Monday, April 29, 2024
Homeब्लॉगअबकी बार... लसीकरण एक अब्ज पार!

अबकी बार… लसीकरण एक अब्ज पार!

100 कोटी लसीकरणाचा (100 crore vaccinations) टप्पा देश लवकरच पूर्ण करणार असल्याच्या बातम्या माध्यमे केंद्र सरकारच्या (Central Government) हवाल्याने आठवडाभर आधीपासूनच सांगू लागली होती. समाज माध्यमांवरही (Social media) त्याबाबत वातावरण निर्मिती करण्यात आली. साहजिकच त्याबाबत भारतीयांच्या मनात जाणीवपूर्वक उत्सुकता निर्माण केली गेली. अगदी पेट्रोल, डिझेलच्या शंभरी पारचाही सर्वांना विसर पडला. गॅस दरवाढीचा चटकाही जाणवेनासा झाला. अखेर 21 ऑक्टोबरला देशाने त्या विक्रमाला (Vikram) गवसणी घातली. भारतासाठी हा अभिमानाचा (moment of pride) क्षण आहे.

इतिहास रचण्यात नेहमीच पुढे असणार्‍या नव्या भारताने 21 ऑक्टोबर 2021 ला आणखी एक नवा इतिहास घडवला. करोनाप्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटी (एक अब्ज) लसमात्रांचा महत्त्वपूर्ण टप्पा देशाने पार केला आहे. करोनाविरुद्ध लढताना जास्तीत जास्त नागरिकांना लशीचे सुरक्षाकवच देणे ही या लढाईतील सर्वात महत्त्वाची गरज असल्याचे जगाने ओळखले. भारताने 16 जानेवारी 2020 पासून राष्ट्रव्यापी लसीकरण अभियान हाती घेतले.

- Advertisement -

कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा चंग बांधला. राज्यांच्या सक्रिय सहभागातून आता तो तडीसही जात आहे. काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी अडीच लाखांवर लसीकरणाचा उच्चांक देशाने प्रस्थापित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 71 व्या वाढदिवसाची ती अनोखी भेट होती. 100 कोटी लसीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करून देशाने तो विक्रम आता मोडला आहे.

दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात 100 कोटीवी लसमात्रा अरुण राय यांनी घेतली. हा भाग्यवंत पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघातील आहे. पंतप्रधानांनी रुग्णालयात राय यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. हा योगायोग म्हणावा की संबंधित यंत्रणांनी तो जाणीवपूर्वक जुळवून आणला? दोघांचेही हे भाग्य असेल का? अशा शंका उपस्थित केल्या गेल्या. संकटाला कसे सामोरे जायचे? रडण्याऐवजी निर्धाराने कसे लढायचे? संकटावर मात कशी करायची? याचा उत्तम आदर्श भारताने जगासमोर ठेवला आहे.

100 कोटी लसीकरणाचा टप्पा देश लवकरच पूर्ण करणार असल्याच्या बातम्या माध्यमे केंद्र सरकारच्या हवाल्याने आठवडाभर आधीपासूनच सांगू लागली होती. समाज माध्यमांवरही त्याबाबत वातावरण निर्मिती करण्यात आली. साहजिकच त्याबाबत भारतीयांच्या मनात जाणीवपूर्वक उत्सुकता निर्माण केली गेली. अगदी पेट्रोल, डिझेलच्या शंभरी पारचाही सर्वांना विसर पडला. गॅस दरवाढीचा चटकाही जाणवेनासा झाला.

अखेर गेल्या 21 ऑक्टोबरला देशाने त्या विक्रमाला गवसणी घातली. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. 130 कोटी भारतीयांच्या एकजुटीचे आणि परिश्रमांचे हे फलित आहे, असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले. अर्थात हे उत्तुंग यश सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी खूप मोठी यंत्रणा राबली. लस संशोधनाचे सर्वात मोठे आव्हान भारतीय संशोधकांनी पेलले व ते तडीसही नेले.

लसचाचण्या, प्रत्यक्ष वापरासाठी भारतीय औषध महानियंत्रकांची मंजुरी, लसीकरण अभियानाचे नियोजन, राज्यांचा सहभाग व तयारी, आरोग्यसेवकांना प्रशिक्षण, लशींसाठी सुरक्षित साठवणुकीची व्यवस्था आदी बाबींची पूर्तता करावी लागली. करोना योद्ध्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांना सर्वप्रथम लसमात्रा देण्यावर भर दिला गेला. नंतर तरुणाईला लस द्यायला सुरुवात झाली. राज्यांना विश्वासात घेऊन मोहिमेत सामावून घेतल्याने लसीकरण ही केंद्र सरकारची जबाबदारी न समजता राज्यांनी ती समर्थपणे आपल्या खांद्यावर घेतली. आपल्या आरोग्य यंत्रणा सुसज्ज केल्या.

लसीकरण सुलभ व्हावे म्हणून केंद्र सरकारने एक अ‍ॅप विकसित केले. त्यावर नावनोंदणीची सोय करण्यात आली. लशींबाबत वेगवेगळ्या अफवा, शंका-कुशंका, समज-गैरसमजांचे विषाणू पसरल्याने सुरुवातीच्या काळात लसीकरणाला लोकांचा प्रतिसाद कमी होता. लसीकरण अभियान किती यशस्वी होईल याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. करोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वत्र परिस्थिती बिघडली होती. बाधितांना रुग्णालयात खाटा मिळणे कठीण झाले होते. आवश्यक औषधे, उपकरणे व प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्याने लोक धास्तावले होते. अशावेळी प्रतिबंधक लशीचे महत्त्व लोकांना पटू लागले.

