एका लग्नाची गोष्ट...!

एका लग्नाची गोष्ट...!

सध्या सर्वत्र विवाहांची धामधूम बघायला मिळत आहे. कोरोना काळात नियम, अटी, कायद्याच्या बंधनात अडकलेले विवाह सोहळे, लॉकडाऊन उठल्यानंतर मुक्त झाले आहेत. त्यांनी मोकळा श्वास घेतला. मंगल कार्यालयात, लॉन्सवर गर्दी दिसू लागली.

सोहळ्यांमध्ये वर आणि वधू पक्षांकडून आपली मनसोक्त हौस फेडून घेतली जात आहे. भव्य मंडप, आकर्षक सजावट, बहुरंगी लाईटींग, कानठळ्या बसवणारा डीजे, नावाजलेले बँड आणि मिष्टान्नाच्या भोजनावळी हे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर कुसुंबा येथील रतनलाल सी.बाफना अहिंसातीर्थवर अलिकडेच पार पडलेल्या चि.सौ.कां.स्वरांजली आणि चि.अमोल यांच्या लग्नाने, आप्तेष्ट व परिचितांमध्ये एक नवीनच धमाल उडवून दिली आहे. आगळा-वेगळा ठरलेल्या या लग्नाची, सोशलमीडिया अर्थात सामाजिक माध्यमांवर मोठी चर्चा रंगली. लग्नाच्या सुमारे दीड महिना आगोदरपासून लग्नाबाबत येणारे मेसेजेस, छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स-रिल्सनी नातलग आणि मित्रांच्या मनाचा ठाव घेतला. हळदीपासून ते बिदाईपर्यंतच्या क्षणांची रोज कलात्मक पद्धतीने आठवण करुन देणं. लग्नाला येण्यासाठी आग्रहाने विनंती करणं. निमंत्रण पाठवणं आणि एकूणच विवाह समारंभाला संस्मरणीय केल्यामुळे लग्न आटोपून तीन आठवडे झाले, तरी हे लग्न आप्तेष्ट, स्नेहीजन, नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या मनावर भूरळ घालून आहे. सौ.स्वरांजली आणि चि.अमोल यांच्या विवाहाची चर्चा, आजही पंचक्रोशीत कौतुकाने होत आहे.

लग्न श्रीमंताकडे असो की गरीबाकडे, मुलाकडे असो की मुलीकडे प्रत्येकजण हा सोहळा मनापासून देखणा आणि संस्मरणीय करु पाहतो. प्रत्येक आई, वडिलांचं हे एक आयुष्यभर जपलेलं स्वप्न असतं. त्याच्या पूर्ततेसाठी ते तन, मन, धन वेचायला तयार असतात. पोटच्या मुलांसाठी सर्वचजण खर्च करतात. हौसमौज करतात. मात्र, आपल्या पुतणीसाठी आपल्या जीवनातला सर्वोच्च आनंद उभा करणारे दुर्मिळ असतात. रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स येथे जनसंपर्क अधिकारी असलेले मनोहर नारायण पाटील त्यातलेच एक. त्यांनी आपल्या भावाच्या, प्रभाकर नारायण पाटील यांच्या मुलीच्या लग्नात, म्हणजेच पुतणीच्या लग्नात मनाची सर्व हौस मनसोक्त फेडून घेतली. विवाह समारंभ दृष्ट लागावा असा केला. पुतणीचा विवाह, साधाच परंतू देखणा. आकर्षक आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला. मात्र, या लग्नाची चर्चा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अतिशय आखिव, रेखिव, कलात्मक आणि मनोवेधक पध्दतीने केली. सुमारे दीड महिना आगोदरपासून उत्सुकता वाढवणार्या टिझर पोष्टस, 4/5 मिनिटांच्या क्लिप्स स्नेहीजनांना येवू लागल्या. त्यातील नाविण्य आणि गोड कलात्मकता म्हणजे या लग्नाचा आत्मा होवून बसली आणि सारे निमंत्रित या लग्नाची औत्सुक्याने वाट पाहू लागले. लग्नाला प्रेमापोटी हजर राहिले. मंडपात स्वरांजली-अमोल सर्वांच्या साक्षीने सप्तपदी चालले आणि साताजन्माचे जोडीदार झाले. हा नयनमनोहर, नेत्रसुखद सौभाग्य सोहळा, अनेकांच्या मनात घर करुन बसला.

