‘शब्दगंध’ : दोन भावांची दुर्लभ भेट !

- एन. व्ही. निकाळे
‘शब्दगंध’ : दोन भावांची दुर्लभ भेट !


मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींसोबतची आताची तिसरी भेट! सत्तेत एकत्र नसतानासुद्धा छोट्या भावाची भेटीची विनंती मोठ्या भावाने, मोठ्या मनाने मान्य केली. केंद्रसत्तेतील शीर्षस्थ नेत्यांनाही पंतप्रधानांच्या भेटीसाठी काही वेळा ताटकळावे लागते, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्याला अपवाद ठरले आहेत.

दोन महिन्यांपूर्वी करोना महामारीचा जोर वाढला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती देण्यासाठी संपर्क साधला तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने तिरसट उत्तर दिले होते. आता मात्र प्रत्यक्ष भेटीची दुर्लभ संधी मुख्यमंत्र्यांना दिली गेली हे महाराष्ट्राचे आणि सत्ताधारी महाविकास आघाडीचे नशीबच!
-----

नुकताच संपलेला आठवडा महाराष्ट्राच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण ठरला असेच म्हणावे लागेल. महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा तसा चांगलाच गाजला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेतली. ही भेट पावणे दोन तासांची होती, असे काही वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे.

सत्तेत एकत्र नसतानासुद्धा छोट्या भावाची भेटीची विनंती मोठ्या भावाने, मोठ्या मनाने मान्य केली. केंद्रसत्तेतील शीर्षस्थ नेत्यांनाही पंतप्रधानांच्या भेटीसाठी काही वेळा ताटकळावे लागते. काही नेत्यांनी अनेकदा भेटीची विनंतीपत्रे पाठवूनसुद्धा पंतप्रधान कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नाही. दोन महिन्यांपूर्वी करोना महामारीचा जोर वाढला होता.

तेव्हा मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांना परिस्थितीची माहिती देण्यासाठी संपर्क साधला तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने काहीसे तिरसट उत्तर दिले होते. आता मात्र प्रत्यक्ष भेटीची दुर्लभ संधी मुख्यमंत्र्यांना दिली गेली हे महाराष्ट्राचे आणि सत्ताधारी महाविकास आघाडीचे नशीबच!मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींसोबतची ही तिसरी भेट! याआधी गेल्या वर्षी उभयतांच्या दोन भेटी झाल्या आहेत.

पहिली भेट पंतप्रधानांच्या पुणे दौर्‍यावेळी शिष्टाचार म्हणून तर दुसरी फेब्रुवारीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी दिल्लीत झालेली सदिच्छा भेट! मुख्यमंत्री ठाकरे यांचा तो पहिलाच दिल्ली दौरा होता. या दौर्‍यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही मुख्यमंत्री भेटले होते, पण आताचा दौरा महाराष्ट्राचे अनिर्णीत राहिलेले महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्याच्या अपेक्षेने होता. या दौर्‍यात उद्धवजींनी पंतप्रधानांची दोनदा भेट घेतली.

आधी राज्याशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी सहकार्‍यांसह पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यानंतर व्यक्तिगत भेट झाली. पंतप्रधानांसोबतच्या चर्चेत मराठा आरक्षण, जीएसटी तसेच विधान परिषदेवर राज्यपालनियुक्त 12 जागांच्या नियुक्त्यांचा प्रलंबित प्रस्ताव आदी प्रमुख मुद्यांचा समावेश होता, पण माध्यमांना राज्यासंबंधीच्या सव्वा तासाच्या चर्चेचे काहीच अप्रुप वाटले नसावे.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यातील वैयक्तिक भेटीबद्दल त्यांना जास्त उत्सुकता का वाटावी? दोन सर्वोच्च नेत्यांमधील गाठभेट म्हणजे महाराष्ट्रातील सत्ताबदलाची नांदीच, असा गोड आणि काहीसा आशाळभूत आशावाद दाखवणारा गैरसमज काही माध्यम पंडितांनी उगाच करून घेतला. महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रश्नांऐवजी सत्ताबदलाबाबत विरोधी पक्षनेत्यांपेक्षा वृत्तवाहिन्यांना सतत स्वप्ने का पडत असतील?जीएसटी थकबाकी, प्राणवायू, औषधे, लसतुटवडा आदी अनेक मुद्द्यांवरून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचे दिसते.

