Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगशाश्‍वत दूध उत्पादन आणि रोजगार निर्मितीसाठी टीएमआर

शाश्‍वत दूध उत्पादन आणि रोजगार निर्मितीसाठी टीएमआर

प्रगत देशांमध्ये एक गाय एका विताला 12 ते 15 हजार लिटर दूध देते. तेच प्रमाण आपल्याकडे 2000 ते 2500 लिटरच्या दरम्यान आहे. धवलक्रांती झाली ती फक्त

एकाच गोष्टीमुळे ती म्हणजे गाईंचे संकरीकरण. संकरित गाई आल्या परंतु त्यांचे व्यवस्थापन मात्र आजही पारंपरिक पद्धतीनेच केले जाते.

- Advertisement -

दूध उत्पादकता वाढविण्यासाठी संकरीकरणासह गोठ्याचे व्यवस्थापन आणि चारा खाद्य (अन्नद्रव्ये) व्यवस्थापन गरजेचे आहे. पण आपण संकरीकरण सोडता इतर दोन गोष्टींकडे फारच दुर्लक्ष केलेले आहे. गो-आरोग्य, कुपोषणाचा प्रश्‍न, मागील दहा वर्षांमध्ये मुक्तसंचार पद्धतीने गोपालन ही संकल्पना पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये राबविली गेली. परंतु इतर भागांमध्ये मात्र गोठ्याचे अयोग्य व्यवस्थापन हे दुग्ध उत्पादन घटविण्यास आणि गाईंचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. दुग्ध व्यवसाय आणि चारा खाद्य व्यवस्थापन याबद्दल तर फारच अनास्था आहे. आजही हिरवा चारा 50 टक्के तर 35 टक्के वाळलेल्या चार्‍याची कमतरता आपल्या देशामध्ये आहे. म्हणजेच चार्‍याचे कुपोषण आहे. खाद्याबद्दल तर न बोललेलेच चांगले. ज्यामधून गायीचे पोषण आणि दुग्ध उत्पादकता या महत्त्वाच्या बाबी घडत असतात त्याकडे फारच दुर्लक्ष आहे. एकूण दुग्ध उत्पादकतेपैकी फक्त 30 ते 40 टक्के उत्पादकता खाद्य साध्य करू शकते. चार्‍याचा विचार केला तर जे उपलब्ध आहे त्याचा वापर चारा म्हणून केला जातो. चार्‍यामध्ये अनेक बदल होतात. चार्‍यामध्ये बदल झाला की गाईच्या पोटामध्ये पचविण्यासाठी आवश्यक असलेल्या जैविक- रासायनिक प्रक्रियेमध्ये बदल करावा लागतो. अन्यथा गाईच्या उत्पादकतेवर तसेच आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. कोणत्याही उत्पादनाचे शास्त्र आहे की जो पक्का माल पाहिजे त्यानुसारच कच्च्या मालाचा पुरवठा करावा लागतो. गाईच्या बाबतीत मात्र वेगळे आहे. कच्चा माल कोणताही म्हणजेच जो उपलब्ध आहे तो द्या मात्र दूध हमखास पाहिजे! या सर्व बाबींमुळे दूध उत्पादकता घटली परंतु त्याचबरोबर गाईंच्या आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले. गाई गाभण न राहाणे, गाई उलटणे यासारखे प्रजननाचे प्रश्‍न निर्माण झाले.

या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. भविष्यात दुग्ध व्यवसाय हा व्यावहारिक दृष्टीने किफायतशीर होऊन यातून ग्रामीण जनतेला उद्योजकतेकडे घेऊन जाण्यासाठी टोटल मिक्स रेशन सारखी संकल्पना राबविणे गरजेचे आहे.

टीएमआर म्हणजे काय?

