Blog # बदलत्या काळातील पत्रकारांची भूमिका...

Blog # बदलत्या काळातील पत्रकारांची भूमिका...

बदलत्या काळानुसार वृत्तपत्राचे किंबहुना पत्रकारितेचे स्वरूप बदलत गेले आणि आता तर त्यात फारच बदल झाला आहे. इंटरनेटच्या दुनियेत सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे आणि यात पत्रकार किंवा बातमीदार कुठेतरी हरवला असल्याचे दिसत आहे. प्रिंट मीडिया या माध्यमावर अजुनही लोकांचा वाचकांचा पूर्ण विश्वास आहे.

6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून राज्यात साजरा होतो याच दिवशी 1832 ला आद्यसंपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले वृत्तपत्र दर्पण सुरू केले व मराठी वृत्तपत्राचे ते जनक ठरले त्यानंतर अनेक मराठी वृत्तपत्र उदयास आले लोकमान्य टिळकांनीही मराठा व केसरी हे वृत्तपत्र सुरू केले. या माध्यमाने त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली व त्यांच्या संपादित लेखातून प्रेरित होऊन अनेक क्रांतिवीर झाले व त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला असे हे वृत्तपत्र म्हणजे समाजमन घडवणारे एक माध्यम आहे.

बदलत्या काळानुसार वृत्तपत्राचे किंबहुना पत्रकारितेचे स्वरूप बदलत गेले आणि आता तर त्यात फारच बदल झाला आहे. इंटरनेटच्या दुनियेत सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जाळे सर्वत्र पसरलेले आहे आणि यात पत्रकार किंवा बातमीदार कुठेतरी हरवला असल्याचे दिसत आहे. प्रिंट मीडिया या माध्यमावर अजुनही लोकांचा वाचकांचा पूर्ण विश्वास आहे. जगात घडणार्‍या सर्व घडामोडी राजकीय, क्रीडा, सामाजिक यासारख्या कोणत्याही घटना संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी वृत्तपत्र हे माध्यम अजूनही या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जगात लोकप्रिय आहे. म्हणून सकाळी सकाळी एका हातात चहाचा कप व दुसर्‍या हातात वृत्तपत्र घेऊन वाचणार्‍यांची संख्या अजूनही कमी नाही झालेली.

अ‍ॅड. जास्वंदी भंडारी
अ‍ॅड. जास्वंदी भंडारी

पण कुणास ठाऊक पूर्वीच्या वृत्तपत्रात आणि आताच्या वृत्तपत्रात फरक जाणवतो. हा फरक वृत्तपत्रांचा नसून पत्रकारितेचा आहे. हे प्रकर्षाने लक्षात येते. हळूहळू पत्रकारांवरील विश्वास लोकांचा कमी होत आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, याची कारण मीमांसा केली तर, कुठेतरी बायस पत्रकारिता वाढते आहे का? एखाद्ये वृत्तपत्र हे एकांगी विचार मांडते किंवा पक्षपातीपणा करते असे आता बघावयास मिळते त्यात पत्रकारांची विविध राजकीय पक्ष, नेते, पुढारी यांचे प्रती वाढलेली निष्ठा त्यामुळेच कदाचित खर्‍या घटना, बातम्या या समाजासमोर मांडला जात नाही का? असे विचार नक्कीच वाचकांच्या मनात येतात म्हणूनच काळ परत्वे पत्रकारांची किंवा बातमीदारांची भूमिका ही बदललेली दिसते जे वृत्तपत्र समाजाचा आरसा आहे लोकांमध्ये जागरूकता आणण्याचे बळ ज्या लेखणीत आहे. ही लेखणी विकली तर गेली नाही ना? अशी शंका साहजिकच मनात येऊन जाते, पत्रकारांनी स्वतःची भूमिका लक्षात घेतली पाहिजे. कोणत्याही पक्षाच्या अधिकार्‍यांच्या किंवा नेत्यांच्या दावणीला बांधलेले राहण्यापेक्षा व पत्रकारितेकडे व्यवसाय म्हणून बघण्यापेक्षा निरपेक्ष पत्रकारिता करण्याकडे कल असला पाहिजे तरच समाज पत्रकारांकडे सन्मानाने बघेल निर्भीड व निरपेक्ष व शोध पत्रकारिता कुठेतरी कमी होताना दिसत आहे.

वृत्तपत्र उघडतास पानभर जाहिराती त्यानंतर कुठेतरी अनेक विविध कार्यक्रमांच्या बातम्या, नकारात्मक बातम्या यावरच पेपरच्या पानांचा शेवट होतो. संपादकीय लेख हा पेपरच्या आत्मा असतो पण त्यातला जिवंतपणाही सद्यस्थिती नाहिसा झाला आहे.नागरिकांच्या समस्या, समाजातील दुर्बल घटकांच्या अडचणी, होणारे अत्याचार विविध संस्था संघटना व्यक्ती यांनी केलेले घोटाळे शोधून ते वृत्तपत्र छापणारे फार कमी वृत्तपत्र सध्या दिसत आहे. हे केव्हा शक्य होईल जेव्हा पत्रकार अथवा बातमीदार शोध पत्रकारिता करेल आणि जनतेसमोर सत्य आणेल याचा परिणाम ओघानेच वृत्तपत्राचा वितरणावर होईल. पत्रकार प्रिंट मीडियाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकारितेकडे व्यवसायाच्या दृष्टीने न बघता समाजातील अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे आपण प्रतिनिधी आहोत असा विचार करून अंतर्मुख होण्याची गरज आज या पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com