राज्य सरकारच्या निवडक मंत्र्यांकडून केंद्रावर टीकेची झोड उठवली जात आहे. दोन्ही सरकारांमधील संबंध आणखी किती ताणले जाणार? याबद्दल चर्चा सुरू असताना महाराष्ट्राच्या प्रश्नांबाबत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना भेट आणि चर्चेसाठी बराच वेळ दिला. ‘दो गज दुरी’ राखून ‘मन की बात’ न ऐकवता शिष्टमंडळातील नेत्यांची बात त्यांनी कशी ऐकून घेतली याचेच अनेक वाहिन्यांना आश्चर्य वाटत आहे.

राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये संघर्ष होत असला तरी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधानांशी चांगला संवाद आहे. राज्य सरकार चांगली कामगिरी करीत असल्याबद्दल खुद्द पंतप्रधानांनी यापूर्वीच जाहीरपणे प्रशस्तीपत्र दिले आहे, पण पंतप्रधान असे काही बोललेच नसतील, असे विरोधी पक्षाचे काही नेते छातीठोकपणे सांगत होते.

दोन्ही नेत्यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मात्र त्या नेत्यांचा विश्वास आतातरी नक्कीच बसला असेल का? विधानसभा निवडणुकीनंतर दुरावलेल्या दोन भावांच्या दुर्मिळ भेटीबद्दल सत्ताधारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्यातील संबंध आता जिव्हाळ्याचे बनतील, राज्याला जीएसटीसह इतर प्रकारची आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग प्रशस्त होईल व पुढील काळात महाराष्ट्राचे प्रश्न सुटतील, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.

पत्रव्यवहार आणि आधुनिक संवाद साधनांपेक्षा प्रश्नांचा झटपट सोक्षमोक्ष लावायचा असल्यास प्रत्यक्ष भेटीगाठी केव्हाही उत्तम! एका भेटीतून कितीतरी गोष्टी साध्य होऊ शकतात. राजकीय वर्तुळात अनेक मूक संदेश आपोआप पोहोचतात किंवा ते प्रयत्नपूर्वक पोहोचवले जाऊ शकतात, पण महामारीच्या संकटकाळात पत्रापत्रीला राजकारणात सुगीचे दिवस आले आहेत. मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहितात.

विरोधी पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना तर अपवादात्मक स्थितीत एखाद-दुसरा नेता प्रतिस्पर्धी पक्षप्रमुखालासुद्धा पत्र लिहू लागला आहे. नेत्यांच्या पत्रापत्रीबाबत प्रसार माध्यमांचा रस तर वाढणारच! लसीकरणाचा फज्जा, न्यायालयांचे ताशेरे, विरोधी पक्षांचे टोमणे, राज्य सरकारांचे टुमणे, लसनिर्मितीच्या मर्यादा यामुळे केंद्र सरकार गोंधळलेले आहे.

त्याच गोंधळात डिसेंबरअखेर सर्वच नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा सरकारने केली आहे, पण त्याकरता तेवढ्या प्रमाणात लसमात्रांची उपलब्धता कशी होणार? पंतप्रधानांची घोषणा त्यांनी सांगितलेल्या मुदतीत पूर्ण कशी होणार? या विवंचनेत सरकार सापडले आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राच्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन प्रमुख नेते दिल्लीत पोहोचले. याआधी आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घडल्या.

राजकीय भेटीगाठी औपचारिक की अनौपचारिक? यावर राजकीय विश्लेषक भलेही खल करोत, पण नेत्यांच्या भेटीगाठी घडतच असतात. घडायलाही हव्यात. भेटीगाठींशिवाय राजकीय घडामोडी तरी कशा घडणार?‘यास’ चक्रीवादळाने पश्चिम बंगालमध्ये बरीच हानी झाली. ‘दिदी ओ दिदी’ म्हणणार्‍या दादाला जाब विचारण्याची आयतीच संधी नुकसान पाहणी दौर्‍यानिमित्ताने चालून आली होती, पण दिदींनी ती साधली नाही.

