Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगमतटक्का कधी वाढणार?

मतटक्का कधी वाढणार?

देशातील मतदार संख्यावाढीची माहिती नुकतीच जाहीर झाली आहे. त्यानुसार गेल्या सात दशकांत भारतीय मतदारांची संख्या सहापटीने वाढली आहे. एकूण मतदार संख्या 94.50 लाखांवर पोहोचली आहे. ‘मतदान करण्यासारखे दुसरे काही नाही. हमखास मतदान करू’ असे यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे घोषवाक्य आहे. अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे, पण त्या प्रयत्नांना मतदारांकडून अजूनही पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. मतदारसंख्येत वाढ झाली, पण मतटक्‍का कधी वाढणार?

निवडणुका हा भारतीय लोकशाहीचा महोत्सव मानला जातो. वेगवेगळ्या राज्यांत विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांच्या रूपाने तो वर्षभर साजरा केला जातो. लोकशाहीच्या महोत्सवात सर्व मतदारांनी मनापासून सहभागी व्हावे, मतदानाचा हक्क बजावून भारतीय नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावे, अशी रास्त अपेक्षा ठेवली जाते. प्रत्येक मतदाराने मतदान करावे, असा आग्रह धरला जात असला तरी मतदानासाठी कोणाला सक्ती करता येत नाही. साहजिक मतदानाला दुय्यम स्थान देणार्‍या मतदारांचे प्रमाण मोठे आहे.

- Advertisement -

मतदानाच्या दिवशी सर्व कामे बाजूला ठेऊन सर्वात आधी मतदान करणे अपेक्षित असताना बरेच जण त्याउलट कृती करतात. मी एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडतो? असा उदासीन दृष्टिकोन बाळगणारे लोक समाजात आढळतात. मतदानाबाबतच्या याच नकारात्मकतेमुळे 72 वर्षे लोटूनदेखील बहुतेक निवडणुकांतील मतदानाची टक्केवारी 70 च्या पुढे जाऊ शकलेली नाही. अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे प्रयत्न निवडणूक आयोगाकडून वर्षानुवर्षे केले जात आहेत, पण त्या प्रयत्नांना अजूनही पुरेसे यश आलेले नाही. देशातील अर्धी लोकसंख्या मानल्या जाणार्‍या महिलांनी पुरुषांना अनेक क्षेत्रात मागे टाकले आहे. त्याला मतदानही अपवाद राहिलेले नाही.

भारताच्या पहिल्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 जानेवारी 1950 या दिवशी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाचा स्थापना दिवस 2011 सालापासून ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आपण मतदार आहोत, मतदार म्हणून आपले काही हक्‍क आणि त्यासोबतच जबाबदार्‍याही आहेत याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने मतदार दिवस साजरा केला जातो. यंदा हा दिवस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोगाने मोठ्या प्रमाणात साजरा केला.

मतदार दिवसानिमित्त देशातील मतदार संख्यावाढीची माहिती जाहीर झाली आहे. गेल्या सात दशकांत भारतीय मतदारांच्या संख्येत सहापट वाढ झाली आहे. 1 जानेवारी 2023 पर्यंत देशातील एकूण मतदार संख्या 94.50 लाखांवर पोहोचली आहे. अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध प्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत, पण त्या प्रयत्नांना मतदारांकडून अजूनही पुरेसा प्रतिसाद मिळत नाही. निवडणुकांमध्ये 75 टक्के मतदान व्हावे, असे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे.

तथापि गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 67 टक्के मतदान झाले होते. म्हणजे एकूण मतदारांपैकी 33 टक्के मतदार मतदानापासून दूर राहिले होते. सुमारे 100 कोटी मतदारांपैकी 33 टक्के मतदार आजही मतदानापासून दूर राहणे का पसंत करत असतील? करोना महामारीच्या कठीण काळातसुद्धा निवडणूक आयोगाने अनेक राज्यांच्या निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्या, पण मतदानापासून दूर राहणार्‍या मतदारांना मतदानास राजी करणे हे आयोगापुढचे कदाचित सर्वात मोठे आव्हान असावे.

राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांना फक्त निवडणुका आल्यावरच मतदारांची आठवण होते. किंबहुना मतदारांचे महत्त्व केवळ निवडणुकीपुरते आहे, असा गैरसमज त्यांनी करून घेतला असावा. मतदारांना मतांसाठी आवाहन करणारे राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतदार जागृतीसोबतच बिनचूक मतदान कसे करावे? मत बाद होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?

याबाबतसुद्धा मतदारांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. चुरशीच्या निवडणुकांमध्ये शे-पन्नास मतांच्या फरकाने उमेदवार विजयी अथवा पराभूत झाल्याची कितीतरी उदाहरणे पाहावयास मिळतात. नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतसुद्धा अवैध मतांची संख्या मोठी असल्याचे आढळून आले. सुशिक्षित मतदारांच्या निवडणुकीतील ही स्थिती अनपेक्षित आहे.

देशाच्या वेगवेगळ्या भागात निवडणुकांसाठी मतदान अधिकारी आणि सेवक प्रतिकूल परिस्थिती व अडचणींवर मात करत मतदान केंद्रांपर्यंत पोहोचतात. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून कधी रस्तामार्गे, कधी नावेने तर कधी डोंगर चढून प्रयत्नशील असतात. मतदार याद्या पुनरिक्षण आणि मतदार नोंदणी कार्यक्रम नियमित घेतला जातो, पण नावनोंदणी केल्यानंतर मतदार यादीत आपले नाव आहे का? असेल तर ते बिनचूक नोंदवले गेले आहे का? याची खातरजमा किती मतदार करतात?