टोटल मिक्स रेशन ज्याला टीएमआर म्हणतात. गायीला शरीराच्या वजनानुसार लागणारी अन्नद्रव्ये तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक असलेली अन्नद्रव्ये देणे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, दूध उत्पादनानुसार आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा विचार करून हिरवा व वाळलेला चारा तसेच खाद्य, मिनरल मिक्श्‍चर या सर्व घटकांच्या एकत्रित केलेल्या मिश्रणाला टीएमआर म्हणतात. गाईच्या एकूण कार्यपद्धतीचा विचार करून आवश्यक असलेल्या सर्व मूलद्रव्ये, खनिजे, अन्नद्रव्ये तसेच ऊर्जा यांचा विचार करून टीएमआर तयार केला जातो. टीएमआर तयार करताना गाईची रवंथ करण्याची क्रिया, गाईच्या पोटामध्ये सुरू असलेली पचनक्रिया यांचा विचार करून चार्‍याचा आकार ठरविला जातो. या पद्धतीने चारा व्यवस्थापन अनेक प्रगत देशांमध्ये केले जाते. त्याचमुळे त्यांची दूध उत्पादकता 12 ते 15 हजार लिटर प्रतिवर्ष असते. दूध देणारी गाय, गाभण गाय, दूध न देणारी गाय, दुधाचे उत्पादन, दुधामधील फॅट आणि एसएनएफ, गाईचा बॉडी स्कोअर आणि वजन, चार्‍याचा प्रकार, चार्‍यामधील विविध अन्नघटक, खाद्यांचे प्रकार आणि त्यामधील अन्नघटक, चार्‍यामधील पाण्याचे प्रमाण या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून टीएमआर बनविले जाते. टीएमआर बनविताना दररोज आणि वर्षभर गाईला सारख्याच प्रमाणात विविध अन्नघटक दिले जातात. त्यामुळे गाईच्या दररोजच्या चयापचय क्रियेमध्ये जास्त बदल होत नाहीत. परिणामी गाईच्या उत्पादनामध्ये तसेच आरोग्यावर याचा अनुकूल परिणाम होऊन गाईचे उत्पादन तसेच आयुष्यमान वाढते. टीएमआर बनविताना शास्त्रोक्त पद्धतीने प्रथिने, ऊर्जा, तंतुमय पदार्थ, कर्बोदके, फॅट, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये, व्हिटॅमिन आणि इतर जैविके-प्रतिजैविके यांचा विचार करून संतुलित पद्धतीने त्याचा वापर केला जातो. सर्वसाधारण 35 ते 40 टक्के कर्बोदके आणि 60 ते 65 टक्के प्रथिने अशा ढोबळमानाने वर्गीकरण करता येईल.

विविध लाभ

टीएमआरचा वापर केल्यामुळे गाईच्या पोटामध्ये (रुमेन) अन्न पचनीय जीवजिवाणूंची संख्या चांगली आणि संतुलित राहात असल्यामुळे दिलेल्या खाद्याचा चांगल्या प्रकारे वापर होतो. म्हणजे चारा-खाद्य परिवर्तन करून त्यांची कार्यक्षमता वाढून उत्पादनात वाढ होते तसेच गाईचे आरोग्य चांगले राहते. एकत्रित चार्‍यामध्ये असलेल्या नत्र आणि कर्बोदकांमुळे चार्‍याचे विघटन लवकर होते तसेच जिवाणूंना प्रथिनांचा पुरवठा अखंडित सुरू राहतो. चार्‍यामुळे दिलेल्या अन्नघटकांचा पुरेपूर वापर होतो. विविध चारा पिके तसेच खाद्य-अन्नघटक वेगवेगळे खाऊ घालताना त्यातील काही बाबी गाई खात नाहीत. परंतु टीएमआरमुळे सर्व आवडी-नावडीचे घटक एकत्र केल्यामुळे एक प्रकारची चव निर्माण होऊन जनावरे आवडीने खातात. युरिया, चुना, बायपास फॅट, बायपास प्रोटिन ही जनावरांना वेगळी खाऊ घालणे अवघड असते. परंतु टीएमआरमुळे याचा वापर करणे सोपे जाते. गाईच्या प्रत्येक घासामधून संतुलित अन्नद्रव्ये मिळत असल्यामुळे त्यांची पचनीयता वाढते. टीएमआर बनविण्यासाठी एका जागेवर किंवा फिरते मशिन या दोनही प्रकारांचा वापर करता येऊ शकतो.

काही तोटे

टीएमआर गाईच्या विविध अवस्थांनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या सात गटांमध्ये बनविले जाते. ज्यांच्याकडे गाईंची संख्या कमी आहे त्यांना हा सर्व खर्च करणे परवडत नाही. एका शेतकर्‍याला हा खर्च करणे अवघड आहे. यासाठी दूध उत्पादकांचा गट तयार करून त्यांच्या माध्यमातूनच या तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. टीएमआर बनविताना चार्‍याचे तुकडे योग्य प्रमाणात केले नाही किंवा धान्य व्यवस्थित बारीक केले नाही आणि सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळले नाही तर त्याचा फायदा होत नाही. टीएमआरचे सर्व घटक योग्य मोजमाप करून योग्य व्यवस्थापनाखाली चांगले तयार केले नाही तर फायद्याऐवजी तोटा होतो. शास्त्रोक्त पद्धतीनेच टीएमआर बनविणे आवश्यक आहे आणि त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

