दि न्यू नॉर्मल...
ब्लॉग

दि न्यू नॉर्मल...

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

पृथ्वीच्या निर्मितीला लाखो-करोडो वर्षे झाली. त्या कालावधीत असंख्य जीव-जंतू, प्राणी, पक्षी यांचे वास्तव्य भूतलावर झाले. त्यापैकीच एक आपण म्हणजे मानव प्रजाती! या लाखो वर्षांच्या कालावधीत असंख्य जीव जसे जन्माला आले, तसे नष्टही झाले. परंतु मानव जातही तिच्या उत्पत्तीपासून आजही वास्तव्यास आहे.

याच्या अनेक कारणापैकी एक म्हणजे बदलत्या परिस्थितीत वातावरणानुसार स्वतःला बदलून टाकण्याची मानवाची क्षमता! असे म्हणतात की, अवाढव्य डायनासोर काळाच्या प्रवाहात नष्ट झाले. कारण त्यांनी बदलत्या वातावरणासोबत स्वतःला बदलून घेतले नाही. याउलट मानवजातीचे अस्तित्व आजही टिकून आहे.

काळ बदलत गेला तसा मानवाने आपल्या जगण्या-वावरण्याच्या शैलीत अनेक आवश्यक बदल घडवले. हे सगळे बदल मानवाचे जगणे अधिक सुसह्य करण्याच्या दृष्टीने आवश्यक होते.

आपण आधी अश्मयुगात जगणारे होतो. मग हळूहळू एकसंघ होऊन राहायला शिकलो. नंतर स्त्रियांनी शेतीचा शोध लावला आणि भटकंती करणारी मानवजात स्थायिक झाली. हळूहळू चाकाचा शोध लागला आणि मानवी जीवनाला गती मिळाली. काळाचे चाक तेथून फिरायला सुरवात झाली ती आजतागायत सुरुच आहे.

निसर्गातून जन्माला येण्यापासूनचा हा प्रवास निसर्गाची दुर्गती होईपर्यंत अविरत सुरु आहे. आपले जीवनमान आणि जीवनशैली उंचावली खरी; पण ज्यामुळे आपण तरलो त्या निसर्गाचीच वाताहत कुठेतरी घडायला लागली. इतिहासात डोकावण्याचा उद्देश हा की, गेल्या काही महिन्यांपासून अनेक गोष्टी आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत आहेत. ‘करोना’ नामक विषाणूने आपली जीवनशैली पुरती बदलवली. चोवीस तास धावणार्‍या चाकांना विश्रांती मिळाली. विकासाच्या व्याख्या विस्तृत करणारी अनेक शहरे ठप्प झाली.

याची सुरूवात चीनच्या वूहान प्रांतातून झाली. एका प्राणघातक विषाणूने ‘लॉकडाऊन’ची नामुष्की जगावर ओढवली. एका अभूतपूर्व अशा घटनेचे साक्षीदार आपण सगळे आणि यंदाचे 2020 साल झाले. जगातील अनेक महासत्ता, विकसित आणि विकसनशील देशांना आपले व्यवहार ठप्प करून आपल्या नागरिकांना घरात डांबून ठेवण्याची वेळ आली. जगाच्या पाठीवर ‘लॉकडाऊन’ म्हणजे ‘घरात राहा, सुरक्षित राहा’ ही व्याख्या होत असताना नेहमीप्रमाणे आपण देश म्हणून काहीतरी वेगळाच इतिहास रचू पाहत होतो.

जिथे जग ‘लॉकडाऊन’ म्हटल्यावर आपापल्या चार भिंतीत बंदिस्त झाले, तिथे भारतातील सामान्य माणूस रस्त्यावर उतरायला नव्हे तर चालायला विवश झाला तोही आपल्या बायका पोरांसकट! या रस्त्यावरच्या जनतेने जगाला अभिप्रेत असलेली ‘लॉकडाऊन’ची व्याख्या पूर्णतः बदलली. जगण्यासाठी घरात बसण्याच्या दिवसांत जिवंत राहण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या भारतीयांना देशासकट संपूर्ण जगाने पाहिले. सामाजिक संस्थेत संस्थेत काम करीत असल्याने भारताचा हा चेहरा जवळून अनुभवण्याची संधी मला मिळाली.

