अध्यक्ष व्हावा ऐसा...

अध्यक्ष व्हावा ऐसा...

काँग्रेस पक्षातील अध्यक्षपदाची निवडणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राहुल गांधी पदयात्रेत कार्यरत असून निवडणुकीपासून चार हात दूर आहेत. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यापैकी कुणाची वर्णी लागते हे लवकरच समोर येईल; परंतु अनेक वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिगर गांधी घराण्यातील व्यक्ती विराजमान होणार आहे. नव्या अध्यक्षापुढे प्रचंड आव्हाने आहेत. मुद्दा आहे तो पक्षाचा रिमोट कंट्रोल त्यांच्या हाती राहणार की ते केवळ नामधारी अध्यक्ष असणार हा!

देशातील सर्वात जुना पक्ष असणार्‍या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर अखेर गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीची वर्णी लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. कारण 30 सप्टेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मल्लिकार्जुन खरगे, शशी थरूर आणि झारखंडच्या एका नेत्याने अर्ज दाखल केला आहे. राजकीय पक्षांतर्गत होणार्‍या अशा निवडणुकीचे स्वागत करायला हवे. कारण ही व्यवस्था जनतेचे सरकार प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी तब्बल दोन दशकांनंतर निवडणुका होत आहेत. गेल्या निवडणुकीत सोनिया गांधी आणि स्व. जितेंद्र प्रसाद यांच्यात लढत झाली होती. ही निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचे प्रसाद यांना ठाऊक होते, तरीही त्यांनी सोनिया गांधी यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला. लोकशाही व्यवस्थेचे हेच मोठे बलस्थान आहे.

आजदेखील असेच वातावरण दिसून येत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकीकडे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे केरळमधील राज्यसभेचे खासदार, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. तसेच झारखंडचे आणखी एक काँग्रेस नेते के. एन. त्रिपाठी यांनीदेखील अर्ज दाखल केला आहे. वास्तविक काँग्रेसचे बोलघेवडे नेतेे दिग्विजय सिंह यांचेही नाव चर्चेत होते. परंतु आयत्या वेळी त्यांनी माघार घेत खरगे यांची बाजू उचलून धरण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीच्या निमित्ताने सर्वात चर्चेत राहिले ते राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत. परंतु अखेर खरगे यांना मैदानात उतरावे लागले.

येत्या 17 ऑक्टोबरला निवडणूक होत असून 18 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहेत. बहुसंख्य काँग्रेस नेत्यांना खरगे विजयी होतील, असा ठाम विश्वास आहे. कारण अर्ज भरताना त्यांना काँग्रेस नेत्यांकडून मिळणारे समर्थन पाहता ही निवडणूक केवळ औपचारिकताच आहे की काय, असे वाटू लागले आहे. निवडणुकीत देशभरातील नऊ हजारांहून अधिक काँग्रेसचे पदाधिकारी मतदान करतील. खरगे हे गांधी-नेहरू कुटुंबाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. तर दुसरीकडे थरूर हे काँग्रेसला सध्याच्या काळानुसार बदल करू इच्छित आहेत. पक्षाच्या बांधणीचे विकेंद्रीकरण करत कार्यकर्ताकेंद्रित पक्ष उभारणी करण्याचा त्यांचा मानस आहे. थरूर हे काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीत बदल घडवून आणू इच्छित आहेत. याप्रमाणे जिल्हापातळीवरील अडचणींचा तिथेच निपटारा करणे सोयीचे असून त्यासाठी प्रत्येक वेळी हायकमांडकडे जाण्याची गरज भासू नये, असे थरूर यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या पातळीवर घेण्यात येणारे कोणतेही निर्णय असो त्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा अध्यक्षांवर सोडला जातो. पण अशा ठरावाची गरज कशासाठी? राज्य विधिमंडळाला याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार द्यायला हवा, असे थरूर यांना वाटते.

वास्तविक शशी थरूर हे नेहरू युगाची गोष्ट सांगत आहेत. जेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री स्व. विधानचंद्र राय हे पंडित नेहरू यांना लिहिलेल्या पत्रात ’माय डियर जवाहरलाल’ असा उल्लेख करत असत. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. चंद्रभानू गुप्ता यांनी दिल्लीत पंडित नेहरू यांच्या तीन मूर्ती मार्गावरील निवासस्थानी आयोजित बैठकीत एक गोष्ट स्पष्ट केली होती आणि ती म्हणजे उत्तर प्रदेशचे सरकार ‘तीन मूर्ती’तून चालणार नाही आणि नेहरुंनाही ते मान्य होते. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसची संस्कृती पूर्णपणे बदलली. त्यानंतर पक्षात व्यक्तीपूजा सुरू झाली. पण आता काँग्रेसला पुन्हा नेहरू युगात नेेणे शक्य नाही. कारण पक्षाच्या कार्यकर्त्याचे स्वरूप बदलले आहे. अशावेळी एका अर्थाने थरूर यांचा विचार हा आदर्शवादी मानला जाऊ शकतो. कारण ते पक्षात बदल घडवून आणू इच्छित आहेत.