घ्यावयाची काळजी

गाईच्या प्रत्येक अवस्थेनुसार टीएमआरमध्ये अन्नघटकांचे वेगवेगळे प्रमाण असते. त्यामुळे टीएमआरची सात गटांमध्ये विभागणी होते. जास्त उत्पादन देणार्‍या गाई, मध्यम उत्पादन देणार्‍या गाई, कमी उत्पादन देणार्‍या गाई, दूध न देणार्‍या गाई, विण्याच्या आधीच्या गाई, लागवडीपूर्वीच्या कालवडी आणि गाभण कालवडी अशा सात गटांमध्ये विभागणी करून त्यानुसार त्यांच्या आहारासाठी उपयुक्त अन्नद्रव्यांचा विचार करून टीएमआर बनविले जाते. चारा आणि खाद्यपदार्थ, ज्यापासून टीएमआर बनविले जाते त्यांचे परीक्षण करून त्यामध्ये असलेल्या अन्नघटकांनुसार मिश्रण करणे गरजेचे आहे. अर्धा ते एक इंच आकाराचे चार्‍याचे तुकडे करून त्याचा वापर टीएमआर करण्यासाठी केला जातो. जास्त लहान तुकडे झाले तर त्यामुळे गाईला अपचन तसेच अ‍ॅसिडिटीसारखे आजार होऊ शकतात. टीएमआरमध्ये शुष्क घटक तसेच तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे.

भविष्यातील संधी

पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या पद्धतीत आता बदल घडत आहे. दहा वर्षांपूर्वी मुक्त गोठा, मुरघास या संकल्पना कोणी राबवत नव्हते परंतु आज या तंत्रज्ञानाबरोबरच दुग्ध व्यवसायाचे यांत्रिकीकरण होत आहे. आजचा सुशिक्षित तरुण या व्यवसायाकडे उद्योग म्हणून बघत असून यातून स्वत:चे करिअर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. पाच-पंचवीस लिटर दूध घालणारे आता 200-300 लिटर दूध घालण्याचा विचार करत आहेत. यातील काहींकडे ज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे परंतु जास्त कष्ट करण्याची मानसिकता नाही. शेतामध्ये चारा काढणे, शेण काढणे यासारख्या कामांपेक्षा गोठ्यातील व्यवस्थापनामध्ये त्यांना जास्त रस आहे. चारा व्यवस्थापनातून दोन पैसे जास्त गेले तरी चालतील परंतु दूध उत्पादन वाढून त्यातून जास्त पैसा मिळवू, अशी मानसिकता असलेल्या आजच्या तरुणांमुळे दुग्ध व्यवसायात परिवर्तन होत आहे. मुरघाससारखी संकल्पना अवघ्या पाच-सहा वर्षांत मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. मुरघास तयार करण्यासाठी आढेवेढे घेणारा तरुण आज मुरघास बनवून त्याची विक्री करून चांगला व्यवसाय करत आहे. तसेच मुरघास बनवून देण्यासाठी मशिनरी आणि मनुष्यबळ तयार झाल्यामुळे आज याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. म्हणजेच मुरघासामुळे दुग्ध उत्पादकांचा फायदा तर झालाच त्याचबरोबर सेवा-सुविधा पुरविणार्‍या यंत्रणांचाही फायदा झाला. आज ग्रामीण युवकाबरोबरच शहरी युवक तसेच गुंतवणूक करणार्‍या व्यक्ती दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. हे उदरनिर्वाहाचे साधन न राहता व्यापारी तत्त्वावरील व्यवसाय व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मध्यम ते मोठ्या प्रमाणातील डेअरी फार्म उभे राहात असून, 50 ते 500 गाईंपर्यंतचे गोठे सुरू होत आहेत. असे फार्म चालविण्यासाठी बर्‍याच जणांकडे स्वत:चे शेत आणि चारा पिके नसल्यामुळे चार्‍यासाठी ते पूर्णपणे परावलंबी आहेत. तरीही हे फार्म किफायतशीर पद्धतीने चालू असल्यामुळे अशा प्रकारचे फार्म भविष्यात मोठ्या प्रमाणात उभे राहतील. शाश्‍वत दूध उत्पादन, दूध उत्पादनाची प्रत आणि अधिक फायद्यासाठी या डेअरी फार्मला चांगल्या प्रकारचा चारा- खाद्य पुरवठा करणे हा मोठा व्यवसाय सध्या सुरू आहे. परंतु यामध्ये शास्त्रीय पद्धतीचा वापर होत नाही. टीएमआरसारखी संकल्पना सुरू झाली तर लहान आणि मध्यम डेअरी फार्मला टीएमआर पुरवठा करण्यासाठीची सेवा-सुविधा निर्माण करून याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मोठ्या फार्म्सकडे त्यांची स्वत:ची योजना असू शकते. गरजेनुसार प्रत्येक शेतकर्‍याला टीएमआर पुरवठा करण्याचे काम झाले तर दूध व्यवसाय शाश्‍वत होऊन ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच शेतकर्‍यांनाही करार पद्धतीने अनेक पिकांचे उत्पादन घेता येईल. त्यातून शाश्‍वत उत्पादनाचे साधन शेतकर्‍यांना मिळेल.

डॉ. भास्कर गायकवाड

संचालक, प्रभात डेअरी लिमिटेड.

- Advertisment -

ताज्या बातम्या