Friday, April 26, 2024
Homeब्लॉगअपघात भीषण का बनताहेत !

अपघात भीषण का बनताहेत !

रस्त्यांचे जाळे विकसित होणे आणि प्रवास वेगवान, सुकर होणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र ही सकारात्मकता लक्षवेधी ठरत असताना रस्ते अपघातांची, त्यातल्या गंभीर जखमींची-मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या काळजी वाढवणारी आहे. एखाद्या अवजड वाहनाने चाळीस वाहने चिरडल्याची किंवा तत्सम घटना रस्ते हे मृत्यूचे सापळे बनत असल्याची प्रवाशांची भीती अवाजवी नसल्याचे सातत्याने दाखवून देत आहेत. या समस्येवर मात कशी करणार?

डॉ. अनंत सरदेशमुख

एकीकडे दळणवळण यंत्रणा सुधारणे, दररोज ‘काही शे’ किलोमीटरचे रस्ते बांधून पूर्ण होणे, गावखेड्यांना जोडणार्‍या रस्त्यांचे जाळे विकसित होणे आणि याचा परिणाम म्हणून कमी वेळेत अधिकाधिक अंतर कापून प्रवास वेगवान आणि सुकर होणे हे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र ही सकारात्मकता लक्षवेधी ठरत असताना रस्ते अपघातांची वाढती संख्या आणि त्यात गंभीर जखमी होणार्‍या वा मृत्युमुखी पडणार्‍यांचे वाढते प्रमाण काळजी वाढवणारे ठरत आहे. अतिवृष्टीमुळे झालेली रस्त्याची दुरवस्था, खड्डे चुकवताना होणारे अपघात, बेशिस्त वाहतुकीचा फटका, सदोष रस्तेबांधणी, रस्तेबांधणीसाठी वापरला जाणारा निकृष्ट माल हे आणि यासारखे अनेक मुद्दे याअनुषंगाने समोर येतात. म्हणूनच याचा परामर्श घेणे गरजेचे ठरते.

- Advertisement -

रस्तेबांधणीमध्ये मोठ्या चुका असणे हे रस्ते अपघातांमागील एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. पूल, उड्डाणपूल, सर्व्हिसरोड्स, पर्यायी रस्ते यांच्या नियोजनात कधी कधी बर्‍याच त्रुटी राहिलेल्या दिसतात. खरे पाहता एखादा रस्ता बांधत असताना पुढल्या पाच-दहा वर्षांचा नव्हे तर 50 वर्षांचा विचार करणे गरजेचे असते.

आपल्या रस्त्यांवर मोठ्या वाहनांची, अवजड वाहनांची ये-जा असते. खेरीज बरेचदा या रस्त्यांवरून बैलगाड्या, ट्रॅक्टरही जातात. अशा वाहनांसाठी रस्ते बांधलेले नसूनही राजरोस वाहतूक सुरू असते. साहजिकच असे रस्ते लवकर खराब होतात आणि अपघाताला आमंत्रण देतात. म्हणूनच अशा गाड्यांसाठी सर्व्हिसरोड वा अन्य सोय करण्याचा विचार करणे गरजेचे आहे. या वाहनांना मुख्य रस्त्यावर येण्यास मज्जाव करायला हवा. सुरक्षेच्या दृष्टीने हे अत्यंत गरजेचे आहे, कारण अशा वाहनांमधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते. बरेचदा माल धोकादायक पद्धतीने रचला जातो. पण हे तपासायची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नाही. वाढत्या रस्ते अपघातांमागील हे एक मोठे कारण आहे. आपल्याकडील बरेच रस्ते गावांमधून जातात. ‘बायपास’ ही संकल्पना तितकीशी रुजलेली नसल्याने अवजड वाहनेही गावांमधल्या रस्त्यांवरूनच प्रवास करतात. म्हणजेच गावातली वाहने, खेरीज बाहेरून येणारे वाहन या सगळ्याचा ताण रस्त्यांच्या या ठराविक भागांवर येतो आणि त्यांचे आयुष्य कमी होते. हा ताण वाहतुकीच्या दृष्टीनेही अयोग्य असतो. बेशिस्त वाहतुकीमुळे अडचणींमध्ये भर पडते आणि विशिष्ट भाग अपघातप्रवण ठरतो. अशावेळी वाहनांच्या गतीवर परिणाम होतो आणि प्रदूषणासारख्या गंभीर समस्याही उद्भवतात.

गावाशेजारून जाणारे महामार्ग वा द्रुतगती मार्ग पाहिले तर निरनिराळ्या ठिकाणी चार वा सहा मार्गिका असल्या तरी दुभाजकापाशी बर्‍याच ठिकाणी रस्ता ‘पंक्चर’ केला जातो, म्हणजेच डाव्या-उजव्या भागातल्या लोकांना ये-जा करण्यासाठी वाट काढून दिली जाते. अशा पद्धतीने महामार्गावर तोडली जाणारी ही ठिकाणे अपघातप्रवण होण्याचा मोठा धोका निर्माण होतो. असे रस्ते वाहतुकीसाठी प्रचंड असुरक्षित बनतात कारण महामार्गावरील वाहने एका ठराविक वेगाने पुढे जात असतात. त्यात अचानक मधे कोणी आल्यास चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते आणि मोठा अपघात संभवतो. या धोकादायक परिस्थितीवर तोडगा काढल्यासही रस्ते अपघातांची शक्यता कमी होण्यास मोठी मदत होईल. कोणताही विचार न करता रस्ते तोडणे, जाण्या-येण्यासाठी वाट काढून देणे टाळले तरी बर्‍याच अंशी हा धोका कमी होईल. खेरीज रस्त्यांवर गुरे न येण्याची दक्षता घेणेही गरजेचे आहे.

