर्वच घटक जीवावर उदार होवून झटत आहे. मात्र आटोक्यात असली तरी बाधितांची वाढती संख्या हा सार्‍यांसाठीच चिंतेचा विषय आहे.

घाबरु नका, आम्ही आपल्या पाठीशी

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला त्याच कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून संजय यादव यांनी सूत्रे हाती घेतली. पहिल्या दिवसापासून जिल्ह्याचा अभ्यास करता करता सूक्ष्म नियोजनावर त्यांनी भर दिला. अशा महा संकटातही ते जनतेचे मनोधैर्य वाढवित आहेत. कधी कोरोना योध्यांना तर कधी बाधितांची संवाद साधून त्यांची हिम्मत वाढवीत आहेत. ते म्हणतात, ‘घाबरु नका, आम्ही आपल्या पाठीशी आहोत.’

कोरोनाचा संसर्ग त्यात असुविधांची बाधा : कोरोना हा बरा होणारा आजार असल्याचे सांगितले जात असले तरी कोरोनाबाबतची भिती अद्याप कमी झालेली नाही. कोरोनाचा संसर्ग झाला किंवा कोरोना बाधिताच्या संपर्कात आला तरी रुग्णाच्या छातीत धडधड सुरु होते. काही स्वमर्जीने तर काही नाईलाजाने कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल होतात. मात्र काही सेंटरमध्ये मिळणारी वागणूक, अस्वच्छता, निकृष्ठ जेवण यामुळे तेथून रुग्ण पलायन करीत असल्याचे बोलले जात आहे.

केअर सेंटर म्हणजे..

कोवीड, नॉन कोवीड, संशयी असे वेगवेगळे विभाग करून रुग्णांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. बाधितांच्या संपर्कात इतर रुग्ण येवू नये म्हणून स्वतंत्रपणे नॉन कोवडी हॉस्पिटलची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आणि तालुका पातळीवर काहीठिकाणी संशयीतांचे स्वॅब घेण्याची व्यवस्था आहे. यामुळे सुप्तावस्थेतील बाधित रुग्ण आता समोर येवू लागल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा वाढतो आहे. जिल्हा पातळीवरील यंत्रणा परिस्थितीनुरुप निर्णय घेवून शासन आदेशाची अंमलबजावणी करीत सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे.

तरीही काही ठिकाणी मात्र रुग्णांना असहकार्य, तिरस्काराची वागणूक, अस्वच्छता याचा अनुभव येवू लागल्याने कोवीड केअर सेंटर म्हणजे जणू कारागृह किंवा कारागृह तरी बरे अशी काहींची धारणा होवू लागली आहे. परवा नगाव येथील विलीगीकरण कक्षातून 15 जण पळात. नंतर त्यांना शोधून परत आणण्यात आले. परंतु पळालेल्या या रुग्णांनी काही लोकप्रतिनिधीं जवळ रडत रडत मांडलेली व्यथा ही देखील विचारात घेण्यासारखी आहे.

असुविधांबाबत लक्ष पुरवून रुग्णांना अशा कक्षांमध्ये राहण्याची इच्छा होईल. त्यांची मानसिकता खराब होणार नाही, असा प्रयत्न प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे. याठिकाणी त्यांच्यावर उपचार होवून किंवा त्यांना काही दिवस इतरांपासून वेगळे ठेवून संपर्काची साखळी खंडीत करता येवू शकते यासाठीच अशा कक्षांची निर्मिती आहे. काही विलगीकरण कक्ष हे एकांतात असल्यामुळे तेथे असुविधांसह विषारी सर्प किंवा अन्य भिती रुग्णांच्या मनात निर्माण होते आहे. हे कक्ष आपल्या सुविधेसाठी आहे, असा विश्वास निर्माण करुन देतांनाच आपल्याच व्यक्तींसोबत राहत असल्यासारखी अनुभूती आल्यास रुग्णांच्या पळण्याचे प्रमाण कमी होईल. किंबहूना रुग्णांना पळून जाण्याची इच्छाच होणार नाही. असा प्रयत्न प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे.

माणूसकीचे दर्शन व्हावे

परस्परांच्या संपर्कातून कोरोनाची बाधा होते हे खरे. त्यामुळे खबरदारी घेतलीच पाहिजे हेही खरे. परंतु याचा अर्थ कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची हेटाळणी करणे, त्यांचा तिरस्कार करणे किंवा त्यांनी जणू एखादा मोठा गुन्हा केल्यासारखे अपराधी म्हणून त्यांच्याकडे पाहणे हे चुकीचे आहे. अनेक वर्षांपासून शेजारी राहणार्‍या, ऐकमेकांच्या घरातील भाज्या देखील वाटून खाणार्‍यांमध्ये कोरोनामुळे अंतर पडल्याचे दिसते आहे. बाधिताच्या परिवाराशी संबंधच तोडले जात असून जणू त्यांना वाळीत टाकल्याचा अनुभव येतो आहे.

अर्थात बाधितांच्या संपर्कात येवू नये, किमान 14 दिवस अथवा काही दिवस संपर्क होवू नये ही खबरदारी आहे. परंतु याचा अर्थ संबंधच तोडणे असा होत नाही. बाधितांच्या घराकडेही अशा पध्दतीने बोटे दाखविली जात आहे की जणू या घरातून अवैध वस्तुंचा साठा अस्तगत केला किंवा याच घरात हे कांड घडले अशा पध्दतीने चर्चा होते आहे, ही बाब निश्चितच चुकीची आहे.

संकटातच माणूसकीचे खरे दर्शन घडते. अशावेळी धावून येणारे, मदतीसाठी झटणारे देखील अनेक योद्ये कोरोनाची भिती झुगारुन माणुसकी जपत आहे. आता हातात हात घालून नसली तरी संकटात साथ देवून आपल्याला हे नाते जपायचे आहे. त्यामुळे एखाद्याला कोरोनाची बाधा झाली म्हणजे खूप मोठे संकंट कोसळले असे नव्हे, तर आम्ही आपल्या सोबत आहोत. अंतर ठेवून का होईना हाक द्या, साद द्यायला तयार आहोत. हा विश्वास निर्माण करण्याची हीच वेळ आहे. कारण आज त्यांच्यावर तर उद्या आपल्यावर हा प्रसंग येवू शकतो. कोरोना विषाणू कुणाची जात-पात, धर्म किंवा गरीब-श्रीमंत असा भेद जाणत नाही.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *