कांदा निर्यातीला भरपूर वाव

कांदा निर्यातीला भरपूर वाव

हवामानातील बदल, बाजारभावातील अस्थिरता, पिकातील वाढलेल्या समस्या यामुळे कांदा पीक अतिसंवेदनशील झाल्याचे दिसते. अशा परिस्थितीत शेतकरी आणि ग्राहक यांचे हित जपण्यासाठी ठोस विपणन नीती आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन घेणे अपरिहार्य आहे.

कांदा हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे पीक आहे. राज्यातून मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होते. अनेक लहान आणि मध्यम जमीनधारक शेतकर्‍यांचे कांदा महत्त्वाचे व आर्थिकदृष्ट्या भरवशाचे अनिवार्य पीक आहे. कांद्याची देशातील मागणी वाढल्याने या पिकाखालील क्षेत्र वाढल्याचे दिसते, पण उत्पादन खर्च विविध कारणांनी वाढत आहे. मात्र उत्पादकतेत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे कांद्यापासून मिळणारे निव्वळ उत्पन्न किंवा आर्थिक फायदा कमी होत असल्याचा अनुभव कांदा उत्पादक शेतकर्‍यांना येत आहे. हवामानातील बदल, बाजारभावातील अस्थिरता, पिकातील वाढलेल्या समस्या यामुळे कांदा पीक अतिसंवेदनशील झाल्याचे दिसते. अशा परिस्थितीत शेतकरी आणि ग्राहक यांचे हित जपण्यासाठी ठोस विपणन नीती आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन घेणे अपरिहार्य आहे.

पिकाचे विविधीकरण, प्रक्रिया उद्योग आणि निर्यातवाढ या महत्त्वाच्या बाबींसोबतच काढणीनंतरचे आणि साठवणीतील नुकसान आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य प्रशिक्षण शेतकर्‍यांसोबत इतर घटकांसाठी गरजेचे आहे. गरज किंवा समस्या आधारित संशोधनाला गती देऊन त्याचे निष्कर्ष तत्परतेने शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. त्यासाठी विविध संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, राज्य सरकारचा कृषी विभाग, शेतकरी उत्पादन कंपन्या यांच्या समन्वयातून कांदा पीक विकास आणि विपणन धोरण कसे ठरवता येईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

कांदा पिकाचे उत्पादन

2021-2022 मधील देशाचे कांदा उत्पादन 311.2 लाख टन असल्याचे आकडेवारी सांगते. हे उत्पादन 2020-2021 च्या तुलनेत (266.4 लाख टन) 16.81 टक्के अधिक आहे. हे खरे असले तरी कांद्याच्या किमती अपेक्षेपेक्षा कमी असणे स्वाभाविक आहे. सरासरी उत्पादनात फारशी वाढ नाही, पण उत्पादन खर्च सतत वाढत आहे. शेतकर्‍यांना मिळणारा निव्वळ नफा कमी होतो म्हणून शेतकर्‍यांकडून होणारी ओरड खरी आहे. देशाच्या कांदा उत्पादनात महाराष्ट्र 28-32 टक्क्यांचा हिस्सेदार आहे. साहजिक कांदा पिकाच्या समस्यांची सर्वाधिक झळ महाराष्ट्र आणि राज्यात कांदा उत्पादनात आघाडीवर असलेल्या त्यातही नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बसते. कांद्याखालील क्षेत्र वाढत असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून सांगितले जात असले तरी ती आकडेवारी विश्वासार्ह आहे हे ठरवणे मात्र कठीण आहे.

विविध हंगामातील उत्पादन

नाशिक भागात खरीप (पोळ), हिवाळी (रांगडा) व रब्बी (उन्हाळी) अशी तीन पिके घेतली जातात. पैकी फक्त उन्हाळ कांदा साठवला जातो. पावसामुळे खरीप कांद्याचे जास्त नुकसान होते. तरीही अनेक समस्यांचा सामना करून कांदा पिकवण्याची कसरत शेतकरी करतात. त्यामानाने रांगडा कांदा सोपा झाला, पण हवामानातील बदल आणि बियाणांतील भेसळीमुळे रांगडा व उन्हाळी कांद्याची सरमिसळ झाल्याचे दिसते. त्यातून बाजारभाव आणि साठवणीतील नुकसानीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळी कांद्याचे उत्पादन जास्त असले तरी साठवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याबाबतच्या विविध कारणांचे योग्य विश्लेषण करून शेतकर्‍यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. सामान्य शेतकर्‍यांसाठी कांदा नगदी पीक आहे. या पिकाच्या उत्पादनासाठी मजुरांची जास्त गरज लागते. यांत्रिकीकरणावर मर्यादा आहेत. कारण वैयक्तिक शेतकरी कमी क्षेत्रात कांदा उत्पादन घेतात. यांत्रिकीकरणासाठी लहान क्षेत्रावर व कमी ऊर्जेवर चालणारी यंत्रे उपलब्ध झाल्यावर कांद्याचा उत्पादन खर्च कमी होऊ शकतो.

