कृषी पर्यटनाच्या विस्तारत्या वाटा...

कृषी पर्यटनाच्या विस्तारत्या वाटा...

माणूस गावांमधून बाहेर पडून शहरात रमला तरी निसर्गाच्या जवळ राहण्याची त्याची उर्मी काही कमी झालेली नाही. आजही त्याला सारवलेल्या जमिनीवरचा वावर, चुलीवर शिजवलेले पदार्थ, छोट्याशा घरातले स्नेहपूर्ण अगत्य भावते. हे लक्षात घेता निसर्गाशी जवळीक राखणार्‍या खेड्यांनी, तिथल्या शेतकर्‍यांनी जोडधंदा म्हणून या पर्यटन व्यवसायाचा गांभीर्याने आणि व्यावसायिक दृष्टीने विचार केल्यास मोठे लाभ मिळणे शक्य आहे.

सध्याचा समाज पर्यटनप्रेमी आहे. पायाभूत सुविधांचा विकास, आजूबाजूच्या प्रांताप्रमाणेच दूरदूरचे देश पाहण्याची आणि तिथल्या संस्कृती-सभ्यतेचा अभ्यास करण्याची मानसिकता, नेहमीच्या धावपळीतून चार दिवस निवांत जगण्याचा हेतू असे अनेक विचार वाढत्या पर्यटनामागे आहेत. त्यामुळेच बदलत्या काळात देशांतर्गत पर्यटनाचे क्षितिजही गजबजले असून अनेक दुर्गम पायवाटाही गर्दीत हरवून गेल्या आहेत. ही अनेकार्थाने अनेक उद्योगांना चालना देणारी बाब असून विशेषत: वाढत्या कृषी पर्यटनाकडे पाहण्याची शेतकर्‍यांची दृष्टी अधिक सकारात्मक होण्याची गरज आहे. या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन मिळाले तर शेतीचा एक जोडव्यवसाय म्हणून या ट्रेंडचा चांगला उपयोग करून घेणे सहज शक्य होईल.

आज शहरी व्यक्तीचा काही पिढ्यांपासून ग्रामीण जीवनशैलीशी आणि निसर्गाशी संपर्क नाही. त्यामुळे रांगडा, निर्लेप निसर्ग अनुभवण्याच्या ओढीने त्यांची पावले रम्य गावखेड्यांकडे वळतात तेव्हा तिथे मिळणार्‍या माफक सुविधांमुळेही ते आनंदी होतात. ग्रामीण जीवन, तिथली मोकळीढाकळी दिनचर्या, अजून टिकून असलेली माणूसकी अनुभवण्याचा त्यांचा प्रयत्न असतोच पण याखेरीजही शेतीतील नवे-जुने तंत्रज्ञान पाहणे आणि जाणून घेणेही अनेकांना आवडते. निसर्गाच्या कुशीत विसावणे, साध्या भोजनाचा आस्वाद घेणे, शेतीकामाचा आनंद लुटणे, प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतमाल खरेदी करणे, त्या रम्य वातावरणात विविध खेळांचा आनंद लुटत कुटुंबियांसवे मजा करणे, साखर कारखान्यात जाऊन प्रत्यक्ष साखरेचे उत्पादन होताना पाहणे वा रसापासून गूळ तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया अनुभवणे हे आणि यासारखे अनेक प्रकार सध्या पर्यटकांना भूरळ घालत आहेत. याद्वारे शेतकर्‍यांच्या हाताला शेतीव्यतिरिक्त मोठे काम मिळू लागले आहे. एखाद्या गावाकडे पर्यटकांचा ओघ वाढतो तेव्हा तेथील सेवा व्यवसायाचा कालापालट होण्यास वेळ लागत नाही. अलीकडच्या काळात चर्चेत आलेल्या हुरडा पार्ट्यांच्या रूपाने आपण हे बघू शकतो. म्हणूनच शेतकर्‍यांनी कृषी पर्यटनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

वाईन उद्योग हा कुटीरोद्योगाच्या रूपात पुढे आला. याच धर्तीवर कृषी पर्यटनाची योजना समोर आली आहे. इतर देशांपेक्षा आपल्याकडे या उद्योगासाठी अधिक पोषक वातावरण आहे. याचा फायदा घेण्यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या भागातील निसर्गसौंदर्याचा विचार करून कृषी पर्यटन व्यवसाय म्हणून स्वीकारायला हवा. बालपण ग्रामीण भागात घालवणार्‍यांना गावची सतत ओढ लागलेली असते. शहरात न दिसणारे निसर्गसौंदर्य ग्रामीण भागात अजूनही टिकून आहे. त्यातच प्रत्येक गावची स्वत:ची अशी वेगळी वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणच द्यायचे झाल्यास सातार्‍याजवळील पारगाव-खंडाळा येथून तीन किलोमीटरवर असलेल्या भावशी गावात अद्भूत आणि दुर्मिळ मंदिराकडे पाहता येईल. त्यावर शंकूच्या आकाराचे बांधकाम केले आहे. या बांधकामातील प्रत्येक शंकू सव्वासहा फूट उंचीचा आहे. याचप्रमाणे इतर अनेक ऐतिहासिक तसेच पौराणिक स्थळे आपल्याकडे आहेत. शिवाय ही ठिकाणे ग्रामीण भागात असल्याने त्यांना निसर्गसौंदर्याची जोड आपोआपच लाभली आहे. अशा स्वरुपाची फारशी प्रचलित नसलेली ठिकाणे प्रसार माध्यमांद्वारे जनतेसमोर आल्यास त्यांना भेट देणार्‍यांची संख्या वाढू शकेल.

