Friday, April 26, 2024
Homeब्लॉगरुजवात...अलवार हिंदोळ

रुजवात…अलवार हिंदोळ

दिवाबत्तीची वेळ, दिवेलागणीची वेळ, कातरवेळ, सांजवेळ किंवा झाकडवेळ ही विलक्षण हूरहूर लावणारी वेळ असते. सूर्याचं मावळतीला लुप्त होणं आणि अवघ्या आसमंताची ओळख सावकाशपणे धूसर होत जाणं ! हेच या संधीकालाचं प्राक्तन असतं. ही वेळ ओढ लावणारी असते. अस्वस्थ करणारी असते. मनातलं गुज कुणीतरी ऐकावं यासाठी आसुसलेली असते. पाखरांचे पंख घरट्याकडे झेपावत असतात.

गुरावासरांच्या पावलांनी उडवलेल्या धुळीच्या मुलायम रेषा बनतात. त्यावर त्यांच्याच गळ्यातील घंटांचे निनाद वेल्हाळत राहतात. ना प्रकाश ना काळोख अशा गुढतेने भारलेली, संधीप्रकाशाच्या उंबरठ्यावरची ही वेळ मनाला फार व्याकूळ करते. ही वेळ सहर्ष स्वीकारली की मग आयुष्य नक्षत्रांच्या अगणित प्रकाशफुलांनी उजळून निघतं. आनंदाची ‘रुजवात’ होते. सुख आणि समाधान अलवारपणे हिंदोळत राहतं.

- Advertisement -

कातरवेळ मला जीवाभावाच्या जीवलगासारखी वाटते. तिच्याशी बोलायला आवडतं. तिचा गुढरम्य क्षणकाल मला हवाहवासा वाटतो. झुळूक यावी तशी ती येते आणि क्षणात अंतर्धान पावते. तो क्षण पकडण्याचा मी खूपदा प्रयत्न केला. परंतु बोटांची अग्रं असफलतेच्या काळ्या शाईने फक्त माखत राहिली. कातरवेळ ही क्षणकाल का होईना परंतु समरसून अनुभवण्याचीच गोष्ट आहे. हे जेव्हा समजलं तेव्हा एक टवटवीत चंद्रफुल अनुभवाच्या ताटव्यावर फुलून आलं. आणि मग एका उत्कट अनुभुतीच्या पर्वाची निरामय ‘रुजवात’ झाली.

माझ्या लहानपणी घरोघरी कंदिलच होते. उजेडाच्या ऐतिहासिक गाथेतील ते ‘कंदिलपर्व’ होतं. रोज सायंकाळी घराच्या ओसरीत, आवारात बसून कंदिलाची काच पुसण्याचा कार्यक्रम न चुकता पार पडत असे. आदल्या रात्रीची काजळी साफ करण्यासाठी चुल्हीतल्या राखेचा वापर सर्रास केला जाई. त्यात माझा हातखंडा होता. त्यामुळे तो मान बहुदा मलाच मिळत असे. कंदिलाच्या सांगाड्यातून काच मोकळी केली की राख आणि स्वच्छ कापडाने आतली काजळी हळूहळू निघून जाई. त्या बहिर्गोल काचेतून सभोवतालचं जग न्याहाळताना बदललेल्या आकाराचं मोठं अप्रूप वाटे. काच पुसण्याचा तो स्वच्छ ठसा आजही माझ्या मनावर जसाच्या तसा उमटलेला आहे. अंधाराला धाक दाखवायचा असेल तर कंदिलाची काच पुसणं हे आमचं नित्यकर्म होतं. जीवनाचं ते अविभाज्य अंग होतं. नंतर खेडोपाडी वीज आली आणि अवघं विश्व लखलखीत उजेडात न्हाऊन निघालं. परंतु तरीही माझ्या मनात तो कंदिल ठाण मांडून होता.

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कविता’ या संग्रहातील ‘सांजावताना’ ही कविता आम्हाला अभ्यासक्रमात होती. “सांजावताना, वाऱ्याच्या गंधगर्भ लयीनं आकाश ओथंबून येतं / हर्षोन्मादानं पानापानांतून हसताना सोन्याचं हसू सांडतं / सांजावताना, गावकोसाच्या उध्वस्त देवळातही दिवे लागतात / शेतावरून परतलेल्या गुरावासरांनी वाटा कशा गजबजून निघतात / दूर दूर दाटतात सूर, पाखरांचे थवे किलबिलत असतात / तशाच किलबिलत जाणाऱ्या बायका स्वप्नांची झुंबरं उराशी कवटाळून प्रत्येक पाउलाला बहरून जातात…. सांजावताना…. पाखरांसारख्या….”

त्यावेळी मनात रुतून बसलेली कविता आजही माझा पाठलाग करते आहे. स्वप्नांची झुंबरं उराशी कवटाळून प्रत्येक पाउलाला बहरून जाणाऱ्या बायकांचे थवे माझ्या अबोध मनावर तरंगत राहतात. कोणत्या ओढीने धावत असतील त्या? काय किलबिलत असतील? महानोरांच्या कवितेतील स्वप्नांच्या झुंबरांनीच माझ्या मनात ठाण मांडून बसलेल्या त्या कंदिलाची वात पेटवली आणि खऱ्या अर्थाने कवितेची ‘रुजवात’ झाली. मार्च दोन हजार नऊ साली ‘रुजवात’ कविता लिहून झाली. त्याच वर्षीच्या ‘मौज’ दिवाळी अंकासाठी पाठवून दिली. दिवाळी अंकासाठी कवितांचं संपादन करणाऱ्या कवी गुरूनाथ सामंतांना ती आवडल्याने त्यांनी ती आवर्जून त्या वर्षीच्या दिवाळी अंकात छापली. कविता आवडल्याचे बऱ्याच मान्यवरांनी पत्र पाठवून कळवले.

