‘आयुष्याचा गेम’ टाळण्यासाठी....

‘आयुष्याचा गेम’ टाळण्यासाठी....

व्हिडिओ गेमिंगचा अतिवापर याला जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आजार म्हणून मान्यता दिली आहे. ‘पबजी’सारख्या गेमच्या माध्यमातून हिंसेची बिजे रुजवली जात आहेत. या गेमवर बंदी घालूनही आज असंख्य तरुण-तरुणी तो खेळतात. कोल्हापूर जिल्ह्यातील एका तरुणाने पबजीच्या वेडात आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. पबजीव्यतिरिक्त अन्यही अनेक गेमच्या विश्वात गुरफटल्यामुळे मुलांचे भावविश्व उद्ध्वस्त होत आहे. त्यांच्या बालमानसिकतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या विळख्यातून कसे बाहेर पडायचे?

पबजी’ या ऑनलाईन मोबाईल गेममुळे मुलांमध्ये हिंसा, आक्रमकता, ऑनलाईनचे वेड आणि व्यसनाधीनता वाढू लागल्याने आणि काहींनी पबजी गेमच्या वेडापायी आपले प्राण गमावल्यामुळे केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी प्लेअर अननोन बॅटल ग्राऊंड अर्थात पबजी या गेमवर बंदी आणली. पण बंदी असतानाही तरुण आणि लहान मुले पबजी गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी नांदेडमध्ये बारा वर्षांचा एक मुलगा पबजी खेळण्यासाठी घर सोडून निघून गेल्याचे वृत्त समोर आले होते. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील एका 19 वर्षीय तरुणाने पबजीच्या आहारी जाऊन विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. एका पाहणीनुसार जगभरातील सुमारे 400 दशलक्ष बालके आणि युवक हा गेम रोज खेळतात. देशात या गेमचे व्यसन वाढू लागल्यानंतर सर्वप्रथम गुजरात आणि कर्नाटक या राज्यांनी त्यावर बंदी घातली आणि त्यानंतर केंद्र सरकारनेच यावरील बंदीचा निर्णय जाहीर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तालकटोरा स्टेडियममध्ये परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात बोलत असताना मुलांना ऑनलाईन गेमपासून दूर कसे ठेवायचे, हाच प्रश्न विचारण्यात आला. त्याबरोबर मोदींनी हा गेम पबजीच असणार, असे विधान केल्याबरोबर पालकांनी टाळ्यांच्या गजराने स्टेडियम दणाणून सोडले. यावरून पालकांना पबजी गेमचा कसा तडाखा बसला आहे, याची कल्पना येते. त्यावेळी पंतप्रधानांनी पालकांना सांगितलेली गोष्ट अनुकरणीय आहे. ते म्हणाले, मुलांना तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही; परंतु ते कसे आणि कशासाठी वापरायचे, हे मुलांना कळले पाहिजे. पालकांनी तंत्रज्ञानाची योग्य माहिती मुलांना दिली पाहिजे. मुलांनी प्ले-स्टेशन सोडून प्ले-ग्राऊंडवर जायला हवे. कारण एका गेमवर बंदी आणली तरी दुसरा गेम येऊ शकतो आणि तो विळख्यात घेऊ शकतो.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे व्हिडिओ गेमिंगचा अतिवापर याला जागतिक आरोग्य संघटनेने मानसिक आजार म्हणून मान्यता दिली आहे. कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरील व्हिडिओ गेम्सचा अतिप्रमाणात आणि अनिवार्य स्तरावर वापर करणे याचा अर्थ त्याचे व्यसन जडले आहे असा होतो. व्हिडिओ गेम खेळायची वेळ झाल्यानंतर ते खेळायला न मिळाल्यास बेचैन होणे, त्रास होणे, मनोवस्थेत बदल होणे, चिडचिड होणे, अन्य कामात लक्ष नसणे ही याची काही लक्षणे सांगता येतील. प्राथमिक टप्प्यावर ही लक्षणे अत्यल्प प्रमाणात दिसतात, पण हळूहळू ती वाढत जातात. गेम्सच्या अतिआहारी गेल्यामुळे सामाजिक संपर्क तुटतो आणि हळहळू ती व्यक्ती समाजातून बाहेर पडते. तसे झाल्यास संपूर्ण जीवनशैली व्हिडिओ गेम खेळत बसण्याशी निगडीत बनते. अर्थातच हे टप्प्याटप्प्याने होत जाते. सुरुवातीला ती व्यक्ती दोन तास खेळत असेल तर काही काळाने तेवढ्या कालावधीने समाधान होत नाही. मग चार तास, सहा तास असे तास वाढत जातात.

गेमिंगचे व्यसन का जडते?

याला कारणीभूत असते ते डोपामाईन नावाचे मेंदूतील रसायन. प्रत्येकाच्या मेंदूमध्ये रिवॉर्ड मेकॅनिझम असते. उदाहरणार्थ, शाळेत पहिला क्रमांक मिळाल्यानंतर सुवर्णपदक मिळत नाही, पण पहिला आल्याचा एक आतून आनंद होतो. अशाच प्रकारे नवीन गाडी घेतली, चॉकलेट खाल्ले तर आनंद होतो, बरे वाटते. याला मेंदूतील रिवॉर्ड मेकॅनिझम म्हणतात. हेच रिवॉर्ड मेकॅनिझम या गेम्समध्येही येते. कदाचित ते प्रत्येक व्यसनात असते. म्हणूनच व्यक्ती ती गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहते आणि त्या अनुभवातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करते. गेम्सचा विचार करता याची रचनाच मुळात तशा प्रकारची केलेली असते. प्रत्येक पायरी यशस्वीपणे पार केल्यानंतर बक्षीस मिळत राहते. डोपामिन नावाच्या रसायनामुळे हे घडते. पूर्वी इंटेन्स कंट्रोल डिसऑर्डर यामध्ये याची गणना व्हायची. पण डब्ल्यूएचओने त्याला वेगळा आजार म्हणून वेगळी मान्यता दिली आहे. याचे कारण जगभरात अनेक जण या आजाराने ग्रस्त आहेत.

