देशभक्ती म्हणजे आहे तरी काय?

Courtesy : Twitter/ITBP
Courtesy : Twitter/ITBP

आज १५ ऑगस्ट. देशाला स्वातंत्र होऊन सात दशकांपेक्षा जास्त काळ लोटला. या दरम्यान देशवासींना हक्क जास्त हवे आहे पण जबाबदाऱ्या नको आहेत. स्वातंत्रपुर्व काळात देशभक्ती म्हणजे देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी केलेला कोणताही प्रयत्न म्हणजे होत. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी प्राण वेचले ती देशभक्ती होती. पण आता स्वातंत्र मिळाले आहे. आपल्यापैकी अनेकांचा जन्मही स्वातंत्र भारतात झाला आहे. यामुळे गुलामगिरीचा तो काळ बऱ्याच जणांनी पहिलासुद्धा नसेल. यामुळे आता देशभक्ती म्हणजे काय? हा प्रश्न ‘देशदूत’ने नाशिकमधील युवक व सृज्ञ नागरिकांना विचारला. त्यातून मिळालेली उत्तरातून देशभक्तीची व्याख्या स्पष्ट होते...

देशभक्ती म्हणजे देशाबद्दल असलेला अभिमान, हे तर सर्वांनाच माहीत आहे. देशभक्तीची व्याख्या दोन भागांत करता येईल. एक स्वातंत्रपुर्व काळात असणारी देशभक्ती तर दुसरी स्वातंत्र्यानंतर देशभक्ती काय आहे? स्वातंत्रपुर्व काळात प्रभात फेऱ्या काढणे, राष्ट्रभक्तीपर गीत म्हणणे, सत्याग्रह करणे, प्रसंगी ब्रिटिश सरकारच्या पोलिसांच्या लाठ्या खाणं, तुरुंगात जाणं, क्रांती करणे, विदेशी कापडावर बहिष्कार टाकणे, साधी रहाणी स्वीकारणे, सरकारी नोकरी न करणे इत्यादी काम करणे ही स्वातंत्र्याआधीची देशभक्ती होती. आता यातील कोणतीही गोष्ट लागू पडत नाही. काही जण म्हणतील राष्ट्रभक्तीपर गीत म्हणणे ही देशभक्तीच आहे. त्यातून नवीन उर्जा मिळते. परंतु ही पुर्ण देशभक्ती नाही. याबरोबर आपले आचरणही तसेच असायला हवे. म्हणजेच १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या राष्ट्रीय उत्सवाला आपण सार्वजनिक कार्यक्रमांना जातो. त्या ठिकाणी देशभक्तीपर गीत गातो. दुसरीकडे त्या ठिकाणी जमिनीवर पडलेले प्लॅस्टीकच्या झेंड्यांकडे आपण दुर्लक्ष करतो. मग ही देशभक्ती म्हणता येईल का?

नुकतीच ऑलिंपिक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आपल्या सात हिरोंनी पदके मिळवली. नीरज चोप्राने सुर्वणपदक मिळवून स्वातंत्र्यानंतर देशाला ऍथेलेटिक्समधील पहिले सुर्वण पदक मिळवून दिले. मग आपली देशभक्ती ओसंडून वाहिली.(?) आम्ही फटाके फोडले, मिठाई वाटली, जल्लोष केला. पण ही देशभक्ती आहे का? देशभक्ती खरंतर नीरज चोप्राची होती. देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी चार वर्ष सर्व सण, समारंभ, कुटुंबातील आनंद-दु:ख विसरुन फक्त आणि फक्त ऑलिम्पिक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले. देशाला पदक मिळवून देणे हे एकच ध्येय ठेवले आणि त्यात यशस्वी झाला. ही त्यांची देशभक्ती होती. इतर खेळाडूंनीही प्रयत्न केले. पण ते यशापर्यंत जाऊ शकले नाही. यामुळे त्यांच्यातील देशभक्ती कमी होत नाही. खेळाडूंनी पदक मिळवला तो क्षण देशवासींना आनंद देणार सर्वात महत्वाचा क्षण होता. ती आपली देशभक्ती नाही. आपण देशाला मिळालेल्या यशात आनंद साजरा केला. मग आपली देशभक्ती काय आहे?