‘रुजवात’ मौजमध्ये छापून आल्यामुळे तिच्या गुणवैशिष्ट्यांनी ती दोन हजार चौदा साली आलेल्या ‘ताटातुटीचे वर्तमान’ या कवितासंग्रहात आपसूक समाविष्ट झाली. संग्रहाची कलात्मक मांडणी करताना चित्रकार श्रीधर अंभोरेंनी ‘रुजवात’ कवितेनेच संग्रहाचा शेवट केला. संग्रहावर बऱ्याच ठिकाणी लिहून आलं. ‘गावच्या मातीत रुजलेली कविता’ या शीर्षकाखाली पुस्तकाचा परिचय करून देताना सप्टेंबर दोन हजार चौदाच्या कुसुमाकर मासिकात संपादक श्याम पेंढारी ‘रुजवात’ कवितेला केंद्रस्थानी ठेऊन लिहितात….

“कवी खेडेगावातल्या मातीत लहानाचा मोठा झालेला आहे ; याची प्रचिती त्याच्या अनेक कवितांतून येते. कवीने गावच्या चिखल-मातीतला रंग, गंध, कस, पोत, तिथल्या शेतात राबणाऱ्या माणसांचं जगणं असोशीने अनुभवलेले आहे. किंबहूना स्वतःही आपलं आयुष्य मातीच्या सान्निध्यात वेचलं असावं, याची साक्ष त्याच्या अविष्कारीत कविता देतात. ‘रुजवात’ कवितेच्या लेखनकालाचा उल्लेख नसला तरी, ती कविता ; ज्या काळात खेडेगावात वीज वा इतर सुखसाधने नव्हती, त्या काळाचं वास्तवचित्र लख्खपणे साकारते. उदा. ‘कंदिलाच्या काचेवर घास चुल्ह्यातील राख’. घरधनी आपल्या पत्नीला सांगतोय, अंधारून येण्याआधी दिवाबत्ती लाव. कंदिलाची भुरकटलेली काच चुल्ह्यातील राखेने लखलखीत कर आणि कंदिल ओटीवर लाव. बाहेरच्या मिट्ट अंधाराला उजेडाचा धाक मिळू दे. जळणाला आणलेली लाकडं चुलीत सरकव आणि तुझ्या हातचं सुग्रास भोजन लवकरात लवकर मिळू दे, कारण ‘डोळे दोन आतुरले दिवाबत्ती झाकण्याला’. ‘दिवाबत्ती झाकण्याला’ ह्या प्रतिमांतून प्रणयातूरतेची तगमग लिलया साकारली आहे. दोन दोन पंक्तींच्या पाच कडव्यांत कवीने शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा सुंदर आलेख चितारला आहे.”

सुप्रसिद्ध समीक्षक प्रा. तुषार चांदवडकर यांनी ‘ताटातुटीचे वर्तमान’वर लिहिताना ‘रुजवात’ कवितेचा ‘प्रणयाची सर्वात सुंदर भाषा’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला. तर प्रा. गीतेश गजानन शिंदे हा कविमित्र लिहितो, ‘कुठे आणि कसं थांबावं हे आपल्यातील कवीला चांगलं ठाऊक असल्याने आपल्यातील माणूस हा प्रभावीपणे उमटतो ते ‘रुजवात’ या कवितेतून. उजेडाचा अंधाराला धाक असणं ही प्रतिमा आपल्या गरीबीची साक्ष देतानाच आलेल्या श्रीमंतीकडे, सधन-समृद्धीकडे तटस्थपणे पहायला लावणारी आहे.’

मनात लटकून राहिलेला तो काचेचा कंदिल, महानोरांची ‘सांजावताना’ ही अभ्यासक्रमातली कविता आणि एकूणच खेड्यात गेलेलं बालपण या संचिताचं कोलाज म्हणजे ‘रुजवात’ ही कविता. खेड्यातलं जगणं जगल्यामुळे ती माती, ते शिवार, ते शेत, ती चूल आणि तो ऋतूगंध कवितेला संजीवक ठरला. सर्जनशीलतेच्या विशाल पठारावर नवनिर्माणाची प्रेरक ‘रुजवात’ करून गेला. हा शेवट नाही, ही तर सुरूवात आहे याचं लख्ख स्मरण ‘ताटातुटीचे वर्तमान’ मिटताना शेवटच्या पानावरची ‘रुजवात’ कविता मला वारंवार करून देत राहते. मी अलगदपणे रुजून येतो आणि पुन्हा नव्या प्रारंभाची ‘रुजवात’ होते.

रुजवात

सूर्य गेला अस्ताचला

मावळल्या दिशा दाही

अंधारून येण्याआधी

दिवाबत्ती लाव बाई.

कंदिलाच्या काचेवर

घास चुल्ह्यातील राख

उजेडाचा अंधाराला

थोडा तरी हवा धाक.

जळणाचे आणलेले

सार चुल्हाणात थोडे

थकलेले भागलेले

शेतातून येती जोडे.

रांध असे रातच्याला

दाव तुझी हस्तकला

डोळे दोन आतुरले

दिवाबत्ती झाकण्याला.

चंद्र फुले काळजात

उतू चाललेली रात

गंध मातलेला ऋतू

झाली बघ रुजवात.

– शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -

ताज्या बातम्या