व्हिडिओ गेम्सच्या जाळ्यात गुरफटत चाललेल्यांमध्ये किशोरवयीन मुलांचे प्रमाण मोठे आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास, सामाजिक आयुष्य, नातेसंबंध आणि संधी या सर्वांचा याच्याशी संबंध असतो. एकदा गेम्सचे व्यसन लागले की मग अभ्यासात लक्ष लागत नाही, मार्क चांगले पडत नाहीत आणि त्याचा परिणाम करिअरवर होतो. हे दुष्टचक्र आहे. पण गेम्सच्या विश्वात खोलवर नजर टाकल्यास उपरोक्त गोष्टी सौम्य वाटतात. काही काऴापूर्वी ब्लू व्हेलसारख्या गेम्सची चर्चा सर्वत्र होत होती. या खेळामध्ये विविध प्रकारचे टास्क देण्यात येतात आणि ते पूर्ण करावे लागतात. यामध्ये काही टास्क व्यक्तीला इजा पोहोचवू शकणारे असतात आणि याचा शेवट असतो तो आत्महत्येचा टास्क. रशियातच या गेमची सुरुवात झाली आणि सर्वाधिक नुकसानही रशियातच झाले. ब्लू व्हेलच्या सापळ्यात अडकून अनेकांनी जीव गमावला. परंतु एक ब्लू व्हेल किंवा पबजी गेला की दुसरा येतो. त्यामुळे आपण मुळाशी लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत एक साधे सोपे सूत्र लक्षात ठेवावे ते म्हणजे अति तेथे माती. ‘ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो’ अशी एक म्हण आहे ती यासंदर्भात नेहमी लक्षात ठेवावी. दूध पौष्टिक आहे म्हणून पाच लिटर दूध प्यायल्यास स्वाभाविकपणे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागेल. याचा अर्थ दूध वाईट नव्हते पण अतिप्रमाणात आणि गरज नसताना प्यायल्याने त्रास झाला. अशाच प्रकारे व्हिडिओ गेम्स हे मनोरंजन म्हणून खेळल्यास त्यातून आनंद मिळू शकतो, पण त्याचा अतिरेक केल्यास व्यसन ठरू शकते.

बदलत्या काळात मुलांना मोबाईलपासून कायमचे दूर ठेवणे हे शक्य नाही. कारण हल्ली विविध शालेय उपक्रमांसाठी, अभ्यासासाठीही मोबाईलचा वापर केला जात आहे. त्यामुळे मुलांना मोबाईल देऊच नये ही गोष्ट ऐकायला चांगली वाटत असली तरी अमलात आणणे कठीण आहे. त्यामुळे मुलांना मोबाईल वापरण्यास जरूर द्यावा, पण त्याच्या वापरावर सुरुवातीपासूनच नियंत्रण ठेवावे. मोबाईलचा काळ येण्यापूर्वी टीव्हीबाबत काही पालकांनी मुलांवर असे नियंत्रण ठेवले होते, किंबहुना आजही ते आहे. ठरावीक काळच टीव्ही बघायचा याप्रमाणे दिवसातील ठरावीक कालावधीतच मोबाईल वापरायचा असा नियमच मुलांना आखून द्यावा. उदाहरणार्थ, रात्री 8 नंतर मोबाईल वापरायचा नाही, असा नियम ठरवता येईल. या नियमाचे पालकांनीही पालन केले पाहिजे. तसेच ते एखाद्या दिवशी न करता तो दररोजचा नियम म्हणून पाळला गेला पाहिजे. याखेरीज पेरेंटेल लॉकच्या माध्यमातून मोबाईल, कॉम्प्युटरवर फेसबुक किंवा पोर्नोग्राफी साईटस् या लॉक करून ठेवाव्यात. यासाठी पालकांनी तंत्रज्ञानाबाबतचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुले मोबाईलवर, संगणकावर काय पाहतात, कोणत्या साईटस्ना भेटी देतात, त्यांचे या आभासी जगातील मित्र-मैत्रिणी कोणकोणते आहेत, त्यांच्याशी त्यांचे काय चॅटिंग चालते या सर्वांवर पालकांचे लक्ष असले पाहिजे. गेम खेळताना त्याचे ‘एज रेटिंग’ तपासून पाहावे, जेणेकरून आपल्या वयास अनुरूप गेम ते खेळतात का, हे समजेल. तसेच आपल्या प्रोफाईलवर व्यक्तिगत माहिती शेअर न करण्याविषयी मुलांना बजावले पाहिजे. मुले खतरनाक खेळांकडे वळू नयेत याची दक्षता ‘सेफ्टी सेटिंग’च्या माध्यमातून घेणे शक्य आहे. मुले जर सातत्याने मोबाईलची मागणी करत असतील किंवा त्यापासून लांब राहण्यास नकार देत चिडचिड करत असतील तर ते मानसिक आजाराचे लक्षण आहे. याबाबत समुपदेशनाचा पर्याय प्रभावी आहे. त्याबाबत कोणताही संकोच न बाळगता मुलांचे समुपदेशन केले पाहिजे. त्यातून अनर्थ टळण्यास निश्चित मदत होऊ शकते !

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com