या स्थानांना भेट देतानाच ग्रामीण जीवनाचे जवळून दर्शन घेण्याची संधीही प्राप्त होते. ग्रामीण भागात आहाराबाबत चोखंदळपणा दिसतो. शहरातील हॉटेलमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ आणि ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ यामध्ये फरक असतो. ग्रामीण भागातील पदार्थ चवीलाही वेगळे लागतात; स्वच्छतेच्या बाबतीत जागरुकता दाखवल्यास नितांतसुंदर परिसर म्हणून ग्रामीण भागातील अनेक गावांचा आपोआप विकास होईल. पाण्याची पुरेशी उपलब्धता असलेल्या आणि हिरव्यागार वनराईने नटलेल्या भागात पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. अशा ठिकाणी भेट देणार्‍यांना ग्रामीण ढंगाचे आगळे-वेगळे जेवण आणि नाश्ता करून दिला तर त्याची चव अनेक दिवस जिभेवर रेंगाळत असते. अशा व्यक्ती ठरावीक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा या जागेला भेट देण्यास उत्सुक असतात. या उत्सुकतेतूनच पर्यटनाला नवी चालना मिळू शकेल, शिवाय हा व्यवसाय ग्रामीण भागात वाढीस लागल्यास त्या भागातील लघुउद्योगांना चांगले दिवस येतील. ग्रामपंचायतीचे उत्पन्नही वाढेल.

शहरातील लोकांची आवड लक्षात घेऊन त्यांना निवांतपणा मिळेल आणि त्या ठिकाणी उत्तम निसर्गसौंदर्य असेल हे कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देणार्‍यांना पाहावे लागेल. नेरळमध्ये चंद्रशेखर भासावळे यांनी गवताच्या झोपड्या उभारल्या आहेत. त्यामध्ये वास्तव्य करणे ही आनंदाची वेगळीच अनुभूती असते. शिवाय परिसरामध्ये बैलगाडीतून तसेच घोड्यावरून रपेट करण्याची व्यवस्थाही आहे. त्या परिसरातील तळ्यामध्ये फावल्या वेळेत मासेमारीही करता येते. हे सर्व वातावरण शहरी व्यक्तींना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी उपलब्ध करून देणारे ठरते. निसर्गसौंदर्याने उपजतच नटलेल्या भागात कृषी पर्यटन एक व्यवसाय म्हणून निश्चितच पुढे येऊ शकतो. महाराष्ट्राला मोठी वनसंपदा लाभली आहे. हिरवीगार जंगले, अभयारण्ये, त्यातील प्राणी, पक्षी अनेकांना ओढ लावणारे ठरतात. हीच गोष्ट सागरकिनार्‍यांची. गोवा किंवा कोकणच्या सागरकिनार्‍याचे आकर्षण नसणारा माणूस विरळाच! याशिवाय ऐतिहासिक वास्तू, किल्ले यांनीही महाराष्ट्राचे वैभव वाढवले आहे. देशी-परदेशी पर्यटकांना आकर्षित करून घेता येईल, असे बरेच काही आपल्याकडे आहे.

अलीकडे पर्यटन संस्कृतीला नवनवीन धुमारे फुटत आहेत. साहसी पर्यटन, पर्यावरण पर्यटन, क्रीडा पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटन अशा नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात येत आहेत. यातच आता कृषी पर्यटनाची भर पडत आहे. अनेकांकडे स्वत:ची दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. त्यामुळे पाहिजे त्यावेळी या निसर्गरम्य स्थळांना भेट देणे सोयीचे झाले आहे. श्रीमंत लोक अशा ठिकाणी आपले फार्म हाऊस बांधत आहेत. सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह या फार्म हाऊसमधील वास्तव्य त्यांना वेगळाच आनंद मिळवून देते. नदीकिनारचा भाग तसेच डोंगराच्या कुशीत आणि घनदाट पर्वतराजीमध्ये छोटी-मोठी फार्म हाऊस स्वरुपाची घरे उभी राहत आहेत. अर्थात, हे सर्व मध्यमवर्गीयांना शक्य नाही. त्यांची अडचण दूर करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुढे यायला हवे. त्यामुळे मध्यमवर्गीयांनाही पर्यटनाचा आनंद घेता येईल, शिवाय त्यामुळे बेभरवशाचा शेती व्यवसाय फायद्यात येऊ शकेल. शेतावर हुरडा पार्टीचे आयोजन करता येते. शिवाय कोजागिरी पोर्णिमा, बैलपोळा आदी सणही निसर्गरम्य ठिकाणी साजरे केले जाऊ शकतात. सर्वसामान्य शेतकर्‍यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. ग्रामीण भागात सारवलेल्या जमिनीवरील वास्तव्य एक वेगळाच अनुभव देते. शिवाय कंदिल तसेच चिमण्यांच्या प्रकाशात रात्र घालवणे, माठातील पाणी पिणे, नदीमध्ये मनसोक्त डुंबणे आणि चुलीवरील गरमागरम भाकरीचा आस्वाद घेणे हे अनेकांच्या आवडीचे विषय आहेत. अशा प्रकारचे पर्यटन सर्वत्र उपलब्ध झाल्यास मिळणारा प्रतिसाद वाढेल आणि त्यातून शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फायदा होईल. शिवाय फारसे भांडवल न गुंतवताही शेती व्यवसाय फायद्यात येऊ शकेल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com