मायेचा झरा

 मायेचा झरा

जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमधल्या मूल्य र्‍हासाच्या जाणिवेने व्यथित होणारे प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले मूल्याधिष्ठित पुरोगामी सामाजिक जाणीव प्रकट करणारे लेखन करत. सामाजिक वास्तवाचे सजग भान असणारा हा लेखक; त्यामुळे समकालीन समाजजीवनाचे अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारे प्रत्ययकारी चित्रण करण्यात ते यशस्वी ठरले.

डॉ. संजय कळमकर

जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमधल्या मूल्य र्‍हासाच्या जाणिवेने व्यथित होणारे प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले मूल्याधिष्ठित पुरोगामी सामाजिक जाणीव प्रकट करणारे लेखन करत. सामाजिक वास्तवाचे सजग भान असणारा हा लेखक; त्यामुळे समकालीन समाजजीवनाचे अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारे प्रत्ययकारी चित्रण करण्यात ते यशस्वी ठरले. कोत्तापल्ले सर 1960 नंतरच्या काळातले महत्त्वाचे मराठी साहित्यिक. कविता, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य आणि समीक्षा अशा विविध वाङ्मय प्रकारांमध्ये दर्जेदार वाङ्मयनिर्मिती करणार्‍या सरांचा जन्म नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड या गावी झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण देगलूरला तसेच मराठवाडा विद्यापीठात झाले. ज्या विद्यापीठात शिकले, शिकवले त्याच विद्यापीठाचे कुलगुरू होण्याचे भाग्य त्यांना लाभले.

मराठी साहित्य क्षेत्रातले कोत्तापल्ले यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ग्रामीण भागातून आलेल्या आमच्यासारख्यांनी काही लिहिले तर त्याचा त्यांना मोठा अभिमान वाटे. केवळ एक लेखक नाही तर ग्रामीण कथालेखक, कादंबरीकार, कवी, समीक्षक अशीही त्यांची ओळख आहे. विशेषत: घरापासून शिक्षणासाठी दूर एकटे राहणार्‍या विद्यार्थ्यांविषयी त्यांना विशेष कळवळा होता. कोत्तापल्ले 1969 ते 1971 दरम्यान पदव्युत्तर शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांनी मराठवाडा साहित्य परिषदेत नोकरीही केली होती. नोकरीतून मिळणार्‍या पैशांवर ते स्वत:चा शैक्षणिक आणि वैयक्तिक खर्च चालवत असत. नोकरी करून शिक्षण घेतल्यामुळे त्यांना गावातून, घरापासून लांब राहून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या अडचणी चांगल्याच माहिती होत्या. या विद्यार्थ्यांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे पैशांची. नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी, अशा विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी आणि घरापासून लांब राहणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करून घेतली. ही वाढ विद्यार्थ्यांसाठी फार गरजेची होती. अनेक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यामुळेच कोत्तापल्ले यांना त्यांचे विद्यार्थी लेखक किंवा विचारवंत म्हणून नाही तर ‘कोत्तापल्ले सर’ म्हणूनच जास्त चांगल्या प्रकारे ओळखतात.

86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सरांनी भूषवले. त्यांच्या विद्रोही स्वभावाविषयी बोलायचे झाले तर आणीबाणीच्या काळात राज्य शासनाने जाहीर केलेला पुरस्कार त्यांनी नाकारला होता. सुप्रसिद्ध कवी, लेखक, व्यंगचित्रकार आणि संवाद लेखक शरद जोशी यांनी जागतिकीकरणाचे समर्थन केले, त्यावेळी कोत्तापल्ले यांनी त्यांचा जोरदार विरोध केला होता. कोत्तापल्ले यांनी नॅक, राज्य मराठी विकास संस्था, साहित्य अकादमी, राज्य ग्रंथ पुरस्कार समिती, बाल पुरस्कार समिती आणि एसएससी बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदावर काम केले होते. मराठी विषयाची केवळ आवडच नाही तर मराठीशी समरस होऊन गेल्याची अनेक उदाहरणे त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यातून दिसतात. मराठी माणूस आणि त्याभोवती फिरणारे रोजचे कटकटीचे जीवन यापलीकडे जाऊन लेखन करणारा हा लेखक. 1972 च्या दुष्काळानंतर समाजमनावर झालेला आर्थिक आघात चितारताना ग्रामीण भागासह शहरातले गरीब, शेतकरी, पीडितांना सहन कराव्या लागणार्‍या यातना साहित्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करणार्‍या मोजक्या साहित्यिकांमध्ये त्यांचा समावेश होतो. साहित्याला वास्तव जीवनाची झालर लागलीच पाहिजे, अशी त्यांची भावना होती आणि ती त्यांच्या लेखनातून आली. संघटनेत काम करणार्‍या एखाद्या कार्यकर्त्याचे घर कार्यकर्त्यांनी नेहमी गजबजलेले असते. सरांचे घर त्याला अपवाद नव्हते. केवळ व्यक्ती म्हणून नाही तर त्यांच्यामध्ये असणारी आपुलकी आणि मायेचा झरा हा किती नितळपणे वाहतो, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या निधनाने एका चांगल्या साक्षेपी समीक्षकाला आपण पोरके झालो आहोत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com