महेंद्रसिंग धोनी : अव्यक्त, अपारंपरिक तरीही...अनभिषिक्त! : नितीन मुजुमदार

एम. एस. धोनी
एम. एस. धोनी

धोनीची निवृत्ती अजिबात धक्कादायक नव्हती आणि ज्या पद्धतीने व्यक्त होत त्याने निवृत्तीची घोषणा केली ती पद्धतही जगासाठी वेगळी असली तरी धोनीसाठी 'नॉर्मल'च होती!!

धोनी क्रिकेट खेळला पण आपल्यासाठी लार्जर than लाईफ अशी त्याची प्रतिमा असली तरी त्याने त्याची देहबोली ही अतिशय साधी अशीच ठेवली.सगळ्यांमध्ये राहून त्याने त्याचे वेगळेपण आगळ्या पद्धतीने जपले.

तुम्ही त्याची संपूर्ण कारकीर्द बघा, क्रिकेट खेळताना तो सर्वस्व ओतून खेळला पण खेळ संपल्यावर तो किती सहजतेने अलिप्त होत असे!

त्याच्या खेळात पारंपरिक ढाचा अगदीकमी होता. अगदी आवश्यक एवढेच पारंपारिकतेला महत्व त्याने दिलेले आढळेल. त्याची बॅटिंगमध्ये स्वतःची अशी एक शैली होती,त्याचे स्वतःचे असे काही ठोकताळे असत आणि त्याला अनुसरूनच त्याची बॅटिंग आकारत असे.

बऱ्याच वेळा त्याची आउट ऑफ द बॉक्स विचारसरणी संघाच्या फार मदतीला आलेली आपल्याला दिसते. कॉपी बुक पद्धतीने त्याचा डाव आकाराला आलेला तुम्हाला फार क्वचित दिसेल.

अर्थात प्रत्येक वेळेला तो या बाबतीत यशस्वी झाला असे नाही पण कारकीर्दीचा अखेरचा थोडा कालखंड वगळला तर त्याच्या याबाबतीत सक्सेस रेट खूपच चांगला आहे. फलंदाज धोनीच्या कार्यशैलीचा धसका प्रतिपक्षाला किती होता याचे एक छान अवतरण येथे उद्धृत करतो.

मागे एकदा एक वेस्ट इंडियन फास्ट बॉलर धोनीवर बोलताना म्हणाला होता," समजा तुम्हाला शेवटच्या ओवर मध्ये १५ रन्स हव्या आहेत, समोर उभा फलंदाज धोनी आहे, तर मग प्रवादानुसार दबाव धोनीवर पाहिजे...

या विशेष अपवादात १५ रन्स चे मोठे मार्जिन असूनही गोलंदाज चक्रावलेला तुम्हाला दिसेल!!धोनीवर दबाव आहे असे वाटणार नाही" या एका उदाहरणात धोनी या व्यक्तिमत्वाचा फलंदाज म्हणून असलेला दबदबा अधोरेखित होतो.

सातत्याने एकेरी धावा घेऊन स्कोअर बोर्ड हलता ठेवायचा, शक्यतो विकेटस् ही जाऊ द्यायच्या नाहीत आणि शेवटच्या एक दोन ओव्हर्स मध्ये एवढा भयानक हल्ला गोलंदाजीवर करायचा की सहसा चौकार / षटकारांनीच सामना संपवला जावा.

मात्र, तोपर्यंत पाठीराखे प्रेक्षक आणि स्वतःच्या संघातील खेळाडू यांना फक्त काळजीनेच दम लागलेला असे!! अशा अनेक आठवणी (पैकी जास्ती सुखकर !)फलंदाज धोनीने आपल्याला दिल्या. रनिंग बीटविन विकेट्स साठी प्रसिद्ध असलेल्या धोनीच्या कारकीर्दीची सुरुवात रन आऊट ने झाली होती आणि अखेरही एका रनआऊट ने व्हावी हा एक विचित्र योगायोग!