काँग्रेस पक्ष हा 1914 ते 1948 पर्यंत महात्मा गांधी यांच्या सावलीखाली वावरला आणि नंतर नेहरू-गांधी कुटुंबाच्या प्रभावाखाली. साहजिकच या सावलीशिवाय काँग्रेस पक्षाचा विचार करणे हे सर्वसामान्यांसह राजकीय निरीक्षकांनाही सोपे ठरणारे नाही. आपला प्रभाव या घराण्यापर्यंत पोहोचावा अशी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याची इच्छा असते. परंतु वारसदारांनादेखील आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवावे लागते. भारत जोडो यात्रेचे आयोजन करण्यामागचा हाच हेतू आहे. या निवडणुकीपासून बाजूला होत नेहरू-गांधी कुटुंबाने काँग्रेसमध्ये बदल घडवून आणण्यास एकप्रकारे प्रेरणा दिली आहे.

काँग्रेस पक्षाचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यापासून ते आजतागायत काँग्रेसने 18 अध्यक्ष पाहिले. यादरम्यान 75 वर्षांपैकी 40 वर्षे हे नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्यच अध्यक्षपदी होते.

खरगे अध्यक्ष झाले तरी त्यांच्यासमोर संघटनेतील अन्य नेत्यांना एकत्र आणण्याचे आव्हान पेलतानाच गांधी कुटुंबाचा आदेश पाळावा लागणार आहे. कारण गांधी कुटुंबाचे पाठबळ असल्याशिवाय अध्यक्षपदी कोणीच टिकू शकले नाही आणि हे इतिहासानेही वारंवार दाखवून दिले आहे. त्यामुळे कोणीही अध्यक्ष झाला तरी त्यास सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचे म्हणणे शिरसावंद्य मानूनच काम करावे लागेल. अशा स्थितीत अध्यक्षपदाकडे अधिकार काय राहणार? ते कोणताही निर्णय घेऊन पक्षाला नवीन दिशा व सूचना देण्यासही यशस्वी ठरतील का?

1969 मध्ये इंदिरा गांधी यांनी राष्ट्रपतिपदासाठी अपक्ष उमेदवार व्ही.व्ही. गिरी यांना जिंकून दिले तर पक्षाचे उमेदवार नीलम संजीव रेड्डी यांना पाडले. 1977 मध्ये आणीबाणीनंतर ब्रह्मानंद रेड्डी आणि वाय. बी. चव्हाण यांनी इंदिरा गांधी यांच्याविरोधात नाराजी व्यक्ती केली. तेव्हा पक्ष फुटला आणि त्यामागचे कारण इंदिरा गांधीच होत्या. 1997 ची घटना तर अजूनही काही नेत्यांच्या मनात ताजी असेल. माधवराव शिंदे, राजेश पायलट, नारायण दत्त तिवारी, अर्जुन सिंह, ममता बॅनर्जी, जी. के. मुपनार, पी. चिदंबरम, जयंती नटराजन यांनी तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याविरोधात वातावरण तयार केले. केसरी यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला. सोनिया गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी घातलेला हा घाट होता.

सारांशाने पाहता, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीची प्रक्रिया भलेही लोकशाही मार्गाने पार पडेल. परंतु यातून निवडून येणारा अध्यक्ष हा स्वतंत्रपणाने काम करेल का? पक्षाचा रिमोट कंट्रोल गांधी घराण्याकडून काढून घेतला जाईल का? तसे झाल्यास गांधीनिष्ठ काँग्रेसवासियांना ते रुचेल का? न रुचल्यास ते लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या नव्या अध्यक्षाला कितपत सहकार्य करतील? नवा अध्यक्ष जर नामधारीच राहणार असेल तर मग या निवडणुकांमागचा उद्देश काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडली आहेत. काँग्रेस पक्षामध्ये घुसळण होण्याची शक्यता आहे. यातून नेमके काय बाहेर येते हे पाहूया.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com