वासुदेव

वासुदेव

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

सुट्टीमध्ये संजय आपल्या बायकोबरोबर चिन्मय आणि श्रद्धा या दोन मुलांना घेऊन गावी आला. गावांमध्ये भरलेल्या जत्रेत त्याने मुलांना नेले. त्याला तिथे महाराष्ट्रातील लोककलांचा मिलाफ दिसून आला. मुलांना जत्रेत फिरत असताना पहिला कलाकार दिसला.

डोक्यावर मोरपिसांची रंगीबेरंगी शंखाकार टोपी, पायघोळ अंगरखा, धोतर घातलेला तर दुसर्‍या कलाकारांनी विजार घातली होती. कमरेभोवती उपरणे गुंडाळलेले. शिवाय गळ्याभोवती दोन्ही बाजूंनी उपरणे सोडलेले. कमरेभोवतीच्या उपरण्यात बासरी खोवलेली. कपाळावर विशेष प्रकारचे गंध तसेच कंठावर, गालावर गुलाबी रंगाच्या गंधांचे टिळे, काखेला झोळी, गळ्यात एक छोटीशी लांब पिशवी, गळ्यात कवड्यांची, रूद्राक्षांची आणि रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, बोटामध्ये अंगठ्या, एका हातात चिपळी तर दुसर्‍या हातात पितळी टाळ. असा आगळावेगळा पोशाख असलेल्या कलाकाराकडे मुलांचे लक्ष त्यांच्याकडे न जावे तरच नवल.

वासुदेव पाहताक्षणी चिन्मयने विचारले बाबा, हे कोण? बाबा सांगू लागले, वासुदेव ही महाराष्ट्रातील प्राचीन परंपरा. श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्रीकृष्ण, श्रीराम यांचे हे भक्त. सकाळच्या प्रहरी घरोघर जाऊन विठ्ठल- रुक्मिणी किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या धार्मिक कहाण्या ऐकवणारी वासुदेव ही एक संस्था आहे किंवा आपण यांना एक प्रकारची शाळा म्हणू शकतो. ‘वासुदेव’ फार पूर्वीपासून घरोघरी आणि मंदिरा-मंदिरांत जाऊन रामप्रहरी मौखिक परंपरेतून लोकांच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करून देतात. राम प्रहर म्हणजे पहाटेचा पवित्र काळ.

सकाळच्या पारी, हरिनाम बोला

वासुदेव आला रे, वासुदेव आला

दिंडी चालली माहेराला

विठुरायाच्या त्या गावाला

रामाच्या प्रहरी आली वासुदेवाची स्वारी असे म्हणत हा वासुदेव पहाटे पहाटे घराजवळ येतो. कृष्णगीत गातोच पण नृत्यातूनही लोकांचे मनोरंजन करत असतो. पांडुरंगावरील अभंग, गवळण गात दान मागणारा लोककलाकार म्हणजे वासुदेव.

दान पावलं बाबा दान पावलं

वासुदेव आला हो वासुदेव आला

सकाळच्या पारी हरिनाम बोला.

वासुदेव आपल्या गीतातून तत्त्वज्ञान सांगतोे, आपण चांगले काम करत राहावे, आपल्याला येणारे चांगले-वाईट अनुभव आपण ईश्वरावर सोपवावे ही वासुदेवाची जीवनदृष्टी आहे. गाण्यांमधून देवादिकांच्या कथा सांगणारे वासुदेव तुळशीची माहिती सांगतात.

तुळस वंदावी वंदावी मावली संतांची सावली

मग त्या वासुदेवाला काही माऊली पसाभर म्हणजे हाताच्या ओंजळीत भरून धान्य देतात तर काही ठिकाणी घरातील स्त्रीया त्यांची पूजाही करतात. वासुदेव मात्र कधीच कोणाकडे काही मागत नाही.

मुलांनी बाबांना विचारले, ‘वासुदेव’ आम्हाला का माहीत नाही ?

