Friday, April 26, 2024
Homeब्लॉगपाकिस्तानातील ‘खांदेपालट’ आणि भारत

पाकिस्तानातील ‘खांदेपालट’ आणि भारत

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी नियुक्त करण्यात आलेले आसीम मुनीर हे ‘जनरल’ म्हणून ओळखले जातात. फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे नियोजनकार मुनीर असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यानंतर ते काहीकाळ भूमिगतही झाले होते. जाहीरपणाने कट्टर विचारधारांची बाजू उचलून धरण्याबाबत ते पाकिस्तानात सर्वत्र ओळखले जातात. अशा व्यक्तीची पाकिस्तानी लष्कराच्या सर्वोच्चपदी निवड होणे ही बाब निश्चितच भारतासाठी चिंता वाढवणारी आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक

पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी नवे लष्करप्रमुख म्हणून सय्यद आसीम मुनीर यांच्या नावाला स्वीकृती दर्शवून अनेक प्रकारच्या शंका आणि प्रश्नांना पूर्णविराम दिला. लष्करप्रमुख बदलाची प्रक्रिया अनेक देशांमध्ये पार पडत असते. पण पाकिस्तानातील लष्करप्रमुख बदलाकडे जगाचे विशेषतः दक्षिण आशियातील देशांचे लक्ष लागून राहिलेले असते. याचे कारण पाकिस्तानात लष्करप्रमुख हे पद राजकारणातील सर्वोच्च पदापेक्षाही ताकदवान असते. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतरच्या गेल्या 75 वर्षांमध्ये तीनवेळा लष्कराने तेथील राजकीय सत्ता उलथवून लष्करशाही लादली होती. पाकिस्तानात लोकशाही राज्यव्यवस्था असली तरी सर्व राजकीय नेते लष्कराच्या इशार्‍यावरच काम करतात. विशेषतः परराष्ट्र संबंधांबाबत तेथे पंतप्रधानपदी बसणार्‍या व्यक्तीलाही लष्कराचा, लष्करप्रमुखांचा, आयएसआयचा आदेश डावलता येत नाही. पाकिस्तानातील धार्मिक मूलतत्त्ववादी संघटना, कट्टर दहशतवादी संघटना याबाबतचे धोरण ठरवण्यामध्ये लष्कराचा शब्द अंतिम असतो.

- Advertisement -

नवीन लष्करप्रमुख निवडीसाठी पाकिस्तानात विद्यमान लष्करप्रमुख पाच सेवाज्येष्ठ लष्करी अधिकार्‍यांची माहिती पंतप्रधानांकडे पाठवतात. पंतप्रधान त्यातील एक नाव निवडून ते राष्ट्रपतींकडे पाठवतात आणि त्यांच्या संमतीनंतर नवीन लष्करप्रमुखाच्या निवडीवर शिक्कामोर्तब होते. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी या प्रक्रियेनुसार पाच नावे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे पाठवली होती. पण त्यामध्ये आसीम मुनीर यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांना पुन्हा नवी यादी पाठवण्यास सांगण्यात आले आणि त्यामध्ये मुनीर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. यावरून शरीफ यांच्या आग्रहामुळेच मुनीर लष्करप्रमुख बनले आहेत, हे स्पष्ट होते. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू आहेत. नवाझ शरीफ हे सध्या लंडनमध्ये आश्रयाला असून तेथून ते सर्व सत्तासूत्रे हलवत आहेत. मुनीर हे नवाझ शरीफांच्या जवळचे मानले जातात.

