स्पंदन : उमवि ते यचममुवि : प्रवास दोन दशकांचा...

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांची खास ‘देशदूत’च्या वाचकांसाठी पाक्षीक ‘ स्पंदन ’ ब्लॉगमालिका...
स्पंदन : उमवि ते यचममुवि : प्रवास दोन दशकांचा...

दिनांक १जुलै १९८९ रोजी नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना झाली. यावर्षी विद्यापीठाने आपला ३२ वा वर्धापनदिन साजरा केला. याचवर्षी म्हणजे १९८९ मध्ये मी बारावी उत्तीर्ण होऊन पदवी शिक्षणक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता. मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेनंतर एक वर्षांनी १५ ऑगस्ट १९९० रोजी जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (आताचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ) अस्तित्वात आले.

मला आठवतं, त्या काळात नाशिक-अहमदनगर-जळगाव-धुळे या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्यात यावे यासाठी मोहीम सुरु होती. (त्यावेळी नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झालेली नव्हती. नंदुरबार हा तालुका धुळे जिल्ह्यात होता. ) हे जिल्हे पुणे विद्यापीठाशी संलग्न होते. पण या तत्कालीन चारही जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधींना व शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांना आपल्याच शहरात विद्यापीठ स्थापन व्हावे असं वाटत होतं. वर्तमानपत्रांमधून या बाबत बरेच विचार मंथन घडून येत होते. मी सुद्धा ‘चारही जिल्हे नसतील तर ‘उमवि’ नको या शीर्षकाचे पत्र एका वृत्तपत्रात लिहिलं होतं. शिवाय हे विद्यापीठ नाशिकला स्थापन व्हावे असंही मत त्यात व्यक्त केलं होतं. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आपल्या शहरांत स्थापन होऊ शकत नाही याचा अंदाज लागल्यावर अहमदनगर जिल्ह्याने या मोहिमेतून आपलं अंग काढून घेतलं आणि अहमदनगर जिल्हा पुणे विद्यापीठाशीच संलग्न राहायला हवा, अशी भूमिका घेतली. या सर्व घटना-घडामोडींचा परिपाक म्हणजे नाशिकला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि धुळे इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असावा, असं मला वाटतं.

उत्तर महाराष्ट्रातल्या दोन्ही विद्यापीठांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली, याचा आनंद वाटतो. सन १९९८ मध्ये मी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रशासकीय पदावर रुजू झालो. डिसेंबर १९९८ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी अर्थात National Eligibility Test (NET) आणि राज्य पात्रता चाचणी State Eligibility Test (SET) ह्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यामुळे अध्यापक होण्याचे वेध लागले. लवकरच तशी संधी चालून आली. सोलापूर इथल्या प्रख्यात वालचंद कॉलेजची जाहिरात आली. त्यासाठी मी केलेला अर्ज स्वीकृत होऊन मला मुलाखतीसाठी बोलावणे आले. मी मुलाखतीसाठी सोलापूरला गेलो. रेल्वे स्टेशन परिसरात निवासासाठी एखादे चांगले हॉटेल शोधू लागलो. पण एका सुहृदय व्यक्तीने या ठिकाणी न थांबण्याचा सल्ला दिला. त्यांनी इथल्या ‘बळीवेस’ परिसरातल्या हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितले. रिक्षाचालकाला त्यांनी ‘बळीवेस’ मधल्या चांगल्या हॉटेल्स दाखवायला सांगितलं. मी एक दिवस आधीच सोलापूरला पोहचलो होतो. त्यामुळे फ्रेश होऊन वालचंद कॉलेजचा परिसर बघून आलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच हॉटेल मधून चेकआउट केलं. मुलाखतीसाठी कॉलेजला पोहचलो. मुलाखत दिली. वालचंद कॉलेज हे अल्पसंख्यांक संस्था या वर्गवारीतले. मुलाखत चांगली झाली. या ठिकाणी आपली निवड होऊ शकते असं वाटून गेलं. दुसऱ्या दिवशी औरंगाबादच्या एका महाविद्यालयात मुलाखत होती. त्यामुळे वालचंद कॉलेजची मुलाखत संपल्या-संपल्या तातडीने बस स्थानकाकडे प्रस्थान केलं. औरंगाबादला जाणारी बस पकडली. बसमध्ये मी ज्या कॉलेजला मुलाखतीसाठी जात होतो त्याच ठिकाणी जाणारा एक उमेदवार भेटला. आम्ही दोघांनी औरंगाबादच्या बस स्थानक परिसरातल्या हॉटेलात रात्री मुक्काम केला.

सकाळी लवकर उठून हॉटेल सोडलं. मुलाखतीच्या वेळेच्या खूप आधी कॉलेजवर आलो. इथं सगळा सावळा गोंधळ होता. मुलाखती खूप उशिरा सुरु झाल्या. याच ठिकाणी मला ‘टीस’ मधली माझी एक जुनिअर भेटली. तिने विचारलं की नाशिकच्या कॉलेजला मुलाखतीसाठी का आला नाहीस म्हणून? ती जाऊन आली होती मुलाखतीसाठी आणि तिने तिथल्या उमेदवारांच्या यादीत माझं नावं पाहिलं होतं. म्हणजे संस्थेकडे त्यांनी मला मुलाखतीचे पत्र पाठवल्याचा तपशील उपलब्ध होता. प्रत्यक्षात मात्र मला मुलाखतीसाठीचे पत्र मिळालेच नव्हते ! पत्र पोस्टाच्या दिरंगाईमुळे मिळालं नव्हतं की मुळात पाठवलेच नव्हतं, याचं उत्तर आजही मी सांगू शकत नाही. या संस्थेची जनमानसातली प्रतिमा पाहता त्यांनी पत्र न पाठवताच मी मुलाखतीसाठी अनुपस्थित असल्याचे दाखवले असण्याची शक्यता जास्त !