निवडणूक लढणार्‍या उमेदवारांच्या उमदेपणाचा गाजावाजा प्रचारातून सतत केला जातो, पण अमूक एका पक्षाचा उमेदवार म्हणून ज्याला मतदान करण्याची इच्छा आहे तो उमेदवार नेमका कसा आहे? याची माहिती किती मतदार घेतात? उमेदवारांवर पोलीस ठाण्यात किती आणि कोणते गुन्हे दाखल आहेत? याची माहिती हल्ली निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या माहितीसाठी लावली जाते. ती माहिती वाचून मगच मतदारांनी मतदान करावे, अशी त्यामागची अपेक्षा आहे, पण ती माहिती वाचून कितीजण मतदान करतात?

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी 33 कोटी मतदार मतदानापासून दूर राहिले. या मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान निवडणूक आयोगापुढे आहे. त्यासाठी आयोग विविध पातळ्यांवर सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येते. मतदार जागृतीचे प्रयत्न सतत सुरू राहिले पाहिजेत. मुख्य म्हणजे सदोष मतदार याद्या हे मतदान प्रक्रियेतील जुने दुखणे आहे. ते दुर्लक्षितच राहिले आहे. ते दुखणे बरे व्हावे असे वाटत असेल तर प्रत्येक मतदारसंघाच्या मतदार याद्या निर्दोष, अद्ययावत व अचूक होतील याला प्राधान्य दिले पाहिजे.

निवडणूक आली की लोक मतदानासाठी उत्साहाने जातात, पण मतदान केंद्रावर मतदार याद्यांत आपले नाव शोधता-शोधता त्यांच्या नाकीनऊ येते. काहीजणांना तर नाव न सापडल्याने मतदान न करताच माघारी परतावे लागते. मतदार याद्यांतील गडबडगोंधळ नेहमीचाच झाला आहे. दुबार नावे कमी करण्यावर निवडणूक आयोगाने भर दिला आहे, पण मतदार याद्या मतदारांच्या नावासह इतर माहिती परिपूर्ण आणि बिनचूक असेल याकडेसुद्धा आयोगाने लक्ष पुरवले पाहिजे. मात्र सदोष मतदार याद्यांबाबत ओरड अथवा लोकशाही धोक्यात असल्याबाबत चिंता व्यक्त करणारे लोक लोकशाहीला पोषक ठरेल अशी अनुकूल वर्तणूक किती निष्ठेने व प्रामाणिकपणे करतात? ‘मी एकट्याने मतदान नाही केले तर काय फरक पडतो?’ असे म्हणणार्‍यांची संख्या लोकशाहीच्या दुर्दैवाने वाढत आहे.

निवडणुका घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. पूर्वी मतपत्रिका आणि मतपेट्यांची व्यवस्था करावी लागत असे. मतदान करून मतपत्रिकेची व्यवस्थित घडी घालून ती मतपेटीत टाकण्याची कसरत आता थांबली आहे. मतदान प्रक्रियेत आधुनिकता आली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मनपसंत उमेदवाराला मतदान करणे सुलभ झाले आहे.

निवडणूक लढवणार्‍यांपैकी एकही उमेदवार मतदाराला पसंत नसेल तर तसे मत नोंदवण्याचा अधिकार आणि सुविधा मतदान यंत्रावर ‘नोटा’ बटणाचा पर्याय देऊन आयोगाने केली आहे. मतमोजणीही सोपी झाली आहे. पूर्वी प्रत्येक मतपेट्या उघडून मतपत्रिकांचे गठ्ठे करून त्यांची मोजणी करावी लगत असे. त्यात बराच वेळ जात असे. मतदान यंत्रांमुळे मतमोजणीसाठी लागणारा वेळ घटला आहे. मतमोजणी अधिक वेगवान आणि अचूक करणे शक्य झाले आहे. अवघ्या काही तासांत निकाल हाती येतात.

आपल्या मतदारसंघातून निवडून आलेला उमेदवार योग्य नाही, असे म्हणण्यात मतदान करण्याचे कष्ट न घेणारे लोक सर्वात पुढे असतात. वृद्ध, अपंग मतदार नातलगांच्या मदतीने आवर्जून मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करताना दिसतात. ते चित्र तरुण मतदार तसेच मतदानाबाबत नकारात्मक भूमिका घेणार्‍यांना प्रोत्साहित करणारे असते. तरुणाई ही देशाचे उद्याचे भविष्य आहे. म्हणून मतदानाबाबत जागरुकता बाळगणे ही तरुणांची विशेष जबाबदारी ठरते. मतदान न करणार्‍यांना असे म्हणण्याचा हक्क उरत नाही.

आपण राहतो त्या मतदारसंघातून चांगला, कार्यक्षम आणि लोकहिताला प्राधान्य देणारा उमेदवार निवडून यावा, असे मनापासून वाटत असेल तर असे वाटणार्‍या प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे. आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका येणार आहेत. ती संधी साधून त्यावेळी भारतीय नागरिक म्हणून मतदानाचे कर्तव्य बजावण्याचा निर्धार आतापासूनच सर्व मतदारांनी करावा. तो निर्धार निवडणुकांमध्ये मत टक्‍का वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांना उपयुक्त तसेच बळ देणारा ठरेल. ‘मतदान करण्यासारखे दुसरे काही नाही. हमखास मतदान करू’ असे यावर्षीच्या मतदार दिवसाचे घोषवाक्य आहे. मतदारांना ते किती भावते ते पाहायचे. मत टक्का वाढल्यास मतदारांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकणारे मजबूत सरकार त्या-त्या राज्याला आणि देशाला मिळू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या