कर्णधार म्हणून त्याची कारकीर्द तर फलंदाज धोनीपेक्षा अधिक प्रभावशाली झाली. २००७, २०११ आणि २०१३ अशा तीन वेगवेगळ्या वर्षी त्याने वेगवेगळ्या फॉरमॅट्स मधील( २०११ व २०१३ मध्ये एकदिवसीय तर २००७ मध्ये टी२० )जागतिक अजिंक्यपदे आपण मिळविली.

एक जागतिक अजिंक्यपद मिळविले तरी त्या कर्णधाराला ते आयुष्यभर पुरते येथे तर एक नाही तीन, तीही वेगवेगळ्या स्पर्धांमधील! शिवाय त्याच्याच नेतृत्वाखाली आपण कसोटी क्रिकेट मध्ये देखील पहिल्या क्रमांकाचे जागतिक रँकिंग मिळविले होते.

याचे नेतृत्व देखील अपारंपरिक पद्धतीचे होते. २०११ साली विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत स्वतः फॉर्म मध्ये नसताना थेट सर्वात महत्वाच्या सामन्यात स्वतः ला युवराज आधी बढती देण्याचा निर्णय असो की २००७ ला बोल आऊट मध्ये वेंकटेश प्रसादचा रॉबिन ऊथप्पा, सेहवागला गोलंदाजी देण्याचा सल्ला मानणारा निर्णय असो, धोनीने असे अनेक धाडसी व कधी कधी अनाकलनीय निर्णय घेतले आहेत.

मला वैयक्तिक रित्या विचाराल तर मला कर्णधार धोनी अधिक भावला! आनंदात वाहून न जाणे आणि कठीण काळात भाववृत्ती स्थिर ठेवणं ही चांगल्या कर्णधाराची आवश्यक गुण वैशिष्ट्ये धोनीत ठायी ठायी होती.

त्याची विकेट किपिंगही त्याच्या बॅटिंग तसेच नेतृत्वासारखीच होती... अपारंपरिक!! मात्र तो जगातील काही मोजक्या अतिशय हुशार विकेट कीपर्स पैकी एक होता. त्याच्या धुर्तपणामुळे तसेच जबरदस्त जलद रिफ्लेक्सेस मुळे भारतीय संघाला मोक्याच्या क्षणी अनेक वेळा विकेट्स मिळविता आल्या आहेत.

ग्रेग चॅपेल ने धोनीच्या निवृत्ती नंतर धोनीबद्दल लिहिताना ' टीम मॅन 'म्हणून धोनीची अगदी मुक्त कंठाने स्तुती केली आहे. "तो कुठल्याही नंबर वर फलंदाजीला यायला तयार असायचा, तो कधी रेकॉर्ड्स साठी खेळला नाही ना कधी त्याने खोट्या दुखापती दाखवल्या, त्याला अजिबात अहम नव्हता, तो कधीही असुरक्षित वाटला नाही आणि तो कधीही जलद गोलंदाजी अथवा खराब विकेटवर खेळायला घाबरला नाही ,संघहित त्याच्यासाठी कायम परमोच्च होते" अशा स्पष्ट शब्दात तो धोनीवर लिहितो.

धोनीचे गेल्या दहा वर्षांपासून असलेले मित्र, कर्नल( रिटायर्ड)शंकर वेम्बु यांच्याशी धोनीच्या निवृत्तीनंतर बोलण्याचा योग आला,ते म्हणतात," धोनी हा त्या त्या क्षणासाठी जगतो, भूतकाळ अथवा भविष्यकाळाचे ओझे घेऊन तो वावरत नाही" सैन्यदलातील माजी अधिकारी ,जवान तसेच त्यांचे कुटुंबीय अशा विविध घटकांना, आवश्यकतेनुसार मदत करण्यासाठी धोनी खूप मनापासून आणि नियमित कार्यरत असतो असेही कर्नल (रिटायर्ड) शंकर वेम्बु आवर्जून म्हणाले.

भारतीय संघाला धोनीशिवाय खेळण्याची अलीकडच्या काळात सवय झाली आहे तरीही... तरीही माही यु विल बी मिस्ड!!!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com