लवकरच वालचंद कॉलेज, सोलापूर इथून एक तार आली. यात मला कॉलेजला भेट देण्यास सांगितले होते. या तार बाबत मी उमवि मधल्या माझ्या एका वरिष्ठ सहकारीसमवेत चर्चा केली. त्यांनी मला जायचा सल्ला दिला. मी लवकरच सोलापूरला गेलो. तिथं गेल्यावर त्यांनी मला माझी निवड झाल्याचे सांगून दोन वर्षे परीविक्षा कालावधीचे नियुक्ती पत्र दिले. कॉलेजच्या विभाग प्रमुखांनी मला संपूर्ण कॉलेज फिरवले. मी या मुलाखतीत गुणवत्ता यादीत पहिल्या स्थानावर असल्याचेही मला त्यांच्याकडून समजलं. त्यांनी तिथल्या सहकाऱ्यांशी परीचय करून दिला. होस्टेल सुद्धा दाखवले . शिवाय होस्टेलच्या मुलांनाही माझी ओळख करून दिली. तेव्हा मी अविवाहित असल्याने माझी राहण्याची सोय मुलांच्या वसतीगृहात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विभाग प्रमुख मला ग्रंथालयातही घेऊन गेले. रुजू होण्यासाठी मला काही कालावधी द्या अशी मी कॉलेजच्या प्राचार्यांना विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. नियुक्ती पत्र घेऊन मी जळगावकडे प्रस्थान केलं.

वालचंद कॉलेजला रुजू व्हावं की नाही या संमभ्रमात मी होतो. कारण तिथल्या वरिष्ठ प्राध्यापकांनी मी विद्यापीठ सोडून कॉलेज रुजू होण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा असा सल्ला दिला होता. त्यांच्यामते विद्यापीठात काम करण्याची संधी सगळ्यांना मिळत नाही. पण मी विद्यापीठात प्रशासकीय पदावर आहे आणि मला शिक्षक व्हायचं असल्याचं त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी सांगितलं की भविष्यात विद्यापीठात आपला विभाग आल्यावर तुम्हांला नक्की संधी मिळेल. मला त्यांच्या बोलण्यात तथ्य वाटलं. शिवाय मी विद्यापीठात कार्यरत असल्याने कॉलेजच्या तुलनेत सुविधा जास्त होत्या. कॉलेजला मात्र लहानसे ग्रंथालय, छोटीशी स्टाफ रूम इत्यादी गोष्टी मला फार भावल्या नाहीत. शिवाय सोलापूर हे शहरही मला सांस्कृतिकदृष्ट्या आपलंसं वाटलं नाही. खूप साधक-बाधक विचार करून मी ही नियुक्ती न स्वीकारण्याचा निर्णय घेतला! तसे त्यांना पत्राने कळवूनही टाकले. जेणेकरून प्रतीक्षायादी वरील उमेदवाराला लवकर संधी मिळावी.

२००० मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जाहिरात आली. त्यासाठी मी अर्ज केला. मुलाखतीसाठी बोलावणे आलं. एप्रिल –मे मध्ये मुलाखती घेण्यात आल्या. माझी मुलाखत चांगली झाली. निवड होऊ शकते असं वाटत होतं. काही दिवसांनी बातमी आली की मुक्त विद्यापीठाच्या ह्या नियुक्ती प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली. बातमी वाचून धक्का बसला. कारण मी याधीच सोलापूर इथली नियुक्ती नाकारली होती. आता ही नियुक्ती प्रक्रिया न्यायालयात गेल्याने चिंतेत भर पडली. न्यायालयाचा निर्णय कधी नि केव्हा लागेल याची काळजी वाटायला लागली. काही क्षण वाटून गेलं की आपण वालचंद कॉलेजची ऑफर उगाच नाकारली ! पण आता काही पर्याय राहिला नव्हता, वाट पाहण्याशिवाय. सुदैवाने यासाठी फार काळ वाट पहावी लागली नाही. तीन-चार महिन्यात न्यायालयाचा निर्णय आला आणि तो ही विद्यापीठाच्या बाजूने ! ऑक्टोबर मध्ये मला नियुक्तीपत्र प्राप्त झालं नि मी १ नोव्हेंबर २००० रोजी विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो.

इथल्या सेवेला बघता-बघता दोन दशकांचा कालावधी उलटला. रुजू झालो तेव्हा मुंबईच्या प्रख्यात रुपारेल कॉलेजचे माजी प्राचार्य आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू पद भूषवलेले अशोक प्रधान सर कुलगुरू होते. पण त्यांचा सहवास फार काळ लाभला नाही. माझा दोन वर्षांचा परीविक्षा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांचा कुलगुरू म्हणून पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला. तसेच माझे विभाग प्रमुख प्रोफेसर चंद्रकांत गर्जे हे देखील त्यांच्या नियतवयोमानानुसार, मला दोन वर्ष पूर्ण होण्याआधीच निवृत्त झाले. माझ्या इथल्या दोन दशकांच्या प्रवासातल्या उल्लेखनीय घटना-घडामोडींचा धांडोळा पुढे कधी तरी !

सहयोगी प्राध्यापक,

मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

नाशिक

मोबाईल : ९४०३७७४५३०

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com