दादांचा संघर्षमय राजकीय प्रवास

jalgaon-digital
6 Min Read

‘दादा, जुंधळं पार संपल्यात, गहू-तांदळांचा कणबी घरात न्हाय, राशन भरायला पैसे पायजे होतं’, ‘दादा लई दिसापासून दाढ दुखतीया, चांगल्या डागदरला फुकटात इलाज कर म्हणून चिठ्ठी द्या,’ ‘गावाकडं जायचंय, उताऱ्याला पैसे पायजेत’, ‘पोरीला नीट नांदवत नाहीत, सासरच्यांना तुमच्या भाषेत हिसका द्या!’ अशा एक ना अनेक अडचणी घेऊन बायाबापडय़ांची गर्दी नेहमीच वसंतदादांच्या भोवती असायची. आपल्या प्रत्येक अडचणीचं उत्तर वसंतदादा या एकाच माणसाकडे आहे याबद्दल गर्दीतल्या प्रत्येकाला खात्री असायची.

‘वर्षां’ बंगल्याच्या हिरवळीवरील खुर्चीवर दंडकं घातलेले आणि लुंगी नेसलेले दादा बसलेत आणि प्रत्येकाला आपल्या परीने मदत करताहेत हे दृश्य नेहमीचेच आणि अनेकांनी पाहिलेले. दंडक्याच्या खिशात हात घालून आतल्या आतच नोटा मोजून समोरच्याच्या हातात ठेवत कुणाच्या रेशनची, तर कुणाच्या गाडीभाडय़ाची व्यवस्था करणारे दादा पाहिले की मन गहिवरून जायचे.

एप्रिल १९७७ ते मार्च १९७८, त्यानंतर मार्च १९७८ ते जुलै १९७८ आणि फेब्रुवारी १९८३ असे तीन वेळा वसंतदादांनी मुख्यमंत्रीपद भूषविले पण तिन्ही वेळा मुख्यमंत्रीपद मिळविताना, ते भूषविताना आणि ते सोडतानाही दादांना संघर्षच करावा लागला. १९७७ साली शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करून ते पद मिळविताना ज्या घडामोडी दादांनी केल्या ते एक रंगतदार राजकीय नाटय़च होते. तब्बल ११ वर्षे इतका प्रदीर्घ काळ मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या वसंतराव नाईक यांनी १९७४ साली त्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. शंकरराव आणि वसंतदादांचे फारसे सख्य कधीच नव्हते. सिंचन आणि पाटबंधारे या दोन क्षेत्रांत महाराष्ट्रातील अन्य कुठल्याच राजकीय नेत्याला आपल्याइतके ज्ञान नाही (दादा ज्ञानाला अक्कल म्हणायचे) असे वसंतदादांचे ठाम मत होते, पण त्यांचा हा दावा शंकरराव चव्हाण यांना अजिबात मान्य नव्हता. धरण आणि पाटबंधारे यातील आपले ज्ञान दादांपेक्षा कांकणभर अधिकच सरस आहे, असे शंकरराव म्हणायचे. खरे तर त्यात थोडेफार तथ्यही होते. तत्कालीन पंतप्रधानांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या एका परिषदेत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीच शंकररावांच्या पाटबंधारे क्षेत्रातील ज्ञानावर शिक्कामोर्तब केले होते. या परिषदेतील आपल्या भाषणात ‘शंकरराव चव्हाण पुट महाराष्ट्रा ऑन दि इरिगेशन मॅप ऑफ इंडिया’ अशा शब्दांत वसंतराव नाईक यांनी शंकररावांचे पाटबंधारे क्षेत्रातील मोठे योगदान जाहीरपणे मान्य केले होते. वसंतरावांनंतर शंकरराव मुख्यमंत्री झाले तेव्हा वसंतदादांबद्दल फारसे ममत्व नसतानाही वसंतराव आणि यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात दादांचा समावेश केला होता. पण तरीही या दोन नेत्यांत कधीच कुणाला सख्य पाहायला मिळाले नाही. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येणाऱ्या विविध प्रस्तावांवर अनेक वेळा दोघांची तोंडे दोन दिशेला असायची. हे संबंध पुढे पुढे इतके विकोपाला गेले की दोघांत सातत्याने वाद होऊ लागले. अशाच एका वादानंतर दादांना मंत्रिमंडळातून दूर करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. त्याबाबतचे पत्र वसंतदादांच्या हातात पडले तेव्हा ते परिचितांच्या एका लग्नसोहळ्यासाठी पुण्यास गेले होते. तेथूनच त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे धाडला. त्यानंतर दादा सांगलीकडे रवाना झाले ते शंकररावांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याची प्रतिज्ञा करूनच. सांगलीत जाऊन त्यांनी राजकारणसंन्यासाची घोषणा केली.

