बाल विवाहाची मानसिकता बदलणार कधी?

कापडणेतील घटनेने पुन्हा समोर आले वास्तव, मुलीच्या आईचीच तक्रार असतांना गुन्हा दाखल करण्यात झाला विलंब
बाल विवाहाची मानसिकता बदलणार कधी?

धुळे- बाल विवाह रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. वेगवेगळ्या अशासकीय समित्या देखील यासाठी कार्यरत आहेत. असे असतांना आजही बालविवाह होतांना दिसतात. बर्‍याच ठिकाणी दोन्ही कुटुंबियांच्या सामंजस्याने असे विवाह होतात. अशीच एक घटना धुळे तालुक्यातील कापडणे गावातील समोर आली आहे.

या घटनेने बाल विवाहाच्या संदर्भातील जळजळीत वास्तव समोर आले आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी यासंदर्भात अत्यंत गांभीर्याने दखल घेवून बालविवाहाशी संबंधित वेगवेगळ्या घटकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशा आशयाचे शासकीय परिपत्रक जारी केले आहे.

यामुळे केवळ दोन्ही कुटुंबियांनाच नव्हे तर अनेकांना गुन्हेगारीच्या चौकटीत आणण्यात आले आहे. आतातरी बालविवाह संदर्भात गांभीर्य घेतले जाईल, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होते आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात बालविवाहासाठी मंगल कार्यालय देणारे, त्यांचे लग्न लावणारे पुराहित तसेच मंडपवाले, बँड पथक, फोटो ग्राफर्स यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेला दिले आहे. त्यामुळे आता कुठल्याही लग्नकार्यात सेवा देतांना व्यावसायीकांना वधुवरांच्या वयाची खात्री करुन घ्यावी लागणार आहे. गुन्हे आणि चौकशीच्या या फेर्‍यातून वर्‍हाडीही सुटलेले नाहीत. अशा बालविवाहाच्या लग्न पत्रिका छापल्या गेल्यास, पत्रिकेत नावे असणार्‍या संबंधित नातेवाईकांना देखील यासाठी जबाबदार धरले जाणार आहे. तृप्ती धोडमिसे यांचा हा आदेश विवाह समारंभासाठी कार्यालये व साहित्य उपलब्ध करुन देणार्‍यांमध्ये खळबळ माजविणारा असला तरी यामागे बालविवाह रोखले जावेत हाच मुख्य उद्देश आहे.

ऐकीकडे आम्ही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा केला. तर दुसरीकडे माहिती तंत्रज्ञानामुळे जगाशी स्पर्धा करु लागलो. आता अगदी गाव पाड्यावरही शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी ग्रामीण भागातही हात-पाय पसरले आहेत. उत्तम व दर्जेदार शिक्षण देणार्‍या संस्था आपल्या अवती भोवती निर्माण झाल्या आहेत. बहुतांशी पालकही आपल्या पाल्यांच्या बाबतीत कमालीचे जागृत झाले असतांना दुर्दैवाने आजही ग्रामीण भागात 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचा विवाह लावला जातो. याबाबतच्या घटना अधुन मधून समोर येतात. यापेक्षा दुर्दैव म्हणजे कुणी तक्रार केल्याशिवाय पोलीस प्रशासन अशा घटनांची दखलच घेत नाही, हेच वास्तव आहे.

कापडण्यातील घटना गंभीरच

धुळे तालुक्यातील कापडणे येथे 9 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या एका विवाहातील मुलीचे वय त्यावेळी 16 वर्ष 9 महिने होते. असे असतांना गावातील श्रीमंगल गार्डनमध्ये मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. त्यावेळी मुलीची विधवा आई देखील उपस्थित होती. मात्र आता याच विधवा महिलेने पोलिसात तक्रार करीत आपल्या अज्ञान मुलीला तिच्या सासरच्या जाचातून सोडविण्याची मागणी केली आहे. अर्थात आपल्यावर लग्नाच्यावेळी दबाव आणण्यात आला, जबरदस्तीने हा विवाह करुन घेण्यात आला, असा दावा ही महिला आज करीत असली तरी हा पोलीस चौकशीचा भाग होवू शकतो. मुळ मुद्दा बालविवाह झालाच कसा? यासाठी मध्यस्थी केली कोणी? त्यानंतरही तक्रार समोर आल्यानंतर सोनगीर पोलिसांनी तत्काळ दखल का घेतली नाही? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तेव्हा दखल का नाही?