जनरल आसीफ मुनीर हे ऑक्टोबर 2018 मध्ये पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयचे प्रमुख बनल्यानंतर सर्वप्रथम चर्चेत आले. आयएसआयचे प्रमुख असताना मुनीर यांनी तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या बेहिशेबी मालमत्तेविषयी चौकशी केली होती. त्यामुळे आठ महिन्यांतच त्यांना या प्रमुखपदावरून हटवण्यात आले होते. त्यामुळे मुनीर हे पाकिस्तानात सर्वात कमी काळ आयएसआय प्रमुखपदी राहिलेले अधिकारी ठरले. इम्रान खान यांच्याबरोबरचे त्यांचे वितुष्ट लक्षात घेऊन शरीफ यांनी त्यांना लष्करप्रमुख बनवले असण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानात लष्करप्रमुखाची निवड झाली तरी त्याचा कार्यकाळ किती असेल किंवा ती व्यक्ती या पदावर कधीपर्यंत राहील ही बाब अनिश्चित असते. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, जनरल बाजवांची निवड तीन वर्षांसाठी झाली होती. पण त्यांना तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली. सध्या बाजवा यांचे वय 62 आहे. विशेष म्हणजे बाजवा तिसर्‍यांदा मुदतवाढ घेण्याच्या प्रयत्नात होते. पण त्यांच्या संपत्तीचे प्रकरण समोर आल्यामुळे ते शक्य झाले नाही. तथापि जनरल बाजवा यांनी लष्करप्रमुख पदावरून निवृत्त होताना केलेले भाषण अत्यंत महत्त्वाचे आहे. आठ मिनिटांच्या भाषणात त्यांनी काही महत्त्वाची विधाने केली आहेत. वास्तविक, बाजवा हे आपल्या समारोपाच्या भाषणात भारताला, इस्राईलला इशारा देतील, अशी अटकळ होती, पण त्यांनी या भाषणातून एकप्रकारे पाकिस्तानातील राजकीय नेतृत्वालाच इशारा दिला. पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाने आपणच सुप्रीमो आहोत असे समजू नये, लष्करच सर्वोच्च आहे, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी या भाषणातून दिला आहे. तसेच त्यांनी एक खदखदही व्यक्त केली. भारतामध्ये भारतीय जनता तेथील लष्कराला कमालीचा आदर देते. पण पाकिस्तानात मात्र तसे घडत नाही. पाकिस्तानातील जनता आणि राजकीय नेतृत्व यांच्या लष्कराविषयी अनेक गैरसमजुती आहेत. ते लष्कराचा सन्मान करत नाहीत. ही खदखद व्यक्त करण्यामागे त्यांच्या खासगी संपत्तीविषयीच्या चर्चांमुळे केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर त्यांनी नव्या लष्करप्रमुखांना एक सल्लाही दिला असून पाकिस्तानी लष्कराने राजकारणात फारसा हस्तक्षेप करू नये, कारण त्यामुळेच लष्कराने आपला सन्मान गमावला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात, येत्या काळात नवे लष्करप्रमुख हा सल्ला कितपत मानतात, हे पाहावे लागेल. मुनीर यांच्या निवडीमध्ये नवाझ शरीफ यांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका पाहता तेथे राजकीय सत्ता आणि लष्करी सत्ता यांच्यामध्ये वर्चस्वासाठीची रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते.

लष्करप्रमुख बनलेल्या मुनीर यांची कारकीर्द आव्हानात्मक राहणार आहे. सर्वात मोठे आव्हान म्हणजे पाकिस्तानातील वाढता मूलतत्त्ववाद आणि दहशतवादी संघटनांकडून वाढत चाललेला हिंसाचार. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेने पाकिस्तान सरकारबरोबर केलेली युद्धबंदी सहा महिने चालली. पण ती संपुष्टात आणली असून त्यांनी पुन्हा एकदा संघर्ष सुरू करण्याची धमकी दिली आहे. या संघटनेला कसे नियंत्रणात आणायचे हे मोठे आव्हान मुनीर यांच्यापुढे असणार आहे. यापूर्वी अफगाणिस्तानातील तालिबान शासनाची मदत यासाठी घेतली होती. पण आता तशी परिस्थिती दिसत नाहीये. वास्तविक, या संघटनेचे प्रस्थ वाढण्यास पाकिस्तानी लष्करच जबाबदार आहे. कारण पाकिस्तान नेहमीच गुड टेररीस्ट आणि बॅड टेररीस्ट असा भेद करत आले आहे. गुड टेररीस्टच्या नावाखाली पाकिस्तानने या संघटनेला मोठे केले. पण पाकिस्तानच्या लष्कराला आता या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. तहरीक-ए-तालिबानचा संघर्ष वाढला तर पाकिस्तान फुटू शकतो, हे लक्षात घ्यावे लागेल.

