काय आहे संगीत चिकित्सा

काय आहे संगीत चिकित्सा
संगीत : भारतीय संगीतासाठी नवीन दालनं उघडणार

डॉ. संतोष बोराडे

मानवास संपुर्ण जीवनप्रवासात होणाऱ्या एकुण व्याधींपैकी 90% व्याधी या मनोकायिक असतात. सध्याची जीवनशैली अशा व्याधींसाठी अत्यंत पुरक ठरते आहे. अयोग्य जीवनशैली, अचानक होणारे नियंत्रित व अनियंत्रित बदल, कामातील तोचतोचपणा, अनियंत्रित तात्कालीक व दिर्घ तणाव, विचार-भावना व संस्कारांचे प्रदुषण, अस्थिरता-स्पर्धा-अविश्वास-तणावजन्य व्यवस्था, यंत्रणा यांसारख्या अनेक कारणांमुळे व्यक्ती, समाज व संस्कृतींचे स्वास्थ्य बिघडत आहे.

मनाचे संतुलन बिघडले की शरीराचे अधःपतन होते आणि शरीराचे अधःपतन झाले की मन अधिक असंतुलित होते. हे दुष्टचक्र अविरत सुरु राहिल्याने, अनेक असाध्य आजार व रोगांचा प्रादुर्भाव होतो. झोप न येणे, अपचन, थकवा, अवयवांची अकार्यक्षमता, स्नायु-सांधे दुखणे, वारंवार होणारे संसर्गजन्य आजार, चिडचिडेपणा, निरुत्साह, अतिउत्तेजन यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष होत जाऊन अखेर हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, असंतुलित रक्तदाब, मायग्रेन, अर्धांगवायु अशा अनेक आजारांना शरीर व मन बळी पडते.

मनोकायिक व्याधींचे हे दुष्टचक्र भेदण्यासाठी जागतिक स्तरावर विविध कला शास्त्रांचा सुयोग्य वापर' यावर विशेष संशोधन केले जाते आहे. यातुनच, भौतिक व मनोकायिक परिणाम पडताळून विविध चिकित्सा जन्म घेत आहेत. यातच आधुनिक काळात संतुलित जीवनशैलीसाठी एक महत्वाची भूमिका साकारत आहे 'संगीत चिकित्सा'.

शरीर व मेंदु यांचे रचनाशास्त्र-कार्यशास्त्र आणि सुनियोजित सांगीतिक कलाविष्कार यांचा एकत्रित अभ्यास शरीर-मनाच्या तणावांना सुनियंत्रित करतो. संगीताच्या सहाय्याने संतुलित जीवनशैलीसाठी सकारात्मक सामर्थ्यही मिळविता येते, मानसिक लवचिकतेसाठी व्यायामही करता येतो. नादाच्या आहत व अनाहत स्वरूपांमुळे त्याच्या वापरात स्थळकाळाची बंधने येत नसल्याने, अनादी काळापासून मानवी जीवनात संगीताला म्हणूनच विशेष महत्त्वही दिले गेले आहे.

संगीत चिकित्सा हा मुळात आहत आणि अनाहत या दोन नादांच्या अविष्काराचा विषय आहे. ऋग्वेद, यजुर्वेद व अथर्ववेदाच्या सोबत सामवेदाचा जन्म हा मनुष्य जीवन अधिक समृद्ध बनविण्यासाठीच झाला असेल. त्यामुळे भु, भूवः, स्व: च्या प्रवासासाठी या विविध नाद लहरींचा वापरही झाला असेल. परंतु विविध आक्रमणे आणि प्रदूषणांमुळे आज संगीताच्या आहत नादाचाच वापर सर्रासपणे सुरू आहे. विषय सुलभता व लेखन मर्यादेमुळे प्रस्तुत लेखात फक्त 'आहत नादाविषयी विशेष माहिती मांडायचा प्रयत्न आहे.

