‘डार्ट’ नेमका बसला

‘डार्ट’ नेमका बसला

पृथ्वीवर आदळू शकणार्‍या धूमकेतू-लघुग्रहावर त्याच्यापेक्षा लहान घटकाने मारा केला तर त्याच्या गतीत फरक होऊ शकतो. गतीमध्ये थोडा बदल झाला तरी त्याची पृथ्वीवर येऊन आदळण्याची शक्यता कमी होईल. ही शक्यता लक्षात घेऊनच नासाने ‘डार्ट’ नावाचा प्रयोग केला होता. मागील नोव्हेंबरमध्ये याची सुरुवात केली होती. नुकताच साडेसहाशे किलोचा ‘डार्ट’ हा उपग्रह लघुग्रहावर धडकवण्यात आला. त्यानिमित्त घेतलेला वेध.

माणसाला आधीपासूनच अंतरिक्षातल्या घडामोडींचे विलक्षण अप्रूप आणि कुतूहल राहिले आहे. या कुतूहलापोटीच माणसाने विविध प्रकारे अंतरिक्षातली गुपीते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. काळ पुढे सरकला आणि प्रगत तंत्रज्ञानाची साथ मिळू लागल्यानंतर तर हे काम अधिक वेगाने आणि अचूक पद्धतीने सुरू झाले. आता माणसाची झेप अंतरिक्षातल्या प्रयोगशाळेत मुक्काम करून तिथून महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्याच्या आणि अभ्यास करण्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. अंतराळात नानाविध प्रयोग करण्यात येत आहेत. चंद्र, मंगळावरील माती आणून त्याचा अभ्यास करण्यात येत आहे. तिथे पाणी आहे की नाही, असेल तर ते कोणत्या स्वरुपात आहे, पिके घेण्यासाठी ती जमीन पोषक आहे अथवा नाही, मानवी वसाहत शक्य आहे की नाही अशा एक ना अनेक शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

येत्या काळात या प्रकारच्या अभ्यासाला आणखी गती येणार, यात शंका नाही. म्हणजेच अंतरिक्ष, ग्रहगोल, तारे, उल्का आदींबद्दल अधिकाधिक जाणून घेणे आणि त्यांच्यापासून उद्भवू शकणार्‍या संकटांची पूर्वकल्पना मिळवून पृथ्वी वाचवणे हे खगोल शास्त्रज्ञांपुढील ध्येय आहे. त्यादृष्टीने सतत नवनवीन प्रयोग होत असतात. अमेरिकन अंतराळ संस्थेने (नासा) अंतराळात नुकतीच अशी एक मोठी कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांनी राबवलेले ‘डार्ट मिशन’ यशस्वी झाल्यामुळे अंतराळ अभ्यासातले एक महत्त्वपूर्ण शिखर सर झाले आहे. याअंतर्गत नासाने अंतराळामध्ये 22,500 किलोमीटर प्रतितास या वेगाने एक अंतराळ यान अशनीवर आदळवले. पृथ्वीवर येणार्‍या अशनींची दिशा बदलता येते की नाही, याची तपासणी करण्यासाठी नासाने हा प्रयोग केला होता. ‘डिमॉरफोस’ नामक लघुग्रहावर डार्ट नावाचे हे अंतराळ यान आदळण्याचा नासाचा प्रयोग यशस्वी झाल्याने आता अशनीची कक्षा बदलण्याची तसेच त्यांच्या दिशेत बदल करण्याची शक्यता वास्तवात उतरली आहे, असे म्हणता येईल.

धूमकेतूला शेपूट असते हे आपण जाणतो. त्यापेक्षा छोटे आणि शेपूट नसलेल्यांना अ‍ॅस्टोराईटस् (लघुग्रह) म्हणतात. अंतराळातले काही ग्रह खूप मोठे आहेत. कित्येक ग्रहाचे उपग्रहही आहेत, ज्यांना आपण त्या-त्या ग्रहांचे चंद्र म्हणून ओळखतो. पण त्याव्यतिरिक्तही अंतराळात वर उल्लेख केल्याप्रमाणे काही ग्रह आकाराने खूप लहान असतात. संशोधक या सर्वांचा अभ्यास आणि निरीक्षण करत असतात. पृथ्वी ‘स्विफ्ट टटल’ नावाच्या एका धूमकेतूच्या मार्गातून जाते हे अशाच अभ्यासातून समोर आले होते. पृथ्वी त्याच्या कक्षेत येताना धूमकेतूचे पाठीमागचे कण उल्का म्हणून आपल्याला दिसतात. नोव्हेंबरमध्ये दिसणारा उल्कापात यामुळेच आपल्याला पाहायला मिळतो. मे महिन्यातही याच कारणामुळे आपल्याला उल्कापात बघायला मिळतो. अशा उल्का वा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता असते.