मागील वर्षी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. डोळ्यात अश्रू आणणारा प्रसंग त्यात होता. अगदी उद्योगपती रतन टाटा यांनीही आपल्या टि्वटर अकाऊंटवरुन तो व्हिडिओ शेअर केला होतो. तो व्हिडिओ होता...

मेरा बाबा देश चलाता है

वो पुलिस में भी नहीं लेकिन देश की गंदगी मिटाता है

वो आर्मी में भी नहीं है लेकिन गंदे शैतानों से जंग लड़कर आता है

मेरा बाबा देश चलाता है...

शाळेतील एका कार्यक्रमात तो मुलगा आपले वडील काय काम करतात ते या कवितेत शेवटी सांगतो. ते सफाई कामगार असतात. आपण ओला व सुका कचरा वेगळा करत नाही. यामुळे होणाऱ्या परिस्थितीची दहकता त्या व्हिडिओतून दाखवली. घरातील ओला व सुका कचरा वेगळे ठेवणे हे किरकोळ काम. पण आपण ते ही करत नाही. मग आपण देशभक्त आहोत का? आता देशभक्तीची व्याख्या अशी करता येईल. प्रत्येकाने आपआपले काम व्यवस्थित करणे हीच आजच्या काळातली देशभक्ती आहे.

आता आपण अशी कोणतेही काम करु शकतो ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, आपले गाव-शहराचे नाव आदराने घेतले जाईल. जर आपण वाहन चालवत असणार तर वाहतुकीचे सर्व नियम पाळणे म्हणजे देशभक्ती. सिग्नल न तोडणे, आपल्या वाहनाची धडक बसून कोणी पडणार नाही, जखमी होणार नाही, मरणार नाही अशी सावधगिरी बाळगणे म्हणजे देशभक्ती. महानगरपालिका किंवा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे रस्त्यांवरचे दिवे लावणे आणि सूर्योदयाला ते बंद करणे हे कामच आहे. परंतु हे काम अखंडपणे चोख बजावणे, विजेचा अपव्यय होणार नाही हे पाहणे म्हणजे देशभक्ती. शिक्षकांनी नीट शिकवणे, विद्यार्थ्यांना देशातील सुसंस्कृत नागरीक घडवण्याचे काम करणे म्हणजे ही देशभक्ती. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम नियमानुसार करणे, त्यासाठी लाच न घेणे म्हणजे देशभक्ती. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीतून भरघोस उत्पन्न घेणे आणि देशातील अन्नधान्याच्या गरजा पुर्ण करणे म्हणजे देशभक्ती. याप्रमाणे कितीतरी कामांची यादी तयार होऊ शकते.

देशभक्तीसंदर्भात नाशिमधील वैभव कुशारे म्हणतात, कोणतही काम निस्वार्थपणे केले म्हणजे ती देशभक्ती म्हणता येईल. उत्कर्ष जाधव म्हणतात, संविधानाचे पालन करणे, आता कोरोना काळात मास्कचा नियमित वापरण करणे, संकटात एका मानवाने दुसऱ्या मानवास मदत करणे म्हणजे देशभक्ती आहे. जेष्ठ नागरिक ज्ञानेश्वर देवरे यांची देशभक्तीची व्याख्या समर्पक आहे. ते म्हणतात, सीमेवर लढणे म्हणजेच देशभक्ती नाही. आपण सामान्य नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडतांना आपल्यातली देशभक्ती दाखवून देऊ शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून ते रक्तदान करत आहे. तसेच रक्तदानाची चळवळ, डोळ्यांची शिबिरे घेत आहे. म्हणजेच कोणतेही केलेले समाजउपयोगी कामाला देशभक्ती म्हणता येईल.

आपल्या देशाची लोकसंख्या १२५कोटींपेक्षा जास्त आहे. मग सगळे लोक देश चालवू शकतात का? फक्त पंतप्रधानच देश चालवतात आणि सरकारी रुग्णालयातील नर्स देश चालवत नाही, कृषिमंत्री देश चालवतो आणि शेतकरी देश चालवत नाही, शिक्षणमंत्री देश चालवतो आणि अंगणवाडी शिक्षिका देश चालवत नाही, असे थोडेच आहे? सगळे मिळूनच देशाचा गाडा चालवीत असतात. फक्त प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. आपण आपल्या भूमिकेत राहूनच देशसेवा करु शकतो. तिच आपली राष्ट्रभक्ती असणार आहे. …

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com