जागतिक हृदय दिन : असे सांभाळा आपले हृदय

जागतिक हृदय दिन : असे सांभाळा आपले हृदय
world heart day

२९ सप्टेंबर हा दरवर्षी जागतिक हृदय दिन (world heart day) म्हणून साजरा केला जातो. भारतासह जगभरात हृदयरोगांमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगात १ कोटी ७३ लाख लोक हृदयरोगाने मृत्यूमुखी पडतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. योग्य आहार नियोजन, नियमित व्यायाम व तणावरहित जीवनशैली ही निरोगी हृदयासाठीची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीचा सर्वांनी अंगिकार करुन आपले हृदय निरोगी ठेवा.

पाश्चिमात्य जगाच्या तुलनेत भारतामध्ये वयाची १० वर्षे आधी हृदयरोग होताना दिसू लागले आहेत. ज्यांना हृदयरोग होतो, अशा लोकांपैकी एक चतुर्थाश लोक हे ३० ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाखू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. हृदयविकाराचा आजार बऱ्याच प्रमाणात आनुवंशिक आहे. आईवडिलांना हा आजार असेल तर मुलांना तो होण्याची शक्यता दाट असते.

अशी करा देखभाल

हृदय रोग टाळण्यासाठी गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे बंद करायला हवे. दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. वयाची ३० वर्षे पूर्ण होताच हृदयाची तपासणी करून घ्या. त्यात उच्च् रक्तदाब, कोलेस्टेरॉल व मधुमेहाची तपासणी होते. त्यानंतर वर्षातून एकदा तपासणी आवश्य करा. कुटुंबात कोणाला हृदयरोग असेल तर धोक्याची शक्यता दुपटीने वाढते.

ही त्रिसूत्री वापरा...

आहार :

१. संपूर्ण शाकाहार हा आरोग्यदायी आहे.

२. कोलेस्टेरॉल आणि कोलेस्टेरॉलयुक्त पदार्थ वज्र्य करावेत. तसेच कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याच्या दृष्टीने उपयुक्त असलेले कांदा, लसूण, गाजर, वांगी, सोयाबिन, स्किम्ड मिल्क, दुधाचं दही, सफरचंद इतर नेहमी आहारात ठेवावे.

३. कच्चे पदार्थ शक्यतो जास्त खावे. कोबी, फ्लॉवर, गाजर, मुळा, कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, कोवळी भेंडी, पालक, मेथी, लेटय़ूस अशा भाज्या, मोडाची कडधान्ये, भिजवलेल्या डाळी, वेगवेगळी फळे भरपूर खावीत.

४. चहा, कॉफीचा अतिरेक टाळावा.

५. दुधाचे पदार्थ मलई, तूप, लोणी, चीज, पनीर, मिठाई शक्यतो टाळावे.

६. तळलेले पदार्थ, पिझ्झासारखे पदार्थ, मैद्याचा अतिरेक टाळावा.

७. आहारात तंतुमय पदार्थाचे प्रमाण पुष्कळ असावे.

८. मीठ आणि साखर आहारात कमी प्रमाणात वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते.

व्यायाम :

भरपूर व्यायाम करावा. भराभरा चालणे, धावणे, पोहणे, सायकल चालवावी यासारखा व्यायाम जितक्या वेळा सहन होईल तोपर्यंत करावा. ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार व्यायम करावा.

तणाव रहित जीवनशैलीसाठी योगा-मेडिटेशन

योगात ध्यान, समाधी (मेडिटेशन) आणि यम, नियम, योगासने, प्राणायाम यांचा समावेश होतो. जीवनातील ताणतणाव, तणाव कमी होऊन रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

Related Stories

No stories found.