भारताचा विचार करता मुनीर यांची निवड आपल्यासाठी चिंता वाढवणारी आहे. कारण ते भारतद्वेष्टे म्हणून ओळखले जातात. अर्थात, पाकिस्तानातील प्रत्येकाच्याच मनात भारताविषयीचा विद्वेष पेरणारी व्यवस्था तेथे कार्यरत आहे. भारताने प्रत्यक्ष युद्धात तीनवेळा पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या मनात भारताविरोधी द्वेष असणे स्वाभाविक आहे. परंतु मुनीर यांच्याबाबतच्या काही मूलभूत गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. भारताविरुद्धच्या अनेक दहशतवादी कारवायांची रणनीती आखण्यामध्ये मुनीर यांची मोठी भूमिका राहिली आहे. विशेषतः 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे रणनीतीकार मुनीरच होते. या दहशतवादी कारवाईची सर्व सूत्रे पडद्यामागून त्यांनीच हलवली होती. पाकिस्तानचे संरक्षण धोरण आणि प्रतिक्रिया ठरवणार्‍या पॅनेलमध्ये मुनीर हे त्यावेळी सर्वात महत्त्वाची व्यक्ती होते.

जनरल मुनीर हे आयएसआयचे प्रमुख बनण्यापूर्वी नॉर्दन भागात कमांडर आणि मिलिटरी इंटेलिजन्सचे डायरेक्टर जनरल राहिलेले आहेत. जम्मू-काश्मीरमधील कानाकोपर्‍याची त्यांना माहिती आहे. बाजवांकडून त्यांना आयएसआय प्रमुखपदी बसवण्यात आले तेव्हाच हा एक मोठा कट असल्याचे मत अनेक संरक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले होते. पाकिस्तानी सरकार आणि बाजवा यांच्यापुढे आयएसआयचा सर्वोत्तम प्रमुख म्हणून सिद्ध करण्याची मुनीर यांची महत्त्वाकांक्षा होती. यासाठी त्यांनी पुलवामाचा दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्याला मूर्त रूप देण्यासाठी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची त्यांनी मदत घेतली होती. या हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे फायटर जेट पाडले होते. त्यानंतर ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते तेव्हा पाकिस्तानी लष्कराने त्यांना पकडून बंदिस्त केले होते. या घटनेनंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी लेफ्टनंट जनरल मुनीर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून भारत आपल्या दहशतवादविरोधी अभियानापासून तसूभरही मागे हटणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. त्यावेळी भारताने एक क्षेपणास्र डागल्यास पाकिस्तान तीन क्षेपणास्रे फायर करून त्याचे प्रत्युत्तर देईल, अशी दर्पोक्ती मुनीर यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर मुनीर यांच्या वक्तव्यांकडे, रणनीतीकडे, धोरणांकडे भारताने बारकाईने लक्ष ठेवून राहणे आवश्यक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय लष्कराने दहशतवादविरोधी मोहीम सक्षमपणाने राबवून काश्मीरमधील दहशतवादी हिंसाचाराला आळा घालण्यात लक्षणीय यश मिळवले आहे. सीमेवरून होणारी घुसखोरीही नियंत्रणात आणली आहे. काश्मीरमध्ये सध्या शांततेचे वारे वाहू लागले आहेत. अलीकडेच तेथे सिनेमागृहे सुरू करण्यात आली आहेत. लवकरच तेथे विधानसभा निवडणुका होणार आहेत. या सर्व वातावरणाला गालबोट लावण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय कसोशीने प्रयत्नशील आहे. मुनीर यांच्या काळात याबाबत जोरकसपणाने प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यामुळे भारताने अत्यंत दक्ष राहणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या