Thursday, April 25, 2024
Homeब्लॉगBlog : 'सावाना'चे पावित्र्य जपायला हवे...

Blog : ‘सावाना’चे पावित्र्य जपायला हवे…

नाशिकच्या (Nashik) हजारो व्यक्तिमत्त्वांची जडणघडण करणाऱ्या आणि १८१ वर्षाची वैभवशाली परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाची (Savana) वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच गेल्या रविवारी, १३ मार्चला पार पडली. या सभेला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले….

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसारखे (Kusumagraj) अनेक ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्ष राहिलेल्या ‘सावाना’ने (Savana) नाशिकचे सांस्कृतिक संवर्धन करण्याबरोबरच गेली अनेक वर्षे वाचनसंस्कृती जपली आहे. संदर्भग्रंथ आणि प्राचीन हस्तलिखिते यामुळे वाचनालयाचे महत्त्व देशाबरोबरच विदेशातही पोहोचले आहे. मात्र या संस्थेलाही दृष्ट लागली की काय असे चित्र अलीकडे दिसत आहे.

- Advertisement -

गेल्या रविवारच्या सर्वसाधारण सभेत (General Meeting) माझ्यासारखे अनेक वाचक, रसिक वाचन संस्कृती व सांस्कृतिक चळवळीबद्दल काही चांगलं कानावर पडेल म्हणून प. सा. नाट्यगृहात उपस्थित होते. मात्र यावेळीही ‘सावळागोंधळ’, ‘बेबंदशाही’, ‘संशयाचे भूत’, ‘अविश्वास’, ‘तो मी नव्हेच’, ‘भाऊबंदकी’, ‘ध चा मा’, ‘कुरघोडी’, ‘वाऱ्यावरची वरात’ अशी कितीतरी नाटके एकाचवेळी मोफत पाहायला मिळाली. हे कमी होते म्हणून की काय, ‘अजून पाहिजे जाती-जातीचे’ अशाही नाटकाची रंगीत तालीम सुरू असल्याचे ऐकायला आले.

येथील चर्चेत कुठेही ‘पुस्तक’, ‘वाचन’, ‘ग्रंथालय चळवळ’, ‘ग्रंथप्रेमी’ असे शब्द नावालाही कानी पडत नव्हते. याउलट ‘टेंडर’, ‘निविदा’, ‘डागडुजी’ अशा शब्दांबरोबर कोर्ट केसेस, न्यायालयीन प्रकरणे, माहितीचा अधिकार हे शब्द व्यापले होते. १८१ वर्षांची परंपरा असलेलं ‘सावाना’ पुढील २० वर्षांत २०० व्या वर्षात जाणार आहे.

तेथे जाताना या मातृसंस्थेला वाचक, बालवाचक आणि पुढील पिढी डोळ्यासमोर ठेवून पुढील २० ते २५ वर्षांचा कृती आराखडा तयार करून वाचनसंस्कृती आणि सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. पुढच्या दशकात पदार्पण करताना आजपर्यंत जे झालं ते सारं विसरून सर्व संबंधितांनी एकत्रित येऊन ही प्रकरणे मिटवलीच पाहिजेत. कविश्रेष्ठ केशवसुत यांनी ‘तुतारी’ या कवितेत म्हटल्याप्रमाणे…

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एका ठायी ठाका

सावध ऐका पुढल्या हाका !

नाशिकचे वैभव असलेल्या एका सांस्कृतिक चळवळीचे जतन, संवर्धन आणि विकास करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. ते करताना ‘सावाना’चं ‘पावित्र्य’ जपावंच लागेल, नाहीतर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आपण सर्वजण सुज्ञ आहोत. सुज्ञास अधिक ते काय सांगणे!

– शिवाजी मानकर,

निवृत्त संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या