को S जार्गति ? को S जार्गति ?

कोजागिरी पौर्णिमा!
को S जार्गति ? को S जार्गति ?

को S जार्गति ? को S जार्गति ? कोण जागे आहे. हे शब्द वाचल्यावर आपल्याला आठवते ती कोजागिरी पौर्णिमा...त्याबद्दल थोडेस..

लक्ष्मी पृथ्वीवर येते तेव्हा ती को जागर्ति शब्द उच्चारते याचा अर्थ कोण जागे आहे? असा होतो. कोण सजग आहे, ज्ञानासाठी आतुर आहे. असे देवी विचारत येते.

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा हा एक विशेष सण मानला जातो. या दिवशी आकाशातून अमृताचे थेंब पडतात अशी धार्मिक श्रध्दा आहे. ही पोर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या तिथीला मध्यरात्री किंवा निशी काळात पूजा केल्यास देवी लक्ष्मीचा आशिर्वाद मिळतो असे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाने कोजागिरी पौर्णिमेला महारासलीला रचली अशी अख्यायिका आहे. या दिवशी चंद्र देवाची विशेष पूजा केली जाते आणि दूध केलं जात.

रात्रीच्या वेळी हे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते असे केल्याने दूध अमृता सारखे बनते अशी मान्यता आहे. या दिवशी दूध आटवून त्यात केशर पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडा, जायफळ ,साखर, वगैरे करून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केलं जाते. उत्तर रात्री पर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून अश्विनी साजरी करतात.

या दिवशी चंद्र १६ कलांनी परिपूर्ण असल्याने या रात्रीचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे.

या वेळेला सगळे नातेवाईक किंवा शेजारचे मित्र मंडळी चंद्राच्या प्रकाशात गप्पागोष्टी करत गाण्यांच्या भेंड्या खेळत व कोजागिरी साजरी करतात. आमच्या लहानपणी आम्ही या दिवशी ३२ खाऊ करत असू. उदा. चकली, चिवडा, लाडू, बिस्कीट याचा भुलाबाईला नैवेद्य दाखवत आणि दुसऱ्या दिवशी भुलाबाई आपल्या घरी जात असे . विविध प्रांतानुसार कोजागिरी पौर्णिमा विविध पद्धतीने साजरी करतात.

गुजरात मधे गरबा खेळून 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते.

मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते.

या निमित्ताने नव्याने लग्न झालेल्या मुलीच्या घरून तिच्या सासरी जावयासाठी भेटवस्तू पाठविण्याची विशेष पद्धत प्रचलित आहे.

हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते.

राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात.

धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात.

हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.

ओडिशामध्ये, शरद पौर्णिमेला 'कुमार पौर्णिमा' असे म्हणतात.या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात.या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते.

कोजागरी पौर्णिमेला बंगाली लोक 'लोख्खी पुजो' असे म्हणतात. या दिवशीच्या लोख्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दूध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष्मीला अर्पण केला जातो.

तांब्याचा कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळ्यावर शेंदराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह मधल्या बोटाने आणि ओल्या लाल शेंदुराने काढतात या दिवशी शंख व कमळाच्या फुलाबरोबर  श्रीलक्ष्मीनारायणाची पूजा करतात.

आज-काल बऱ्याच परंपरा या काळाच्या पडद्याआड जात आहे म्हणून या लेखनाचा अट्टाहास. आपली संस्कृती परंपरा आपणच जपली पाहिजे. त्यासाठी खास वेळ काढला तर काही हरकत? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्त्वाचं तरच पुढची पिढी ही परंपरा पुढे नेईल.

अश्विने शुक्लपक्षे तु भवेद्या चैव पूर्णिमा ।

तद्रात्रौ पूजनं कुर्याच्छियो जागृतिपूर्वकम् ।

निशीथे वरदा लक्ष्मीः को जागर्तीति भाषिणी ।

जगति भ्रमते तस्यां लोकचेष्टावलोकिनी ।

तस्मै वित्तं प्रयच्छामि यो जागर्ति महितले ॥

सगळंयाना कोजागिरी पौर्णिमेचा शुभेच्छा..

सौ.आरती राजेश धर्माधिकारी, नवी मुंबई

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com