डोंगराला आग लागली, पळा-पळा...!

- किरण वैरागकर
डोंगराला आग लागली, पळा-पळा...!

नाशिक | Nashik

सहा देश आणि वीस बावीस ठिकाणे भटकून झाली होती. आतापर्यंत काटेकोर आणि वेळेप्रमाणे शिस्तबद्ध वाहतूक यामुळे सर्वत्र सुकर प्रवास आणि भटकंती सुरु होती. बहुतांश प्रवास ट्रेन आणि बसने. माझे आणि जर्मनीच्या ट्रेनचे पटत नाही. कायम उशीर किंवा घोळ, पण या वेळेस मात्र आलबेल! ऑक्टोबर/नोव्हेंबर महिना असल्यामुळे युरोपमध्ये थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली होती. अगदी शेवटी म्हणजे काल मात्र साल्झबुर्ग, ऑस्ट्रियात थंडी, विन्डी आणि पाऊस यामुळे जरा हिरमोड झाला होता. आम्ही पावसात पण फिरलोच तो भाग निराळा! उद्या परतीचा दिवस आणि मग मात्र भारतात प्रयाणाचे वेध लागले होते. गुगल महाराज उद्याचा अनुमान पण तसेच पावसाळी हवामान देत होता. शांतपणे बॅगा घेऊन परतायचे, असा सरळ विचार!

सकाळी उठलो तर कोवळे ऊन, निरभ्र आकाश अगदी आल्हाददायी वातावरण. इथले पण हवामान खाते गंडते कधी-कधी! मग मात्र आम्ही लगेच आधीच काढलेल्या चोवीस तासांच्या दिवसभराच्या तिकिटाचा उपभोग घ्यायचा ठरवले आणि परत सिटी टूर काढली. या ट्रिपमध्ये सर्वच स्विस पास, सिटी पास सर्वांचा अगदी पुरेपूर उपभोग घेतला. स्टेशनवर गाडीच्या वेळेआधी येऊन पोहचलो. साल्झबुर्ग ते फ्रेड्रीकशाफन हा पाच तासांचा ऑस्ट्रिया ते जर्मनी असा प्रवास होता. थेट गाडी असल्यामुळे चिंता नव्हती गाड्या बदलण्याची! गाडी १० मिनिट उशिरा अशी वेळ दाखवत होती.

खायचे प्यायचे सामान घेऊन कॉफी पीत बसलो होतो. तेवढ्यात चिरंजीव म्हणाले, चला उठा, आपली गाडी बहुतेक कॅन्सल झाली आहे. चौकशी केंद्रावर गेलो तर कळले की आमचे गाव फ्रेड्रीकशाफन आणि त्याधीचे गाव लिंडाऊमध्ये ट्रॅकवर झाड पडल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या होत्या. आम्हाला तिथून पर्यायी सोय होईल, असे अमेय म्हणाला. तसेही आम्ही अमेय असल्यामुळे त्याच्यावर सर्व सोपवून निर्धास्त होतो. आम्ही गाडीत बसलो. काही वेळ जात नाही तर अजून एक डिस्प्ले झळकला की गाडी ब्ल्यूडेंझला टर्मिनेट होतेय. कारण कळायला मार्ग नव्हता. आम्हाला तर जर्मन कळत नव्हते, पण एकंदरीत बहुतेक सर्व त्याच मन:स्थितीत होते. रविवार असल्यामुळे बरीच मंडळी आमच्यापेक्षा दूर जाणारी होती. डब्यात एक संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले, पण कुठलाही गडबड गोंधळ, आवाज मात्र नाही.

