चिन्हात काय आहे ?

चिन्हात काय आहे ?

भारतासारख्या लोकशाही देशात राजकीय पक्षातील एक गट फुटून वेगळा होणे, त्यांनी स्वतंत्र पक्ष काढणे, अधिकृत चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे दावा करणे अशा घटना कमी नाहीत. राज्यातील सद्यस्थितीच्या निमित्ताने राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि त्या-त्या पक्षांचे चिन्ह यातील नेमका कुणाचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो, या प्रश्नाचा वेध घेणे रंजक ठरेल.

नावात काय आहे’ या प्रश्नाची या ना त्या कारणाने अधूनमधून चर्चा होत राहते. ‘नावातच सर्व काही आहे’ असे म्हणणारे असतात त्याचप्रमाणे ‘नावाने काय फरक पडतो’ असा प्रश्न करणारे त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद करतात. आता या चर्चेत ‘चिन्हात काय आहे’ या नव्या प्रश्नाची भर पडत आहे. याला कारण राज्यातील शिवसेनेत झालेले बंड. शिवसेनेतील एक गट फुटून बाहेर पडला आणि त्याने भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले. या सरकारलाही आता शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. सुरुवातीस एका राजकीय पक्षातील अंतर्गत बंड एवढेच या घटनेचे स्वरूप मर्यादित राहील, असे वाटत होते. परंतु विविध नाट्यमय घटना-घडामोडींनी या विषयाच्या चर्चेची व्याप्ती वाढत गेली. त्यातून काही नवे मुद्देही समोर आले. ‘खरी शिवसेना आमचीच’ असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावरही दोन्ही गटांनी आपलाच अधिकार असल्याचे म्हटले. अखेर हा वाद न्यायालयात गेला आणि न्यायालयाने चेंडू निवडणूक आयोगाकडे टाकला. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्हीही गोठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरेप्रणीत शिवसेनेला ‘मशाल’ आणि एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेला ‘ढाल-तलवार’ ही चिन्हे देण्यात आली. एवढेच नाही तर दोन्ही गटांची नावे बदलून आता ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना’ अशी झाली आहेत.

निवडणुकीत ‘राजकीय पक्ष वा त्या पक्षाचा नेता महत्त्वाचा का चिन्ह महत्त्वाचे’, हाही प्रश्न चर्चेत आला. यासंदर्भात काही प्रमुख राजकीय पक्षांची वाटचाल लक्षात घेऊ. काँग्रेस हा भारताच्या राजकारणातील सर्वात जुना पक्ष. या पक्षाचे सुरुवातीचे चिन्ह ‘बैलजोडी’ असे होते. त्यानंतर इंदिरा गांधींच्या राजकीय कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात बैलजोडीऐवजी गाय-वासरू हे चिन्ह वापरण्यास सुरुवात झाली. तेव्हा अगदी खेडोपाडी ‘गाय-वासरू’चीच चर्चा पाहायला मिळायची. ‘गाय-वासरू, नका विसरू’ असा प्रचार केला जायचा. तेव्हा विरोधी पक्षांची संख्या अधिक नव्हती आणि होते तेही तेवढे प्रभावी नव्हते. त्यामुळे ‘गाय-वासरू’ या चिन्हाचा चांगलाच बोलबाला होता. इंदिराजींची लोकप्रियताही अधिक होती. या दोन्हींचा काँग्रेसला त्या काळात निवडणुकांमध्ये लाभ होत राहिला. पुढे 1980 मध्ये काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. त्यावेळी ‘गाय-वासरू’ हे चिन्ह काढून घेण्यात आले. त्यानंतर इंदिरा काँग्रेसने ‘हाताचा पंजा’ हे निवडणूक चिन्ह स्वीकारले. आजही काँग्रेसचे हेच चिन्ह कायम आहे.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951 मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. त्याचे चिन्ह होते ‘पणती’. पुढे 1977 मध्ये भारतीय जनसंघ केंद्रात सत्तेत आलेल्या जनता पार्टीत सामील झाला. त्यावेळी पणती हे चिन्ह गोठवण्यात आले आणि ‘नांगरधारी शेतकरी’ हे चिन्ह वापरण्यात आले. त्यानंतर जनता पार्टीत फूट पडली आणि 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. या पक्षाचे कमळ हे चिन्ह आजतागायत कायम आहे. एकंदर राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांमध्ये या ना त्या कारणांनी वेळोवेळी बदल झाले आहेत. पण या बदलांचा त्या-त्या पक्षांच्या प्रभावावर फार परिणाम झाला असे म्हणता येत नाही. आपल्या देशात राष्ट्रीय पक्षांबरोबर प्रादेशिक पक्षांचीही संख्या मोठी आहे आणि त्या-त्या पक्षांची विशिष्ट चिन्हे आहेत. यात काही नव्या पक्षांची आणि त्यांच्या नव्या चिन्हांची भर पडत राहिली आहे.