दादाला पूर्वीसारखे रसगुल्ले आणि बंगाली कुर्तेदेखील भेट दिले नाहीत. विधानसभा निवडणुकीत दादा आणि त्यांच्या सहकार्‍यांचा दिदीने पाडाव केल्याने सगळ्यांची तोंडे कडवट झाली आहेत. दिदी-दादा यांच्यात हल्ली संवाद होतो, पण तो पत्रांच्या औपचारिक मार्गाने! उद्धवजींनी दीड वर्षापूर्वी युतीचा काडीमोड घेऊन महाविकास आघाडीच्या रुपाने सत्तेचा सोपान गाठला. तेव्हापासून मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यांच्यातील राजकीय संबंधांत कटूता आलेली असणे स्वाभाविक आहे, पण व्यक्तिगत पातळीवर दोघांमधील आपुलकी मात्र कायम आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौर्‍यामुळे देशाला आणि प्रामुख्याने राज्यातील विरोधकांना आता ते कळून चुकले असेल. आघाडी सरकारची रिक्षा पलटी होण्याची भाकिते करून व त्याचे अनेक मुहूर्त वरचेवर काढले जात असताना मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी तास-दीड तासांचा वेळ पंतप्रधानांनी कसा दिला? असा यक्ष प्रश्न राज्यातील राजकीय ज्योतिषांना नक्कीच पडला असेल.

पंतप्रधानांच्या भेटीनंतर महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवेळी माध्यम प्रतिनिधींना एकच प्रश्न सतावत होता; तो म्हणजे आघाडीच्या नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा स्वतंत्र भेट का घेतली असेल याचा! तासाभराच्या भेटीत तिन्ही नेत्यांनी पंतप्रधानांशी राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा केली. नंतर फसर्वांनी त्याची माहिती माध्यमांना दिली, पण त्यामुळे माध्यमांचे समाधान झाले नाही. राज्यात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर संसद अधिवेशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती.

त्यानंतर राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीचेच ते फलित होते असे म्हणावे का? मग आता मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची वैयक्तिक भेट घेतली म्हणून त्या भेटीत युतीची जुळवाजुळव करण्याची चर्चा झाल्याचा तर्क लावणे किती उचित?आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या घेतलेल्या भेटीतून काही साध्य होणार नाही, असा नकारात्मक विचार कोणाच्या मनात डोकावला असेल, पण पंतप्रधानांसोबतची भेट व चर्चा सकारात्मक झाल्याचे मुख्यमंत्र्यांसह तिन्ही नेते छातीठोकपणे सांगत आहेत.

महाराष्ट्राच्या प्रश्नांसंबंधात छोट्या भावाने दिलेल्या पत्रावर पंतप्रधान गांभीर्याने विचार करतील व हे प्रश्न लवकरच सुटतील, असा आशावाद आघाडी सरकार आणि मराठी जनतेने बाळगायला कोणाची हरकत असेल?काही माध्यम प्रतिनिधींना ठाकरे-मोदी यांच्या व्यक्तिगत भेटीची जास्त उत्सुकता होती. त्याबाबत विचारलेला प्रश्न मुख्यमंत्र्यांना रुचला नसावा.

‘मोदींनाच भेटलो, नवाज शरिफांना नाही’ असे मुत्सुद्दीपणाचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावरही तर्कांचे इमले बांधले जात आहेत. ‘पंतप्रधान मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. राजकीयदृष्ट्या आज आम्ही एकत्र नसलो तरी आमचे नाते तुटलेले नाही’ असे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितले.

त्या एका उत्तरात अनेक अर्थ दडलेले असू शकतात. विरोधकांसह सरकारमधील नेत्यांना ते अर्थ बरोबर समजले असतील. शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट झाल्यावर स्वतंत्र भेटीची गरज काय? हा प्रश्न राज्याच्या राजकारणात पिंगा घालू लागला आहे. काही जणांना पुन्हा पहाटेच्या शपथविधीची स्वप्ने पडू लागल्यास नवल नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com