पुढे काही काळातच झालेल्या लोकसभा निवडणुकीत साऱ्या देशभर जनता पक्षाकडून काँग्रेसचा पूर्णपणे पाडाव झाला. महाराष्ट्रही त्याला अपवाद नव्हता. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी २८ जागा जनता पक्षाने जिंकल्या तर उरलेल्या २० जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आल्या. महाराष्ट्र हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. लोकसभेच्या ४० हून अधिक जागा नेहमीच काँग्रेस पक्ष जिंकायचा आणि पाच किंवा सहा जागा विरोधी पक्षांना मिळायच्या. १९७७ च्या निवडणुकीत याच्या नेमकी उलट परिस्थिती झाल्याने राज्यभरातील काँग्रेसजनांची मती गुंग झाली. राज्यातील या दारुण पराभवास मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणच जबाबदार आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करायला ही नामी संधी आहे हे हेरून वसंतदादा मुंबईत दाखल झाले आणि ‘काँग्रेसच्या घराला आग लागली असताना मी स्वस्थ बसू शकत नाही,’ अशी गर्जना त्यांनी केली. आपल्या अंगावरील राजकीय संन्यासाची वस्त्रे त्यांनी सांगलीहून मुंबईला येतानाच आयर्विन पुलावरून कृष्णेच्या पात्रात भिरकावून दिली होती. शंकरराव चव्हाणांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याचा विडा उचलूनच दादा मुंबईत आले आहेत हे कळल्यावर काँग्रेसमधील असंतुष्ट आमदार त्यांच्याभोवती गोळा होण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांना हटविण्याएवढे आमदार आपल्या तंबूत दाखल झाल्याचा अंदाज येताच दादांनी शंकररावांवर तोफा डागून राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. या परिस्थितीत शंकररावांची पाठराखण करण्यासाठी इंदिरा गांधींसह कुणी श्रेष्ठीच शिल्लक राहिले नव्हते, कारण त्या सगळ्यांचाच पराभव झाला होता. कुठल्याच बाजूने परिस्थिती आपल्याला अनुकूल नाही हे लक्षात आल्याने आणि राज्यातही वसंतदादांनी पूर्णपणे कोंडी करून टाकल्याने अखेर शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

शंकररावांच्या राजीनाम्याने वसंतदादांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त झाल्याचे सर्वानाच वाटू लागले होते पण तेवढय़ाने दादांपुढच्या अडचणी संपल्या नव्हत्या. विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत नेतानिवडीच्या वेळी आपण वसंतदादांना आव्हान देऊ आणि विधिमंडळ नेतेपदासाठी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवू असा बॉम्बगोळा ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी टाकल्याने राज्यातील काँग्रेस पक्ष पूर्णपणे हादरून गेला. प्रत्यक्षातही काँग्रेस नेता निवडीच्या वेळी वसंतदादा आणि यशवंतराव मोहिते यांच्यात थेट लढत झाली. ही लढाई दादांनी जिंकली आणि ते मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झाले. पण तेवढय़ानेही प्रश्न संपले नव्हते. वसंतदादांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडला आणि त्याच वेळी शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वत:चा महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. खासदारकीला निवडून येण्याचा विक्रम करणारे नगर जिल्ह्य़ाचे नेते बाळासाहेब विखे-पाटील हे त्या वेळी शंकररावांसमवेत होते. बहुधा या दोघांपुरताच हा पक्ष मर्यादित होता. आणखी एक सिंधी की पंजाबी गृहस्थ या पक्षात शंकररावांच्या दिमतीला होते. त्यांचा काँग्रेसशी काय संबंध, असा प्रश्न कोणी विचारला असता तर शंकररावांनाही त्याचे उत्तर देता आले नसते. काँग्रेसमधील आणखी एक वजनदार नेते राजारामबापू पाटील यांनीही दादा मुख्यमंत्री झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचा राजीनामा देऊन थेट जनता पक्षातच प्रवेश केला, तर दुसरे मातब्बर नेते डी. वाय. पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन टाकला. तेही दादांचे विरोधक म्हणूनच ओळखले जायचे. त्यानंतर डी. वाय. कधीच निवडणुकांच्या भानगडीत पडले नाहीत. त्यांनी स्वत:ला शैक्षणिक क्षेत्रात वाहून घेतले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *