Saturday, April 27, 2024
Homeब्लॉगफॉर्मात कधी येणार?

फॉर्मात कधी येणार?

डॉ. अरुण स्वादी

आयपीएल 2020-21ने भारतीय क्रिकेट निश्चितपणे समृद्ध केले आहे. ऋतुराज गायकवाडसारखा (Rituraj Gaikwad) पैलू पाडलेला आघाडीचा फलंदाज त्यांना गवसला. आपल्या पहिल्याच मोसमात एखाद्या अनुभवी खेळाडूप्रमाणे फलंदाजी करणारा व्यंकटेश अय्यरसारखा तडफदार ओपनर त्यांना मिळाला.

- Advertisement -

भारतसारखा चांगला यष्टिरक्षक फलंदाज सापडला. शिवाय ब्रावोच्या विक्रमाची बरोबरी करणारा हर्षल पटेल एक मोठा पर्याय देऊन गेला. 152 किमी वेगाने गोलंदाजी करणार्‍या मलिकने सर्वांना, जे पाहिले ते स्वप्न तर नव्हे, अशी अनुभूती दिली, पण आयपीएल (ipl) धूमधडाक्यात गाजवूनही आणि ऑरेंज व परपल कॅप जिंकूनही यांच्यापैकी कोणालाही भारतीय संघात संधी मिळालेली नाही. काहींना दुबईत थांबायला सांगितले आहे, पण अजूनपर्यंत संघात समावेश झाल्याची बातमी नाही.

येऊन-जाऊन अक्षर पटेलला नारळ देऊन शार्दुल ठाकूरची (Shardul Thakur) वर्णी लावण्यात आली. ते अपेक्षित होते. कारण तसेही एक फिरकी अष्टपैलू जास्त निवडला गेला होता आणि एक वेगवान कमी! शिवाय फॉर्मातल्या जडेजाला फक्त संजय मांजरेकर नाव ठेऊ शकतो. एरव्ही कोहली रोहितएवढे त्याचे स्थान अढळ आहे.

हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) काढा, अशी सार्वत्रिक ओरड चालू होती, पण अजूनतरी त्याच्या केसालाही धक्का लागलेला नाही. त्याचे केस लहान आहेत म्हणून नव्हे तर धोनी सरांच्या निवृत्तीनंतर आम्हाला फिनिशरची उणीव भासते आहे म्हणून. एक जडेजा सोडला तर 15 चेंडूत 35 धावा चोपणारा मधल्या फळीतला फलंदाज आपल्याकडे नाही.

त्यामुळे बॅट आणि बॉलची गळामिठी होत नसतानाही हार्दिकला संघात ठेवणे भाग पडते आहे. तो फॉर्मात आला तर आमची फलंदाजी अचानक बलवान वाटायला लागेल. जाणार-जाणार म्हणून ज्याच्या नावाची चर्चा चालू आहे तो राहुल चहर अजूनपर्यंत तरी जागा राखून आहे. राहुलला दुसरा हाफ फार वाईट गेला.

त्याच्या मुंबई इंडियन्सनेसुद्धा (MI) त्याला काढले आणि कधीकाळी भारतीय संघात खेळलेल्या पीयूष चावलाला संघात घेतले. इतका अनर्थ होऊनही चहर संघात आहे आणि गल्फमध्ये अप्रतिम फिरकी गोलंदाजी टाकणार्‍या युझवेंद्र चाहलला मात्र संघात स्थान मिळत नाही. निवड समितीची चेष्टा केल्याची ही शिक्षा तर नव्हे? वरुण चक्रवर्ती फिट राहो आणि त्याची जादू चालो, एव्हढीच प्रार्थना आहे. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव अगदी योग्यवेळी फॉर्मात आले. एरव्ही त्यांची गच्छंती अटळ होती, पण आता दोघानाही सूर सापडला आहे हे बघून निवड समिती प्रमुख चेतन शर्माच्या जीवात जीव आला असेल.

भुवनेश्वर कुमार आमचा प्रमुख गोलंदाज, पण सध्या त्याचा वेग जुन्या मोहिंदर अमरनाथसारखा झालाय आणि स्विंग तसूभरही होत नाही. तो अनफिट तर नाही? त्याच्या जागी दीपक चाहर किंवा तडफदार मोहमद सिराज संघात येऊ शकला असता. आपल्या स्लोअर वनवर भल्याभल्यांना भंडावून सोडणार्‍या हर्षल पटेलला निवडता आले असते, पण निवड समितीने भुवीच्या अनुभवावर विश्वास टाकलाय.

आयपीएलमधला आमच्या खेळाडूंचा फॉर्म बघितला तर धडकी भरते. रोहित, विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत नाही, ईशान, सूर्याची बॅट आता कुठे बोलायला लागली आहे. हार्दिकची बॅट त्याच्यावर जाम रुसली आहे. कॅप्टन झाल्यापासून पंत नको तितके गंभीर झाले आहेत. गोलंदाजीत भुवी किरकोळ पहिलवान वाटतोय, राहुल चहर तेव्हढाही वाटत नाही. बुमराहला आता लिंबू-टिंबू भिरकावून द्यायला लागला आहे.

थोडक्यात, स्पर्धा सुरू होण्यापूर्वी निम्मी टीम फॉर्मात नाही. ही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आणि हे पाहून ऋतुराज गायकवाड, वेंकटेश अय्यर आणि युझवेंद्र चहल किंवा हर्षल पटेल यांना काय वाटत असेल? संघाची निवड आयपीएलनंतर झाली असती तर हे सारे संघात असते? देव करो आणि आमची टीम फॉर्मात येवो!

- Advertisment -

ताज्या बातम्या