उत्पादनाचे टप्पे

कांदा उत्पादनात रोपवाटिका, मुख्य पीक, साठवण व बीजोत्पादन यात वाणांची निवड व शुद्ध बियाणांची उपलब्धता इथपासून तर तण व्यवस्थापन, खतांचे योग्य नियोजन, पाण्याची गुणवत्ता व व्यवस्थापन, रोग-किडीचे व्यवस्थापन, काढणीनंतरचे व साठवणीतील नियोजन अशा अनेक टप्प्यांत शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्यांना नेमके काय मार्गदर्शन करावे या दिशेने संशोधन व प्रबोधन झाले पाहिजे. सोबतच हवामान बदलाचा विचार करून वाणांची निर्मिती झाली तरच काही प्रश्नांना उत्तर मिळेल.

बाजारभावाचा प्रश्न : कांद्याचा बाजारभाव हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. कांद्याची प्रत व बाजारपेठांनुसार बाजारभावातील तफावत आढळते. ही तफावत चिंतेची बाब आहे. साठवलेल्या कांद्याचा भाव वाढण्याऐवजी कमी होतो. त्यामुळे नेमके काय करावे या संभ्रमात शेतकरी पडतो. उत्पादन वाढले की बाजारभाव पडतात. पुरवठा व मागणीनुसार भाव कमी-जास्त होतात. या सर्वसाधारण गोष्टी कांदा पिकाला गेल्या काही वर्षांत लागू होत नाहीत, असे अपवादात्मक चित्र अनुभवास येते. म्हणून सरकारने किमान मूल्य व त्याखाली कांदा विक्री होऊ नये म्हणून ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत पिकापासून तोटा येऊ नये व तशी परिस्थिती आल्यास हवामान आधारित विम्याप्रमाणे बाजारभाव आधारित विम्याद्वारे कांदा उत्पादकांना संरक्षण देता येईल का? याचाही विचार व्हावा. उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के अधिक उत्पन्न मिळाले तरच शेतकरी शेती करण्यात रस दाखवतील आणि युवा वर्ग शेतीकडे वळतील.

कांदा निर्यात :

कांदा निर्यातीत फार मोठे चढ-उतार दिसून येतात. काही वर्षांपूर्वी एका वर्षात 34 लाख टन झालेली निर्यात कमी होऊन 2020-2021 मध्ये 15 ते 16 लाख टनांवर यावी हे कांदा पिकासाठी चांगले संकेत नाहीत. भारतीय कांदा जगात ‘नाशिक कांदा’ म्हणून ओळख टिकवून आहे. त्याचा फायदा घेण्यास भरपूर वाव आहे. सध्या मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका, सिंगापूर, यूएई व नेपाळ या देशांनाच एकूण निर्यातीच्या सुमारे 80 टक्के निर्यात होते. इतर अनेक देशांत निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न करणे व त्यासाठी शेतकर्‍यांच्या उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरच शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने निर्यातीचा लाभ मिळू शकेल.

इराण, तुर्की, चीन, पाकिस्तान, इजिप्त हे कांदा उत्पादक देश भारताचे समर्थक असले तरी भारतीय कांदा प्राधान्याने निर्यात होतो. निर्यातबंदीमुळे स्पर्धक देश फायदा घेतील. सातत्याने असे घडले तर आयातक देश स्वत: तंत्रज्ञान वापरून कांदा उत्पादन करू शकतील, अशा संभावना आहेत हे मी बांगलादेश आणि श्रीलंका कृषी दौर्‍यात पाहिले आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत.

बियाणे उत्पादन व टंचाई

कांदा बियाणे गुणवत्ता, उत्पादन व किमतीदेखील अलीकडे संवेदनशील बनल्या आहेत. कांदा बियाणे उत्पादन खर्च हा मातृकंदांची किंमत व विविध कारणांनी ग्रासीत बीजधारणा यावर अवलंबून आहे. त्यातच बियाणाची उगवण क्षमता अल्पकाळ टिकून राहते. म्हणून जास्त उत्पन्न झाल्यासही समस्या निर्माण होते. वेगवेगळ्या भागात तयार केलेल्या बियाणाची उत्पादकता व गुणवत्ता यावर परिणाम, साठवलेले बियाणे जोमदार करण्यासाठी उचित बीजप्रक्रिया, बियाणांतील भेसळ ओळखण्यासाठी मार्गदर्शन यांसारख्या विषयांवर संशोधन व्हायला पाहिजे.