कापडणे गावाती तक्रारीनंतर उघडकीस आलेल्या बालविवाहाच्या घटनेला वेगवेगळे अनेक कंगोरे आहेत. यासंदर्भात अनेक उलट सुलट चर्चाही होते आहे. काहीही असले तरी, बालविवाह झाला हे मात्र खरे. सोनगीर पोलिसांनी यासंदर्भात 5 मे रोजी 2023 रोजी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चे कलम 9,10,11 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सरकारी यंत्रणेतील ग्रामविकास अधिकारी नरेशकुमार तुकाराम सोनवणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे या बालविवाह संदर्भात मुलीची आई ही तीन महिन्यांपासून सोनगीर पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहे. मात्र त्यावेळी सोनगीर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपल्याला हाकलून दिले, हा गंभीर विषय असतांना देखील आपले म्हणणे ऐकून घेतले नाही असे या विधवा महिलेने कार्यकारी दंडाधिकार्‍यांसमक्ष लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ऐव्हढी गंभीर तक्रार समोर येवून देखील सोनगीर पोलीसांनी त्यावेळी दखल का घेतली नाही? आता गुन्हा दाखल होवू शकतो मग त्याचवेळी का दाखल केला नाही? असे प्रश्न चौकशीत समोर येत आहेत. कारण न्यायाची दाद मागण्यासाठी या महिलेला न्यायालयाची मदत घ्यावी लागली. अ‍ॅड.राहुल वाघ यांनी या महिलेचे म्हणणे ऐकून घेत त्यातले गांभीर्य ओळखून तत्काळ सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. प्रकरणातले वास्तव समजून घेत श्रीमती धोडमिसे यांनी बालकल्याण समितीलाही याबाबत चौधरीचे आदेश दिलेत. जिल्हा पातळीवरुन प्रशासनाने दखल घेतल्यानंतर तालुका पातळीवरील पोलीस यंत्रणा जागेवरुन हालते, ही देखील शासकीय कामकाजातील शोकांतिकाच म्हटली पाहिजे.

पालकांनो, अशी चूक करु नका!

मुलींनी वयात येतांना कोणती काळजी घ्यावी, इथपासून ते लैगींक शिक्षणापर्यंत आता खुलेआम चर्चा केली जाते. विवाहाचे वय कोणते असावे यावर सगळ्याच पातळीवरुन जनजागृती होत असतांना पालकांनी आपल्या मुलीचा विवाह करतांना तिच्या वयाच्या पूर्ततेची गांभीर्याने दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. 18 वर्षापेक्षा कमी वय असतांना विवाह केल्यास तो गंभीर गुन्हा असून यामुळे अनेकांना आरोपीच्या पिंजर्‍यात कोंडले जावू शकते. दोन्ही कुटुंबियांची अनुमती असली तरीही कमी वयात केलेले लग्न कायद्याला मान्य नाही. कापडणे गावातील घटनेत भलेही दोन्ही कुटुंबियांची समंती असलीतरी चूक ही चूकच आहे. याबाबजत कारवाई व्हायलाच हवी. हे प्रकरण राज्य महिला आयोगापर्यंतही पोहचल्याचे सांगितले जाते. त्यामुळे स्थानिक तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर ते कोणीही असो, त्यांचेही चेहरे उघड झाली पाहिजेत. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणात गांभिर्याने लक्ष घातलेच आहे. मात्र पुन्हा अशी हिम्मत कोणी करु नये, या दृष्टने तपासाला दिशा देण्याचीही आवश्यकता आहे.

तृप्ती धोडमिसे यांचे कौतुकच..

सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना या विषयातले गांभीर्य लक्षात येताच त्यांनी याबाबत चौकशीचे संबंधित यंत्रणेला आदेश दिलेत. प्रकरण बालकल्याण समितीकडेही रवाना केले. ऐव्हढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी बालविवाहाच्या संदर्भात अतिशय सक्त आदेश पारित करुन बालविवाहात सहभागी होणारे मंगल कार्यालय वाले, पुरोहित, बँड पथक, फोटोग्रर्फस आणि सहकार्य करणार्‍या इतरांवरही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय प्रशासन सेवेची धुळ्यातील पहिलीच पोस्टिंंग असतांना नव्या दमाच्या तृप्ती धोडमिसे यांनी आपल्या कामाची छाप पाडणे सुरु ठेवले आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अशा एकाच वेळी अनेक जबाबदार्‍या पेलतांना त्यांनी कायद्याला अपेक्षित काम करतांना अनेकांना घाम फोडला आहे. प्रशासनातील सक्त अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. तेव्हढ्याच त्या संवेदनशिल हळव्या मनाच्या अधिकारी आहेत. मात्र वेगवेगळ्या भूमिका वठवूनही कर्तव्यात कसूर न करणार्‍या धोडमिसेंचे जाहीर कौतुक करायलाच हवे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com