मुकाबला लम्पीचा

मुकाबला लम्पीचा

कोविड विषाणू संसर्गाचा सलग दोन वर्षे सामना केल्यानंतर सुटकेचा निःश्वास टाकतो ना टाकतो तोच गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात लम्पी स्कीन डिसीज (एलसीडी) या विषाणूजन्य आजाराने जनावरांमध्ये थैमान घातले आहे. देशातील जवळपास 15 हून अधिक राज्यांमधील 175 जिल्ह्यांमधील पशुधन या विषाणू संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. महाराष्ट्रात लसीकरण, विलगीकरण आणि अन्य प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत.

लम्पी स्कीन डिसीज अर्थात एलसीडी या विषाणूजन्य आजाराने सध्या देशभरात थैमान घातले असून पशुपालक आणि शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील जवळपास 15हून अधिक राज्यांमधील 175 जिल्ह्यांमधील पशुधन या विषाणू संसर्गामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे. विशेषतः राजस्थानसारख्या राज्यात गोपालन मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे गोपालक आणि शेतकरी चिंतेत आहेत. राजस्थानातील दुग्धोत्पादनात 30 टक्के घट झाल्याचे समोर आले आहे, तर पंजाब, गुजरातमध्येही जवळपास 10 टक्क्यांनी दुग्धोत्पादन घटले आहे. महाराष्ट्रातही जवळपास 17 जिल्ह्यांमध्ये लम्पीचा शिरकाव झाला असून अनेक जनावरांना याची लागण झाली आहे. वास्तविक, गेल्या वर्षीही हा आजार जनावरांमध्ये दिसून आला होता, पण तेव्हा त्याची लक्षणे अत्यंत सौम्य होती. सातारा जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांनी काटेकोर उपाययोजना आणि नियोजन करून या आजारावर नियंत्रण मिळवले होते. एका गावातून दुसर्‍या गावात हा आजार पसरणार नाही याची दक्षता घेतली होती.

लम्पी स्कीन डिसीज आजार देवी विषाणू गटातील कॅप्रिपॉक्स या विषाणूमुळे होतो. चावणार्‍या माशा, डास, गोचिड इत्यादींद्वारे हा आजार एका जनावरापासून दुसर्‍या जनावरास होतो. कीटकांमार्फत प्रसार होत असल्याने हा आजार उष्ण व दमट वातावरणात जास्त पसरतो. सुरुवातीस जनावरांना दोन ते तीन दिवस बारीक ताप जाणवतो. त्यानंतर तापाचे प्रमाण वाढून जवळपास 102 ते 104 डिग्रीपर्यंत जाते. संक्रमण झाल्यानंतर एक ते दोन आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो आणि त्यानंतर शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होते. त्यामुळे जनावरांचे विविध स्राव जसे डोळ्यातील पाणी, नाकातील स्राव, लाळ इत्यादींमधून हा विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन इतर जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे 18 ते 35 दिवस जिवंत राहू शकतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे. याखेरीज विर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे जनावरांच्या कृत्रिम रेतनातून किंवा नैसर्गिक संयोगाद्वारेही याचा संसर्ग होऊ शकतो.

लम्पी आजारात जनावरांच्या शरीराच्या सर्व भागावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेंद्रिये या भागात येतात. गाठींचा आकार एक सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा मोठाही असू शकतो. याच पातळीवर उपचार केले गेले नाहीत तर कालांतराने त्यात पाणी होऊन या गाठी फुटून त्यामध्ये जिवाणू संसर्ग होतो. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात. याखेरीज जनावरांमध्ये न्यूमोनिया आणि श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणेही आढळतात. डोळ्यांमधील व्रणांमुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा येऊ शकते. अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.

हा विषाणूजन्य आजार असल्यामुळे बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही याचा प्रतिकूल परिणाम होतो. सुदैवाने आज तरी लम्पीचा मोटॅलिटी रेट किंवा मरतुकीचा दर किंवा संसर्गामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण कमी आहे. जनावरांची व्यवस्थित काळजी घेतली गेल्यास काही आठवड्यात ती या आजाराचा सामना करून बरी होतात, असे दिसून आले आहे. यासाठी जनावरांना होणार्‍या जखमा लवकरात लवकर बर्‍या होणे गरजेचे असते. त्यासाठी अ‍ॅलोपॅथिक उपचारांबरोबर पर्यायी उपचारही केले गेले पाहिजेत. कारण यामुळे एका आजारातून दुसरा आजार होण्याची शक्यता कमी होते. तसेच बरे होण्यासाठीही आधार मिळतो.