एकंदरीत कांदा हे अतिसंवेदनशील व बहुचर्चित पीक झाले आहे. पिकाखालील क्षेत्र, उत्पादन, गरज, साठवणीतील नुकसान, निर्यात, प्रक्रिया, बीजोत्पादन, शेतकर्‍यांना आर्थिक लाभ व ग्राहकाला किफायतशीर भावात उपलब्धता यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. आपले कार्यक्षेत्र विक्री क्षेत्रात न्यावे. असे झाले तरच खर्‍या अर्थाने कांदा उत्पादक समाधानी होईल. कांदा नाशवंत असल्याने सुबत्ता व टंचाई या गोष्टी स्वाभाविक आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी व ग्राहक दोघांनाही समाधानी ठेवणारी परिपूर्ण योजना आणणे यावर पिकाशी संबंधित यंत्रणांनी चिंतन बैठक घेऊन अशा योजना देशपातळीवर आणता येणे शक्य आहे. उत्पादन खर्चावर आधारित आधारमूल्य प्रत्येक बाजारपेठेत किमान भाव ठेवून त्यावरच लिलाव झाले पाहिजेत. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ व राष्ट्रीयस्तरावर नाफेडसारख्या यंत्रणांनी विक्री व्यवस्थेत सातत्याने आपली उपस्थिती ठेवावी. त्यासोबतच शेतकर्‍यांच्या उत्पादक कंपन्यांनी सरकारकडून वेगवेगळ्या सोयी-सुविधांसाठी मागणी करून देशाअंतर्गत तसेच निर्यातीसाठी प्रयत्न करावेत. कांदा बियाणे उत्पादन, गुणवत्ता व पुरवठा साखळी निर्माण करावी. कांदा काढणीनंतरची हाताळणी व साठवण यातील नुकसान कमी करण्यासाठी विज्ञान आधारित तंत्रज्ञान वापरावे. हवामान बदल आधारित कांदा उत्पादन तंत्रज्ञानातील बदल अवलंबावेत. यांत्रिकीकरणाचे प्रयत्न करावेत. संशोधन संस्थांनी मार्गदर्शक प्लॉट तयार करून शेतकर्‍यांचा आत्मविश्वास वाढवावा. प्रक्रिया उद्योगास चालना द्यावी. निर्यातवाढीसाठी सरकारने प्रयत्न करावेत. निर्यातबंदीसारखा शेतकर्‍यांना घातक निर्णय घेण्याचे टाळावे. देशांतर्गत विक्री व्यवस्थेत बदल करून कांदा उत्पादक व ग्राहक दोघांचेही हित जपण्याचा प्रयत्न करावा.

मागणी-पुरवठ्यातील संतुलन

खरी आकडेवारी मिळाली तर योग्य नियोजनही शक्य होते. म्हणून कांद्याची देशाअंतर्गत खरोखर किती गरज आहे? हे पुन्हा एकदा तपासायला हवे. बाजारभाव वाढले की त्याची उलट-सुलट चर्चा न होता ग्राहकांने प्रबोधन, वापरात काटकसर, निर्यात मूल्यात वाढ व रेशन दुकानातून सबसिडाईज्ड दराने विक्री यांसारख्या उपाययोजना करणे हे सरसकट निर्यातबंदी किंवा साठवण मर्यादा यापेक्षा जास्त संयुक्तिक ठरते. ग्राहकाला मिळणारा कांदा रास्त दराने मिळावा यासाठी उत्पादकाला वेठीस धरण्यापेक्षा वाहतूक सहाय्य, सरकारी माध्यमातून मदत, शेतकरी उत्पादक संस्थांना बाजार सहाय्य यासारख्या योजनांमधून व्यापारीवर्गाची मक्तेदारी कमी करता येणे शक्य आहे. यासाठी नाफेड किंवा तत्सम सरकारी माध्यमांनी फक्त बफर स्टॉक न करता नियमित खरेदी-विक्री आणि निर्यात करणे गरजेचे आहे. पूर्वी अशा पद्धतीमुळे कांदा उत्पादकांचे तसेच ग्राहकांचेही हित जोपासले जात होते. त्याचा पुनर्विचार व्हायल हवा.

उत्पादन खर्च व उत्पादकता

एकरी उत्पादन खर्च आणि उत्पादकता हा खरे तर अत्यंत वादाचा विषय आहे. वाचनात येणार्‍या यशोगाथांमधून कांदा पिकापासून भरपूर उत्पादन व निव्वळ नफा मिळाला, असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्ष कांदा पिकवणार्‍या बहुसंख्य शेतकर्‍यांचा अनुभव फारसा चांगला नाही. कांदा पिकापासून फायदा तर दूरच उलट तोटाच सहन करावा लागला, अशी तक्रार करणार्‍या शेतकर्‍यांचे प्रमाण मोठे आहे. उत्पादन खर्च किती ते विविध घटकांच्या दरावर निर्भर असते. त्यामुळे एकरी खर्च वाढत जाणार यात शंका नाही, पण तो खर्च दर किलोमागे कसा कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com