तसतसा लसीकरणाला प्रतिसाद मिळू लागला. पुढे तो वाढत गेला. लसीकरण केंद्रांवर भल्या सकाळी रांगा लागू लागल्या. लसपुरवठ्यात अनियमितता आल्याने एप्रिल-मेनंतर देशभर लसटंचाई निर्माण झाली. ती वाढत गेली. लस उपलब्ध नसल्याने केंद्रांवर येणार्‍या लोकांना निराश होऊन माघारी फिरावे लागत होते. लसपुरवठ्यात केंद्र सरकारकडून आप-परभाव दाखवला जात असल्याची ओरड अनेक राज्यांकडून केली गेली.

विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांना लसटंचाईची झळ अधिक बसली. ऑगस्टपर्यंत ही परिस्थिती कायम होती. आता चित्र बदलले आहे. लसीकरण केंद्रांवर मुबलक लसमात्रा उपलब्ध आहेत. लाभेच्छुकांची वाट पाहण्याची वेळ केंद्रांवरील सेवकांवर आली आहे.

देशाने मिळवलेल्या यशात लससंशोधक, उत्पादक कंपन्या, केंद्र सरकार, राज्य सरकारे, आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्था यांचे योगदान आहेच, पण लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात करोना योद्धे आणि लसीकरणाला भरभरून प्रतिसाद देणारे नागरिक यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून करोना थोपवण्यात आणि लसीकरणातून सुरक्षाकवच मिळवण्यात भारताने मोठी सफलता मिळवली आहे.

भारतासारख्या विकसनशील देशात लसीकरण कार्यक्रम राबवणे सोपे नाही, तो पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागतील, असा समज जगातील काही देशांनी करून घेतला होता; तो भारतीय समाजाने खोटा ठरवला आहे. करोना महामारीला संकट न समजता संधी मानून आत्मनिर्भर व्हा, असा संदेश पंतप्रधानांनी गेल्या वर्षी दिला होता. स्वदेशी लससंशोधन करून आणि लसीकरणात 100 कोटींचा टप्पा पार करून भारतीयांनी तो विचार सार्थ ठरवला आहे.

लसीकरणात चीन जगात सर्वात पुढे आहे. तेथे दोन अब्जांहून अधिक लसीकरण झाले आहे. जागतिक क्रमवारीत भारताने दुसरे स्थान मिळवले आहे. लसीकरणात शंभर कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल त्या यशाचा आनंदोत्सव साजरा केलाच पाहिजे. उत्सवहौशी केंद्र सरकारने त्याची जय्यत तयारी केली आहे.

हा क्षण साजरा करण्यासाठी देशातील 100 ऐतिहासिक वास्तूंना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगी रंगांच्या प्रकाशझोतात या वास्तू न्हाऊन निघाल्या आहेत. आनंदोत्सव साजरा करण्याची चालून आलेली दुर्मिळ संधी साधण्याची तत्परता केंद्र सरकारने दाखवली आहे.

लसीकरणात पहिल्या पाच देशांत भारत दुसर्‍या स्थानावर आहे. भारतात करोनाचा प्रभाव झपाट्याने ओसरत आहे. लसीकरणाला वेग आला आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भारताची करोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असे मानता येईल. दोन वर्षांवरील बालकांना ही लस देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी अजून मंजुरीची प्रतीक्षा आहे. सुरक्षा नियम पाळल्याने कोट्यवधी लोक करोना संसर्गापासून बचावले असावेत.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्ण आणि त्यांच्या नातलगांचे बरेच हाल झाले. खाटा मिळणे कठीण झाले. औषधे, प्राणवायू आदींचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता. करोना नियंत्रणात आल्याने आता ती परिस्थिती राहिलेली नाही. करोनाविरुद्धच्या लढाईत भारताने करोनाला बरेच मागे रेटले आहे. नियम पाळून लोक करोनासोबत जगायला शिकले आहेत. सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊन सुरळीत होत आहेत. अर्थव्यवस्थेला गती आली आहे. लसीकरणाच्या सुरक्षाकवचाने त्याला आणखी पाठबळ मिळाले आहे.

100 कोटींचा टप्पा गाठला म्हणजे देशातील समग्र नागरिकांचे लसीकरण झाले असे नाही. पहिली आणि दुसरी लसमात्रा घेतलेल्या नागरिकांची ही गोळाबेरीज आहे. पहिली लसमात्रा घेतलेल्यांना दुसरी मात्रा घेतल्यानंतरच खरी सुरक्षा प्राप्त होऊन प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकेल. करोनाचे स्वरुप बदलत आहे. जगभर त्याचे वेगवेगळे अवतार आढळून येत आहेत. ते अवतार पाहता दोन लसमात्रा घेतल्यानंतरसुद्धा पुरेशी सुरक्षा आणि प्रतिकारक्षमता निर्माण होईल का? असा सवाल केला जातो.

दोन लसमात्रा घेतलेल्या नागरिकांना भविष्यात बुस्टर लसमात्रा देण्याची गरज भासेल का? त्याबाबत अजून स्पष्टता नाही. तशी शक्यता असल्यास बुस्टर लसमात्रेचीही वेळीच तजवीज करावी लागेल. पुढेही असाच उत्साह आणि जागरूकता केंद्र व राज्य सरकारांनी बाळगली तर पोलिओप्रमाणेच करोनासुद्धा भारतातून कायमचा हद्दपार होईल, असा विश्वास देशवासियांमध्ये निर्माण व्हायला हरकत नाही. चीनमध्ये टाळेबंदीबाबतची नुकतीच प्रसिद्ध झालेली बातमी लक्षात घेता भारतानेसुद्धा पूर्ण निर्धास्त राहण्याची जोखीममात्र पत्करू नये.

- Advertisment -

ताज्या बातम्या