‘लॉकडाऊन’ काळात नाशिक येथील अनेक सेवाभावी संस्थांनी दिवसरात्र एक करून मदतकार्य केले. या महामारीत देशाच्या आणि येथील जनतेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. एकट्या महाराष्ट्रातून गेल्या 3 महिन्यांत जवळपास पंधरा लाख मजूर आणि कुटुंब विस्थापित झाले. हजारो किलोमीटर पायी चालण्याची वेळ त्यांच्यावर का आली? याचा विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात आली. ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यापूर्वी केंद्र आणि राज्याने सरकार म्हणून जे निर्णय अपेक्षित होते ते घेतले गेले नाहीत.

‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याच्या निर्णयात विलंब तर झालाच, पण हा निर्णय जाहीर झाला तेव्हा कुठलीही पूर्वतयारी न करता तो घेतला गेला. त्याचे जे पडसाद उमटायचे ते उमटले. लाखो लोक पायी आपल्या गावी निघाले. सोबतीला लहान मुले-महिला व वृध्दही होते. काहींनी मुलांना डोक्यावर बसवून प्रवास केला. काहीनी सूटकेसवर झोपवले तर काही दुचाकीवरच गाव गाठायला निघाले. काही निष्पाप जीव रेल्वेखाली चिरडले गेले. ज्यांनी आपल्या गावी जाण्यासाठी हजारो किलोमीटर पायपीट केली, पण त्यांना साधी सायकलही मिळाली नाही. सगळ्या प्रवासी मजुरांना शासनाकडून रस्त्याने ना पाणी मिळत होते ना जेवण!

अनेकांनी इच्छित स्थळ गाठले आणि तिथेच जीव सोडला. इथल्या निर्दयी व्यवस्थेची लक्तरे तोडणारे एक नव्हे तर अनेक उदाहरणे आता डोळ्यांसमोर येत आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि शासनाकडून दिल्या गेलेल्या नियमावलीनुसार सुरक्षित राहण्याच्या महत्वाच्या तिन्ही गोष्टींची पायमल्ली या संपूर्ण प्रवासात झाली.

शारीरिक अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे, वेळोवेळी हात आणि शरीराची स्वच्छता! जिथे जगण्याचे प्रश्न मोठे होते तिथे शारीरिक अंतर राखण्यासारख्या संकल्पना या मजुरांना कोणत्या तोंडाने समजावून सांगणार? जिथे खायला अन्न आणि प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीत इतर स्वच्छता करायला पाणी कुठून आणायचे? असे एक ना अनेक प्रश्न प्रवासी मजुरांसोबत होते.

या सगळ्या परिस्थितीत आशेचा किरण म्हणून सामाजिक संस्थांचे योगदान मोठे आहे. प्रवासी मजुरांचा प्रवास जरा सुसह्य व्हावा म्हणून संस्थांनी मजुरांना जेवण, पाणी, कोरडा शिधा पुरवला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या उपोषणाची दखल घेऊन राज्य सरकारने मजुरांसाठी काही बसेसची व्यवस्था केली. त्या बसेस यांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सोडवून परत येत होत्या.

तसेच अनेक श्रमिक रेल्वेगाड्याही अलीकडे सुरु करण्यात आल्या. परंतु ही सेवा पुरवायला थोडा उशीर च झाला. शासनाकडून एप्रिल महिन्यात रेशन पुरवणार असल्याची घोषणा झाली. परंतु प्रत्यक्ष मदत मिळेपर्यंत तसा उशीरच झाला होता. आता तीन महिन्यांच्या (मोफत?) रेशन वाटपाचा अवधी संपायला फार कमी काळ उरला आहे. अशातच धान्यवाटपासंबंधी पुढील नियोजन काय असणार? यावर कोणी अवाक्षर काढायला तयार नाही.

कारण ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरु झाली असली तरी काही जिल्हे अजूनही ‘रेड झोन’मध्येच आहे. जीमचालक, रिक्षाचालक यांचे प्रश्न अजून अनुत्तरीतच आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्यांना उत्पन्नाचे साधन नाही.

त्यांनी उदरनिर्वाह कसा करावा याविषयी बोलायला कोणी तयार नाही. लोक ‘करोना’सोबत जगायला शिकतीलसुद्धा, पण ‘करोना’सोबत मरायलाही शिकण्याची वेळ येऊ नये. बाकी मानवी स्वभावानुसार काळ आणि परिस्थिती बदलेल तशा जगण्याच्या सवयी आपण बदलतच आहोत. ‘दि न्यू नॉर्मल’च्या लेबलखाली आपला जगण्यासाठीचा संघर्ष सुरूच राहणार यात शंका नाही.

- श्रद्धा सोपान कापडणे

Deshdoot
www.deshdoot.com