निसर्गतःच मनुष्य विचार-भावना-तणावांच्या अभिव्यक्तीसाठी विविध नादांचा व नादातील गुणविशेषांचा वापर करत असतो. नादातील हे गुणविशेष म्हणजे नादाची जाती, तारता, तिव्रता व लय होत. जीवनातील योग्य अयोग्य कृतींना जन्म देणारा तणाव, तणावास जन्म देणाऱ्या भावना, भावनांस जन्म देणारे विचार व विचारांना जन्म देणाऱ्या जीवनातील विविध कृती, घटना या सगळ्यावर नादाच्या जाती, तारता, तिव्रता व लय या गुणविशेषांचा खोलवर परिणाम होत असतो.

१) नादाची जाती:

प्रत्येक वाद्याच्या नादाबरोबर काही सुक्ष्म व सहाय्यक नाद निघत असतात. ते मुळ नादापेक्षा वेगळे नसतात. तसेच त्यांची आंदोलन संख्या व क्रम प्रत्येक वाद्यामध्ये भिन्न असते. म्हणुनच, प्रत्येक वाद्याची व्यक्तीगत विशेषता वेगळी असते. सजीवांच्या प्राकृतीक व सांस्कृतीक अवस्थांवर ही नादविभिन्नता विविध प्रकारे परिणाम साधते. जीवनशैली, विचारसरणी, सृजनशीलता, स्वभाव, मर्यादा, क्षमता अशा अनेक घटकांवर नादविभिन्नता परिणाम साधत असते. म्हणुनच तर, विशिष्ट व्यवस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये सामाजिक, वैचारिक अथवा भावनिक मतभेद असले तरीही त्यांचे एकुण जीवनमान, गरजा, सवयी, क्षमता, मर्यादा, स्वभाव इत्यांदीमध्ये साम्याचे धागे आढळतात. या नादविभिन्नतेमुळे शरीर व मनावर होणाऱ्या नादाच्या परिणामांतदेखील विविध बदल होत असतात.

उदा. बासरी ऐकताना शरीर व मनावर झालेला परिणाम ढोल ऐकताना बदलतो. किंवा तबला, ढोलक, ढोलकी, पखवाज, मृदुंग, कोंगो-बोंगो ही ताल वाद्य वरपांगी साम्य दर्शविणारी असली तरी त्यांच्या भावनिक व वैचारिक परिणामांचे बाज वेगळेच असतात.

ज्या ध्वनींमध्ये संगीतासाठीची लय असते अशा ध्वनींना नाद म्हणुन संबोधले जाते. विशिष्ट जातीच्या नादांचा नियोजनपुर्वक वापर करून मनाला व शरीराला एकाग्रता, लवचिकता व व्यापकतेच्या माध्यमातुन अधिक सामर्थ्यवान बनवताही येते, परंतु सांगितीक नादांवर आधारीत विकृत रचना, सांगितीक ध्वनींव्यतिरिक्त निर्माण होणारे इतर आवाज, उदा. यंत्रांचे अथवा वाहनांचे आवाज, अनेक नादजातींची सरमिसळ असणारे ध्वनी प्रदुषण, विकृत साहित्यीक नाद, विविध आकृतीबंधांतुन निर्माण होणारे नकारात्मक अंतर्नाद या सर्वांमधुन नकारात्मक तणावाची निर्मिती होऊन शरीर व मनाचे स्वास्थ्य अधिक बिघडलेही जाते. त्यामुळेच संगीत चिकित्सा या शब्दांचा अर्थ 'फक्त आवडती गाणी ऐकणे' एवढा मर्यादित नसून संगीताचा नियोजित व अभ्यासपूर्ण वापर हा आहे.

शरीर रचनाशास्त्र व कार्यशास्त्र, मानसशास्त्र, प्राकृतीक व सांस्कृतीक नियम, यंत्रणा, व्यवस्था व अवस्था यांचा सखोल अभ्यास करून नादाच्या जातीच्या सहाय्याने शरीर व मेंदुवर सकारात्मक परिणाम साधता येतात.

2) नादाची तारता

नादाची प्रतिसेकंद कंपने वाढत गेल्यास त्याची उंची वाढते व हीच कंपने कमी झाल्यास त्याची उंची कमी होते, यालाच नादाचा उच्चनिचपणा अथवा तारता असे संबोधले जाते. कोणत्याही नादाच्या जातीला तारतेच्या सहाय्याने अधिक प्रभावी व नियंत्रित बनवता येते. तसेच नादाच्या उच्चनिच तारतेमुळे शरीर रचना व कार्यावर विशेष प्रभाव आढळून येतो. शारीरीक व मानसिक तणाव निर्मितीमध्ये प्रसंग-विचार-भावना-तणाव-कृती-प्रसंग असे चक्र अविरत चालुच असते. नादाच्या तारतेचा वापर करून विचार, भावना व तणाव यांच्या अभिव्यक्तीचे विविध स्तर गाठता येतात. त्यामुळे नवरसनिर्मिती म्हणजेच कलासाधनेसाठी व पर्यायाने शारीरीक व मानसीक आरोग्यासाठी नादाची तारता विशेष उपयुक्त ठरते. नादाच्या तारता या गुणविशेषावर आधारीत स्वरस्थान साधना, मेरूखंड साधना, श्रुती साधना यांसारख्या अनेक प्रभावी उपचार पद्धतींचा समावेश करता येऊ शकतो.

3) नादाची तिव्रता

नादनिर्माणाच्या कमी-अधिक ताकदीवर तिव्रता अवलंबुन असते. आवाजाचा लहानमोठेपणा म्हणजेच आवाजाची तिव्रता. ही आंदोलनाच्या रूंदीवर अवलंबुन असुन तिचा नादाच्या कंपनसंख्येवर परिणाम होत नाही. परिणामी, नादाच्या तिव्रतेमुळे नादाच्या तारतेमध्ये फरक पडत नाही. नादाची तिव्रता अत्यंत प्रभावी चित्तवेधक असल्याने मानवी अवयवांच्या मर्यादा तसेच मानसिक व भौतिक संस्कारांमुळे विचार-भावना-तणाव व पर्यायाने शरीर-मेंदुच्या आरोग्यावर परिणाम साधते.

उदा. ढोल वाजविणे : कवायतीसाठी, सिनेसंगीतासाठी, पारंपारिक कला सादरीकरणासाठी प्रत्येकी वेगळी. शारीरीक व मानसिक कार्यक्षमतेच्या विकासासाठी व लवचिकतेसाठी, तिव्रता या गुणविशेषाचा वापर करून एकाग्रता, आकलनशक्ती व प्रभावी रसनिर्मितीचे विविध व्यायाम प्रकार तसेच दैनंदिन सुलभ उपक्रम करता येऊ शकतात.