शुभमंगल प्रसंगाच्या चित्रमालिकेत आकर्षक रांगोळी, मनभावन पोलीस वाद्य, मोहात पाडणारे चटपटीत भोजन, लग्न आणि बरंच काही, सप्तजन्म बंधन सोहळा, लग्न पहावं करुन, एका लग्नाची गोष्ट, लग्नाची बेडी, जोडी तुझी माझी, नवरी मिळे नवर्याला, जुळून येती रेशीमगाठी, नांदा सौख्य भरे, लाईफ पार्टनर, हळद सोहळा, स्नेहील निमंत्रण, शाही पत्रिका, लगिन घाई, अक्षदा, रबने बना दी जोडी, सप्तपदी, आठवण करुन देणारं कॅलेंडर, मान्यवर सेलिब्रिटींचे शुभेच्छांचे छोटे छोटे चित्रफिती म्हणजे लग्नसमारंभ याची देही, याची डोळा प्रत्यक्ष अनुभुती देणारा होता. यातला लडिवाळ आवाज, उत्तम एडिटींग आणि मनभावन संयोजन केवळ अप्रतिम असे होते. अलिकडे पत्र दुर्मिळ झाली आहेत. मात्र श्री.मनोहर पाटील यांनी पोस्टकार्ड डिझाईनच्या माध्यमातून या सोहळ्याचे पहिले आमंत्रण दिले. लग्नाला उपस्थितांचे आभार मानण्यासाठीही पोस्ट कार्डचीच थीम वापरली गेली. म्हणूनच हे लग्न इतर लग्नांच्या भाऊगर्दीत उठून दिसणारे ठरले.

हा सोहळा खूप खर्चिक, श्रीमंतीचे प्रदर्शन करणारा नव्हता पण बारीक-सारीक नियोजनामुळे सर्वांना भावला. मित्र आणि अगदी मोजक्या जवळच्या नातलगांना कामाच्या जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या होत्या. दिलेल्या कुठल्याही कामाव्यतिरिक्त इतर काम संबंधिताने करू नये, जर त्यांच्याकडे सकाळी 10 वाजेच्या पूर्वीच्या कामाची जबादारी असेल, तर त्यानंतर त्यांनी फक्त विवाहाचा आनंद घ्यावा. बहुतांश मित्रांकडे एक एक कामाचीच जबादारी देण्यात आली होती. काही कामांची एक गृप मिळून जबादारी होती असे नियोजन करण्यात आले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगदी वेळेत 12.58 ला विवाह मुहूर्त साधून वधू-वरांवर उपस्थितीतांकडून अक्षदांचा वर्षाव झाला.

जे आगळं वेगळं त्याची दखल समाजात घेतलीच जाते. त्यासाठी हा प्रपंच. श्री. मनोहर पाटील यांचा मित्रांचा गोतावळा फार मोठा आहे. समाजमाध्यमात ते सक्रीय असतात. दररोज रात्री नऊ वाजता येणारी त्यांची मनोहारी शब्दप्रवास ही पोस्ट समाजमाध्यमात फारच लोकप्रिय ठरली आहे. अनेक जण या पोस्टची वाट पहात असतात. या सर्वात हृदयाला भिडणारा प्रसंग म्हणजे नवरीची विदाई. आई-वडिलांच्या काळजाचा घड जेव्हा जावयाच्या हाती सुपूर्द केला जातो, तो हळवा क्षण प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतो. ही निरोपाची घालमेल अत्यंत हृदयस्पर्शी पध्दतीने मांडण्यात आली आहे. लेकीसाठी आई-बाप म्हणजे देवरुप. माहेराला सोडून जातांना तिच्या मनाची तगमग ती अश्रू रुपाने डोळ्यातून सांडते. लेक ही काळजाचा घड असते. तिच्या एका हास्यात आई-वडिलांना नवा जन्म मिळत असतो. ती सासरी सुखाने नांदावी, हीच कुणाचीही अपेक्षा असते. स्वप्नातल्या राजकुमारानं यावं. आपल्या परीला राणी बनवून न्यावं, यातच आई-वडिलांची धन्यता असते.स्वरांजली साठी बिदाई संदेश देतांना दागिने आणि त्याचे मुलीच्या जीवनात असलेले महत्व हा विषय संदेशात भावनिक पद्धतीने मांडून तो चारशेवर आप्तेष्ठांच्या उपस्थितीत दाखविण्यात आला,तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले.हा व्हिडीओ मनोहर पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेज वर अपलोड केला असून त्याला आतापर्यंत अठ्ठावीस हजार लोकांनी बघितला आहे. सौ.स्वरांजली आणि चि.अमोल यांचे वैवाहीक जीवन सुखासमाधानाचे व्हावे. नांदा सौख्य भरे म्हणत, दोन्ही कडच्या परिवाराला अधिक सुखाचे दिवस यावेत. हीच या निमित्ताने शुभकामना.!

(मनोहर पाटील यांचा संपर्क क्रमांक 9420350250)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com