सगळे लहानथोर, कच्चे-बच्चे सर्वच पुढच्या प्रवासाच्या विवंचनेत. आपल्या गावाप्रमाणे काही ग्रुप पण झाले. माणूस समाजशील प्राणी असला तरी कुठल्या तरी मुद्यावर एक कळप करतोच, हा परत एकदा अनुभव आला. तूर्तास ब्रेगेन्झ ते लिंडाऊ आणि मग पुढे फ्रेड्रीकशाफान असे सरळ सरळ वाटले, पण तसे काही नव्हते इथे पण. अचानक ट्रेन थांबली ब्ल्यूडेंझला. आम्हाला बाहेर उतरलेल्या माणसाने खाली उतरा, असा इशारा केला. आम्हाला वाटले आता डायरेक्ट लिंडाऊ, पण तसे नव्हते. पुढे गेल्यावर कळले की लिंडाऊ ते फ्रेड्रीकशाफन दरम्यान ट्रॅक जवळच्या फॅक्टरीत आग लागल्याने आजूबाजूचे सर्व व्यवहार, वाहतूक थांबवली होती. त्यामुळे परत दोन बस आणि ट्रेन प्रवास करायचे होते. इतर साधारणपणे सर्वच गावांमध्ये ट्रेन आणि बस स्टॅन्ड अगदी जवळ असतात.

बस दिसल्यावर हुई करीत सर्व पळत सुटले. शहर वाहतुकीची बस होती. आम्ही ब्लूडेंझ उतरलो आणि ट्रेनमधील सर्वच प्रवासी बाहेर पळत सुटले; जसे काही आपला लहानपणीच खेळ, 'डोंगराला आग लागली, पळा पळा'...! खचाखच भरलेली बस प्रथमच अनुभवली इथे. मी आणि अर्चना मागच्या दाराने तर अमेय मधल्या असे करीत बसमध्ये शिरते झालो. ज्याला जिथे जागा मिळेल तसे बसला, उभा होता. तिथून गोटझीस (Gotzis) गावात आलो. तिथून मग ब्रेगेन्झला आणि पुढे लिंडाऊला परत ट्रेनने या दरम्यान पुढचा मार्ग अथवा व्यवस्था अशी काही स्पष्ट नव्हती. काहीच नाही तर टॅक्सी करून जाऊ असे वाटले, पण टॅक्सी होत्या कुठे गावात, स्टेशनवर सांगायला कोणी पण नव्हते. पर्यायी बस व्यवस्था, बस स्टॉप कोणालाही माहीत नव्हता.

एवढेच काय लिंडाऊ ते पुढे फ्रेड्रीकशाफन व त्याचे इतर गंतव्य स्थान यावर विविध मंडळी आपल्या परीने, ऍप, माहिती, चर्चा करून अंदाज घेत होती. बस स्टॉपचा घोळ कळत नव्हता. तेवढ्यात एक बस आली आणि ड्राइवर ओरडून म्हणाला, पर्यायी व्यवस्था. परत एकदा डोंगराला आग लागली, पळा पळा...! लिंडाऊ ते नॉनेनहॉर्न या गावापर्यंत. नॉनेनहॉर्न त्याहून अधिक लहान गाव! अगदी आपली येथील रुळांच्या बाजूला असलेले स्टेशन आणि प्लॅटफॉर्म तसे. गाडी, ट्रेन कुठे येणार कोणाला माहीत नाही, पण तशात एक स्थानिक तिथे आला आणि त्याने कल्पना दिली. ट्रेन एक नंबरवरच येईल. सर्व चिंतामुक्त झाले आणि एकदाची गाडी आली, जी फार पुढच्या स्टेशनची म्हणजे उल्म (Ulm) ची होती. त्यामुळे खूप मंडळींचा प्रश्न मिटणार होता. असो, आम्हाला तर आपल्या फ्रेडीकशाफन लगेच २५-३० मिनिटांत पोहचायचे होते आणि पोहचलो पण...

आणि अशा प्रकारे आमचे आमचा 'पळा पळा'चा फेरा, प्रवास शेवटी फ्रेडीकशाफनला सुखरूप येऊन संपला. माणसाची चिंता, अनामिक भीती, त्याची क्रिया, प्रतिक्रिया या सारख्याच असतात, पण त्याचा वेग, भावनिक-शारीरिक, बोलण्यातून व्यक्त होणारी प्रतिक्रिया वेगळी असते. इथे ती मात्र फार संयत वाटली. डोंगराला आग लागली पळा पळा...! त्यात पण होता संयतपणा! अशा तऱ्हेने आमच्या प्रदीर्घ दौऱ्याचा शेवट एका वेगळ्याच अनुभवाने पार पडला. आता वेध परत भारतात पुण्यनगरीत, आपल्या घरी जायचे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com