4) नादाची लय

दोन नादांमधील अंतर म्हणजे नादाची लय. संपुर्ण सृष्टीमध्ये सगळीकडेच ही नादाची लय भरलेली आहे. वाऱ्याचे वाहणे, ग्रह-तायांचे चलन, समुद्राच्या लाटांची भरती-ओहोटी, ऋतुंचे येणे जाणे, पानांची सळसळ, सजीवांचे श्वसन, अगदी बोलणे, चालणे, भोजन करणे, हसणे, रडणे, गाणे या सर्वच गोष्टींमध्ये विशिष्ट लय आढळून येते. आपले शरीर व मन या लयीशी एकरूप होण्याचा सतत प्रयत्न करत असतात. म्हणुनच जगातील प्रत्येक संस्कृतीतील माणसांवर तिथल्या प्राकृतीक वैविध्यतांचे प्रभाव आढळतात. सृष्टीतील या अनाहत लयीप्रमाणेच कानांना ऐकु येणाऱ्या नादांतील लयीबरोबर शरीर व मन एकरूप होत असतात. उदा. गतीशील नाद ऐकताना शारीरीक उत्तेजन येऊन हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, श्वासांची गती वाढणे, मलावरोध निर्माण होणे, मानसीक शांतता भंग होऊन संभ्रमावस्था निर्माण होणे, वैचारीक व्यापकता खंडीत होणे, यांसारखी लक्षणे आढळतात, तर विलंबीत लयी मध्ये शरीर व मन शांत होऊन विचारांच्या दिशा व गती यांना व्यापकता येते, शरीर व मनासाठी आरामदायी वातावरण निर्माण होऊन झोप येते अथवा अंतमृखता येते. म्हणजेच नादाच्या लयीचा वापर करून शरीर व मनावर परिणाम साधता येतो. तसेच या लयीमधील लवचिकतेच्या गणधर्मामळे एकाच वेळी व्यक्तीगत तसेच सामुहिक पातळीवर देखील परिणाम साधता येतात. नादाची लय ही मेंदुच्या एकाग्रतेवर विशेष परिणामकारक असल्याने मेंदुच्या एकुण कार्यक्षमतेसाठी विशेष प्रभावशील ठरते.

नादाचे हे चार गुणविशेष स्वतंत्रपणे शरीर व मेंदुवर परिणाम साधतातच, परंतु त्यांच्या परस्पर मिश्रणातुन अथवा चौघांच्याही एकत्रित मिश्रणातुन असंख्य व अत्यंत प्रभावी उपचार पद्धती बनवता येतील. त्यासाठी फक्त चित्रपटातील 'नाटकीय प्रसंग निर्मिती ऐवजी प्रत्यक्ष जनसामान्यांचे आयुष्य व आरोग्यावर आधारित शास्त्रीय संगीतातील राग-रस-सिद्धांत, राग समय सारणी, सांगितीक साहित्य, आहत-अनाहत-अंतर्नाद, आकृतीबंध व संगीत, उपशास्त्रीय-सुगम-पारंपारिक संगीत, तसेच संगीताची सहज व सुलभ उपासना यांचे सहकार्य आवश्यक ठरेल.

सांगितीक चिकित्सेच्या मर्यादा

संगीत शास्त्रातील अविष्कारिक लवचिकतेमुळे शरीर व मनावर होणाऱ्या परिणामांत सकारात्मक अथवा नकारात्मकही प्रभाव निर्माण होऊ शकतात. कारण नादांतील गुणविशेष, बदलत्या शारीरीक व मानसिक अवस्था, मनाचा चंचलपणा व नैसर्गिक अथवा कृत्रिम शारीरीक-मानसिक मर्यादा यांसारख्या अनेक तात्कालिक निमित्तांचे परिणाम देखील संगीत चिकित्सेवर होत असतात. त्यामुळे संगीत चिकित्सेसाठी वापरली जाणारी उपचार पद्धती व उपचार सामुग्री अधिक नियोजनबद्ध व चिकित्सक वृत्तीने अभ्यासलेली असणे आवश्यक आहे. चिकित्सेसाठी संगीत वापरले जात असताना विशेषत: व्यक्तीसापेक्षता, आजारांचे स्वरूप व शरीरव्यवस्था, उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या संगीत चिकित्सा व इतर उपचार यांचे योग्य विश्लेषण अशा बाबींचा विचार होणे अत्यावश्यक आहे.