भारतात निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे अगदी ग्रामपंचायत स्तरापासून निवडणुका घेतल्या जातात. परंतु या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय अथवा प्रादेशिक पक्षांचे म्हणून वा त्यांच्या चिन्हांवर निवडणूक लढवणारे उमेदवार जवळपास नसतातच. कारण ग्रामपंचायत स्तरावर विविध राजकीय पक्षांची स्थानिक नेतेमंडळी एकत्र येऊन पॅनल उभे करत असतात. स्थानिक सामाजिक संस्था, संघटना हेही आपले पॅनल उभे करत असल्याची काही उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रादेशिक वा राष्ट्रीय पातळीवर एकमेकांच्या विरोधात असणार्‍या पक्षांचे स्थानिक पातळीवरील नेते वा कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र आल्याचे पाहायला मिळते. या निवडणुकांसाठी देण्यात आलेली चिन्हेही वेगळी असतात. मात्र या निवडणुकांमध्ये चिन्हांपेक्षा त्या पॅनलची धोरणे काय आहेत, कोणते उमेदवार गावचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील, हे पाहून मतदार आपला कौल देतात. त्यामुळे या निवडणुकांमध्ये पॅनलची वा त्या-त्या उमेदवारांची चिन्हे प्रभावी ठरत नाहीत. इथे चिन्हांपेक्षा उमेदवारांचा व्यक्तिगत पातळीवर विचार केला जातो.

याउलट राज्यस्तरावर वा राष्ट्रीयस्तरावर पक्षाचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षाचे नेते यांचा प्रभाव महत्त्वाचा ठरत असल्याचीही उदाहरणे समोर येतात. पूर्वी देशात इंदिरा गांधी यांचा प्रभाव असण्याच्या काळात पंजाचे चिन्ह लक्षात ठेवून मोठ्या प्रमाणावर मतदान होत असे. त्या स्थितीत उमेदवार कोण, याचा मतदारांकडून फारसा विचार केला जात नसे. त्यामुळे फारसे क्रियाशील नसणारे काही उमेदवारही वर्षानुवर्षे निवडून येत असत. 2014 मधील नरेंद्र मोदींच्या लाटेतही याचीच अनुभूती आली. त्यावेळी देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेतृत्व हवे, या भावनेतून जनतेने भाजपच्या उमेदवारांना भरभरून मते दिली. या लाटेत एरव्ही निवडून येणे कठीण असलेले उमेदवारही सहजपणे मोठ्या फरकाने विजयी झाले. परंतु प्रत्येक वेळी नेत्याचा असा प्रभाव कामी येतोच असे म्हणता येणार नाही. कारण भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा मोठा प्रभाव असूनही भाजपला केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. प्रसंगी इतर पक्षांशी आघाडी करून सरकार बनवावे लागले. नेत्यांचा प्रभाव असूनही त्याचा त्यांच्या पक्षांना त्या प्रमाणात राजकीय लाभ झाला नाही, असे म्हणता येईल.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घ्यायला हवा. तो म्हणजे भारतात अजूनही अल्पशिक्षित, अशिक्षितांची संख्या लक्षात घेण्याजोगी आहे. या वर्गासाठी नेता, त्याचे कार्य यापेक्षा त्या-त्या पक्षांची चिन्हे महत्त्वाची ठरतात. थोडक्यात, या वर्गाला प्रतिकांची भाषा जवळची वाटते. तर प्रगत, आधुनिक वा विकसित देशात राजकीय पक्षांचा जाहीरनामा, पक्षांची धोरणे यांचा विचार करून मतदान केले जाते. भारतातही या निकषावर मतदान करणारा वर्ग आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत. परंतु या दोन पक्षांची धोरणे कोणती, ते सत्तेत आल्यानंतर कोणते कार्यक्रम राबवणार हे मुद्दे निवडणुकीत फारसे महत्त्वाचे ठरत नाहीत. त्याऐवजी उमेदवार कोण, त्याची धोरणे कोणती याला अधिक महत्त्व दिले जाते. यातूनच डोनाल्ड ट्रम्पसारखी व्यक्ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आली. थोडक्यात, आपल्या देशातील जनता राजकीय पक्षाच्या चिन्हाला महत्त्व देईल की त्या पक्षाच्या नेत्याकडे पाहून भरभरून मतदान करेल, हे सांगता येणे कठीण आहे.

लोकशाहीत जनताच सर्वस्वी असते आणि जनतेच्या मनात नेमके काय आहे, हे सांगणे बर्‍याचदा अवघड ठरते. मात्र लोकशाही देशात राजकीय पक्ष आणि त्यांची चिन्हे राहणार, या ना त्या कारणांनी चिन्हांमध्ये बदल होत राहणार, काही नव्या चिन्हांची भर पडणार, त्याचबरोबर चिन्हांबाबतची चर्चाही रंगत राहणार हे नक्की!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com