संसर्गजन्य आजार असल्याने या विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना स्पर्शाद्वारेही होऊ शकतो. त्यामुळे करोना महामारीच्या काळात ज्याप्रमाणे कोविडग्रस्त रुग्णांचे विलगीकरण केले जायचे किंवा त्यांना वेगळे ठेवून शारीरिक अंतर राखण्यास सांगितले जात होते तशाच प्रकारे लम्पीचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे आवश्यक आहे. या आजाराचा संक्रमण कालावधी साधारणतः चार ते 14 दिवसांचा असतो.

सुदैवाने या आजाराचा मुकाबला आणि प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध आहे. प्रादुर्भावग्रस्त भागापासून पाच किलोमीटर त्रिज्येत येणार्‍या सर्व गावांमधील चार महिने वयावरील गाय व महिष वर्गातील जनावरांना पशुतज्ज्ञांकडून लस टोचणे आवश्यक आहे. आधीच रोगग्रस्त असणार्‍या जनावरांना लस दिली जाता कामा नये. आजाराची लक्षणे जनावरांमध्ये आढळल्यास पशुपालकांनी त्वरित जवळच्या शासकीय दवाखान्यात कळवून तज्ज्ञांकडून योग्य उपचार करून घ्यावेत.

याखेरीज प्रतिबंधात्मक खबरदारी घेणेही आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे निरोगी जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी बाधित जनावरे वेगळी बांधावीत. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे गोठा स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवावा. गोठ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. प्रसार बाह्य कीटकांद्वारे होत असल्यामुळे आजारी नसलेल्या जनावरांवर तसेच गोठ्यामध्ये डास, माशा, गोचिड आदींचे प्रमाण कमी करण्यासाठी यासाठीच्या औषधांची फवारणी केली पाहिजे. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळणे गरजेचे आहे. गोठ्यास भेट देणार्‍यांची संख्या मर्यादित असली पाहिजे. आणखी एक मुद्दा म्हणजे जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्रीय पद्धतीने कमीत कमी आठ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी. बाधित क्षेत्रात गाई-म्हशींची विक्री, पशू बाजार इत्यादी बंद करावेत. बाधित अथवा संशयित जनावरांचा उपचार करत असताना किंवा रोग नमुने गोळा करत असताना पीपीई किटचा वापर करावा. हात धुवून घ्यावेत. तपासणीनंतर सर्व साहित्य निर्जंतूक करावे. बाधित परिसरात स्वच्छता करावी. निर्जंतूक द्रावणाची फवारणी करून परिसर निर्जंतूक करावा. यासाठी एक टक्का फॉर्मलीन किंवा दोन ते तीन टक्के सोडियम हायपोक्लोराईड याचा वापर करावा.

सुदैवाने महाराष्ट्रात या रोगावर नियंत्रण मिळवण्यात चांगले यश येताना दिसत आहे. पशुवैद्यकांकडून तत्परतेने केले जाणारे लसीकरण आणि शेतकर्‍यांचा सक्रिय सहभाग यामुळे संक्रमणाचा प्रसार नियंत्रणात राहिला आहे. राज्यातील अनेक दूध संघांनीही लसी उपलब्ध करून देत सकारात्मक भूमिका पार पाडली आहे. पशुवैद्यक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, दूध संघ, शासन यांच्या प्रयत्नांमुळे, विविध दक्षता पथकांमुळे लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे.

मुळातच आपल्याकडील शेतकरी हा तुलनेने खूप सुजाण आहे. जनावरांचे पालनपोषण कसे करायचे याचे धडे त्याला परंपरागत मिळत आले आहेत आणि विविध संस्थांच्या माध्यमातूनही शेतकर्‍यांना वारंवार याबाबत प्रशिक्षणात्मक माहिती दिली जात असते. त्यामुळेच महाराष्ट्रात लम्पीची लागण झालेल्या जनावरांचा बरे होण्याचा दर अधिक असून मृत्यूचे प्रमाणही खूप कमी आहे. दुसरीकडे राज्य सरकारने जनावरांचे बाजार बंद करणे, जनावरांची वाहतूक न करणे असे निर्णय प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घेतले हेसुद्धा महत्त्वाचे आणि गरजेचे आहेत.

शेवटचा मुद्दा म्हणजे, लम्पीची लागण दुधातून माणसाला होऊ शकते का? बहुतांश वैद्यकीय तज्ज्ञांनी, अभ्यासकांनी अशी कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले आहे. परंतु तरीही कच्चे दूध पिणे टाळणे उत्तम. कारण पाश्चरायजेशनच्या प्रक्रियेमध्ये दुधातील विषाणू नष्ट केले जात असल्याने ते दूध पिण्यास निर्धोक असते, हे शास्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. त्यामुळे या आजारामुळे घाबरून जाऊन दूध पिणे टाळण्याचे कोणतेच कारण नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com