चित्रपट संगीत व पाश्वसंगीत

सर्वसाधारणपणे तणाव विरेचनासाठी या संगीत प्रकाराचा सहज व सर्रास उपयोग केला जातो. या संगीताची रचना ही चित्रपटांतील सत्य-असत्य प्रसंग, श्रोत्यांचे चित्त आकर्षण, बाजारातील 'फॅशन्स', संगीतकारांची 'स्टाईल', तसेच विविध प्रकारच्या शारीरीक व मानसिक उत्तेजनांनी प्रभावित झालेली असते. त्यामुळे तणावापासुन दुर होण्यासाठी अत्यंत आकर्षणयुक्त नादांच्या सहाय्याने मनाचे रंजन करणे अधिक सोयीचे मानले जाते. परंतु, अशा मनोरंजनातुन तणावाचे विरेचन होत नसुन, फक्त काही काळापुरते मेंदुला दिशाहीन अथवा सम्भ्रमित केले जाते. कारण अशा मनोरंजनातुन वेळ घालविल्यानंतरही पुन्हा मूळ तणावास सामोरे जावेच लागते. तसेच हल्लीच्या काळातील अशा रचनांतील नाद, साहित्य व आकृत्यांचे प्रभाव अत्यंत प्रभावशील असल्याने अतिरिक्त उत्तेजनातुन मानसिक व शारीरीक उर्जेचा हासही होत राहतो.

शास्त्रीय संगीताच्या मैफिलींच्या ध्वनीफित

अभिजात भारतीय संगीताचे शास्त्रीय अविष्कार शरीर व मनावर अत्यंत खोलवर परिणाम करतात. परंतु अशा रेकॉर्डीग्ज विशेषत: मैफिल किंवा विशिष्ट विषयावर आधारीत (Theme based) असल्याने, त्यांत श्रोत्यांचे मनोरंजन, प्रसंगानुरूप भावाविष्कार, लवचिक सादरीकरण, मैफिलीच्या मर्यादा, कलाकारांची कलाकारीता, अत्युच्च भावोत्कटता, व्यक्ती व स्थलकाल सापेक्षता अशा अनेक घटकांचा समावेश झालेला असतो. भावनिक व वैचारिक लवचिकता वाढविण्यासाठी यांतल्या काही योग्य रेकॉर्डिंग्ज काही अंशी समाधानकारक असल्या तरी, प्रत्यक्ष उपभोक्त्यांच्या मर्यादा व स्पष्ट-अस्पष्ट उत्तेजनांमुळे मेंदुच्या शांत व उत्साहवर्धक कार्यक्षमतेसाठी एकतर्फी नियोजनाच्या या ध्वनीफित अपयशी अथवा अधिक उपद्रवी ठरू शकतात.

संगीत साधना

संगीत कलेची साधना सर्व प्रकारच्या शारीरीक व मानसिक तणावांतुन मुक्तता देत असली तरीही सध्याच्या जीवनशैलीनुसार निकोप संगीत साधना करणे अवघड बनले आहे. अशा साधनेसाठी नियमित, सुनियोजित व सुयोग्य मार्गदर्शन आवश्यक असते. परंतु हे शक्य नसल्यास अयोग्य मार्गदर्शन, शॉर्टकट्स, परिपुर्णतेचा हव्यास, स्पर्धा, क्षमता, न्युनगंड, अंधअपेक्षा यांसारख्या अनेक घटकांमुळे ही कलासाधना अधिक विकृत व तणाव निर्माण करणारी ठरते. म्हणुनच, सांगितीक सुगमतेचा योग्य वापर, शास्त्रीयतेचा सुयोग्य अभ्यास, दैनंदिन सुलभ उपक्रमांतुन कलेची योग्य व नैसर्गिक सहज साधना, वैद्यक शास्त्रातील विविध ज्ञानशाखांचा प्रयोगपुर्ण अभ्यास, तसेच सामाजिक, सांस्कृतीक व अध्यात्मिक ज्ञानाचा सुयोग्य वापर यांतुन "सांगितीक चिकित्सा” तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.

- डॉ. संतोष बोराडे, लेखक मुंबई येथील संगीततज्ज्ञ - निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत.

jeevansangeet77@gmail.com

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com