मुलांनो ऐका, वासुदेवाची सुरुवात नक्की कधी झाली हे सांगता येणे अवघड आहे. परंतु अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, मराठी संस्कृतीतील वासुदेवांची परंपरा हजार-बाराशे वर्षे जुनी असावी, असा अंदाज आहे. याचे कारण संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव यांच्या साहित्यात वासुदेवावरील रूपके आढळतात. परंतु वासुदेवाला अधिक प्रसिद्धीच्या झोतात आणण्याचे काम संत एकनाथ महाराजांनी केल्याचे लक्षात येते.

पंढरीच्या वारीला, आळंदीच्या पालखीला वासुदेव असतात. हा त्यांचा मान असतो

देव जन्माचा सोबती

असा वासुदेव बोलती

कृष्णा आठव्या अवतारी

आला वासुदेवाच्या घरी

वासुदेव आला वासुदेव आला

चार कुळाचा उद्धार केला

यानंतर हे सर्वजण पंढरपूरवरून आळंदीला येतात. आळंदीत आल्यावरही चारी कुळाचा उद्धार गातात. यानंतरच पंढरपूरची वारी संपन्न झाल्याचा आनंद वारकर्‍यांना मिळतो.

संत आणि पंढरीची वारी यामध्ये ज्याप्रमाणे वासुदेवाचे अस्तित्व दिसून येते त्याचप्रमाणे टाळ वाजवत गात-नाचत येणार्‍या या वासुदेवाचे वर्णन काही पंथाच्या साहित्यातही सापडते. यावरून लोकजागृतीचा हा आदर्श वारसा सुमारे 900 ते 1000 वर्षांपूर्वीचा नक्की असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. वासुदेव यांच्या तालासुरात सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश मिसळतात, आपल्या घरट्यातून पक्षी बाहेर पडून किलबिलाट करतात तर बालगोपाळांचा मेळाच अंथरुणातून घराबाहेर अंगणात येतो.

गोविंदरामा हो, गोपाळ रामा जी जी जी

केशव रामा हो, माधवरामा जी जी जी

असे म्हणत बालगोपाळांना रामकृष्णात रंगवणारे वासुदेव प्रत्येक काळात आपल्या कलेतून देश प्रगतीतही वाटा उचलत असतात. राष्ट्रभक्ती असणारे हे कलाकार आपल्या कलेतून राष्ट्रासाठी समर्पणाची भूमिका ठेवत असतात.

मुलांनो, याचे उदाहरण म्हणजे, वासुदेवांची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दिसून येते. वासुदेवांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या घरी निरोप पाठवणे तसेच वासुदेवाच्या माध्यमातून देशहितासाठी शत्रूंच्या गोटातल्या बातम्या मिळवल्याच्या गोष्टी आपण सार्‍यांनीच ऐकल्या आहेत. सामाजिक, अध्यात्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक गरज भागवणारी ही समृद्ध परंपरा. अलीकडे बेरोजगारी, भ्रष्टाचार, स्त्री अत्याचार अशा अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचे काम हे कृष्णभक्त आपल्या गायन व नृत्यशैलीतून करतात. कृष्णभक्ती हा वासुदेवाचा वसा आहे.

याच वासुदेवांना जपण्याचे काम मुलांनो आपल्याला करायचे आहे. हे वासुदेव सध्या फक्त जास्तीत जास्त सणांना दिसून येतात, शहरी भागात तर अतिशय कमी वेळा आढळतात. पण महाराष्ट्राला संस्कारक्षम अशा परंपरांची आवश्यकता असून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन गढूळ न होऊ देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. म्हणून मुलांनो, तुम्ही शहरात गेल्यानंतर या वासुदेवाची माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना द्या आणि पुन्हा रोज रामप्रहरी वासुदेवाला दारात बघा.हे सांगतात संजयने मुलांना श्लोकही शिकवला.

अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र,

तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र,

तया आठविता महापुण्यराशी,

नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरांशी,

हे म्हणत म्हणतच मुले पुढे गेली. पुढे त्यांना दुसरा लोककलाकार भेटला, तो कोण आहे आपण पुढच्या भागात पाहू.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com