रस्ते वाहतुकीचे नियमन करणारी आणि नियमभंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करणारी यंत्रणा कार्यान्वित करणे हादेखील रस्ते अपघात कमी करण्याचा एक मार्ग आहे. काही प्रमुख रस्त्यांवर स्पीड गन असल्या तरी त्यात माहितीचे संकलन होऊन तो पुढे पाठवण्याची आणि तिथे त्याचा उपयोग केला जाऊन नियम तोडणार्‍यांवर काय कारवाई केली जाते, याबाबत समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. मोटार अ‍ॅक्टमध्ये काही बदल केले असले आणि नियम मोडणार्‍या चालकांवरील दंड वाढवला असला तरी ते पुरेसे नाही. याचे उदाहरण म्हणजे सिग्नल तोडल्यास आपल्याकडे दोन-चारशे रुपयांचा दंड केला जातो. पण अनेकजण हा नियम मोडतात आणि अडवल्यानंतर प्रसंगी तडजोड करून वा दंडाची रक्कम भरून पुढे निघून जातात. दुचाकी वाहन दोन प्रवाशांसाठी असूनही त्यावर तीन-चारजण बसून जातात. त्यांना जरब बसवणारी यंत्रणा आपल्याकडे नाही. वाहन चालवण्याचा परवाना काढून घेणे वा रद्द करण्यासारखी शिक्षा झाली तरी दुसर्‍या मार्गाने परवाना मिळवणारे अनेक महाभाग आहेत. म्हणजेच बेशिस्त हेच अपघातांमागील मूळ कारण असून ती कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना गरजेची आहे.

वेगमर्यादा नोंदणारी यंत्रणा असली तरी ती कुठे बसवली आहे, हे चालक जाणतात. त्यामुळेच केवळ तिथेच वाहनाचा वेग मर्यादेत ठेवणे आणि नंतर वेगाने गाडी हाकण्याचे प्रकार सर्रास घडतात. परदेशातल्या कुठल्याही रस्त्यावर गेल्यास कुठल्या क्षणाला गाडीचा वेग किती होता हे समजू शकते आणि काही क्षणातच पोलीस ती थांबवून तुमच्यावर कठोर कारवाई करतात. ती विनाविलंब असते. आपल्याकडे तितकी प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होण्यास नक्कीच काही अडचणी आहेत. बजेटचा प्रश्न गंभीर आहे. एक उदाहरण द्यायचे तर मागे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कॉपी काढायला मशीन होते. पण बरेचदा कॉपी काढायला पेपर उपलब्ध नसायचे. आपण दोन-दोन फुटांवर पोलीस ठेवू शकत नाही. म्हणूनच वाहतुकीला शिस्त लावणारे तंत्रज्ञान विकसित होणे अत्यंत गरजेचे आहे.

रस्ते बांधकामातही अनेक त्रुटी राहतात, हे लक्षात घेता बांधकामापूर्वीच सगळ्या शक्यतांचा विचार व्हायला हवा. रस्त्याचा तीव्र उतार टाळणे गरजेचे आहे. यासंबंधी आपल्याकडील भूसंपादनाची समस्याही लक्षात घ्यायला हवी. बरेचदा मिळतील तेवढ्या जमिनींमधून रस्ता काढण्याचे दिव्य साकारावे लागते. त्यामुळेही काही त्रुटी राहतात. एखादे धोकादायक वळण घेण्यावाचून पर्याय राहत नाही. या अडचणी कमी करण्याच्या दृष्टीनेही विचार व्हायला हवा. शेवटी रस्ता ही समाजाच्या वापरासाठी असणारी बाब आहे. त्यामुळे निर्दोष रस्त्यासाठी भूसंपादन कायद्यामध्ये काही आवश्यक बदल करण्याचीही गरज आहे. असे काही बदल झाले असले तरी त्याची अंमलबजावणी होण्यात अद्यापही बर्‍याच अडचणी आहेत. त्या दूर होणे गरजेचे आहे.

रस्त्यावर येणार्‍या वाहनांची स्थिती काय, याचाही विचार अपघातांची संख्या कमी करण्यास कारक ठरू शकतो. वाहनांचे पासिंग किती काटेकोरपणे होते, त्यासाठी लागणारी अद्ययावत यंत्रणा आपल्याकडे आहे का, याचाही विचार व्हायला हवा. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ओव्हरलोडिंग हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषत: एखादा अवघड घाट वा चढ सुरू होण्यापूर्वी अवजड वाहनांची तपासणी व्हायला हवी. गाड्यांना लाईटस् आहेत का, ब्रेक्स ठीक आहेत का आदी तपासायला हवे. ड्रायव्हरची तपासणी होणे गरजेचे आहे. बरेचदा कमी वेळेत अंतर कापण्यासाठी डोळ्यावर झापड असतानाही गाडी चालवली जाते. विश्रांतीची सोय नसल्यामुळे अनेक चालक वाहन पुढे दामटवतात आणि त्यातून भयावह अपघात घडतात.

थोडक्यात, रस्ते अपघातांचे प्रमाण आणि तीव्रता कमी करण्यासाठी अशा सर्व बाजूंनी विचार होणे गरजेचे आहे. तरच रस्ते हे मृत्यूचे सापळे न बनता वाहतुकीचे सुखकर साधन ठरेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या