अशी एक घटना सैबेरियात घडली होती. 2013 मध्ये अशा काही घटना चर्चेत होत्या. आपल्याकडील ‘लोणार सरोवर’ अशाच उल्कापातामुळे तयार झाले आहे. थोडक्यात, उल्का वा लघुग्रह पृथ्वीवर आदळले तर होणारे नुकसान प्रचंड असते हे आपण जाणून घेतले पाहिजे. 1994 मध्ये कॉमिट शूमेकर लायव्ही हा लघुग्रह ज्युपिटरवर जाऊन आदळला. अंतराळातली ही घटना सगळ्या खगोल संशोधक आणि अभ्यासकांनी दुर्बिणीच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहिली. याखेरीज या धडकेमुळे ज्युपिटरवर झालेला परिणामही त्यांनी अभ्यासला. अशी एखादी घटना पृथ्वीसंदर्भात घडली तर पृथ्वीवासियांसाठी किती मोठी आपत्ती उद्भवू शकेल, याचा अंदाज त्यांनी बांधला. अशीच एक आपत्ती 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीने झेलली आहे. तेव्हा लघुग्रह धडकल्यामुळे पृथ्वीवर प्रचंड उत्पात घडला आणि डायनासोरसारखे अनेक जीव अस्तंगत झाले.

दुर्बिणीतून धूमकेतू अथवा लघुग्रह बघितल्यास त्यांच्या कक्षा आपल्याला समजू शकतात. त्यावरून हे धूमकेतू वा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार की नाही, हे आपल्याला समजू शकते. पण हे प्रत्येक स्थितीत समजू शकतेच असेही नाही. काहीवेळा अचानक अशा घटना घडू शकतात. मात्र सर्वसाधारणपणे विचार केला तर दोन ते तीन वर्षे आधी टकरीची अथवा अंतराळातला लघुग्रह वा धूमकेतू पृथ्वीवर आदळणार असल्याची पूर्वकल्पना आपल्याला मिळू शकते. हे लक्षात घेऊनच टॉम गेअर्स नावाच्या शास्त्रज्ञाने अथक प्रयत्न केले आणि शास्त्रज्ञ तसेच संशोधकांना अंतराळातल्या या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवावे, असा आग्रह धरला. असा एखादा लघुग्रह आदळणार असेल तर आपण इकडून त्यावर न्यूक्लिअर बॉम्ब टाकावा, त्याचे तुकडे करावे असे अनेक विचार पुढे आले. पण असे केल्यास एका पदार्थाचे बरेच कण तयार होतील आणि त्यामुळे अधिक आपत्तीची शक्यता निर्माण होईल हे शास्त्रज्ञांनी जाणले.

याला पर्याय शोधताना लक्षात आले की, पृथ्वीवर आदळू शकणार्‍या धूमकेतू अथवा लघुग्रहावर त्याच्यापेक्षा लहान घटकाने मारा केला तर त्याच्या गतीत फरक होऊ शकतो. गतीत थोडासा बदल झाला तरी त्याची पृथ्वीवर येऊन आदळण्याची वेळ अथवा शक्यता कमी होईल. ही शक्यता लक्षात घेऊनच नासाने ‘डार्ट’ नावाचा प्रयोग केला होता. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी याची सुरुवात केली होती आणि नुकताच साडेसहाशे किलोचा ‘डार्ट’ हा उपग्रह लघुग्रहावर धडकवण्यात आला. या कक्षेत दोन लघुग्रह होते. त्यातला एक मोठा तर दुसरा लहान असून लहान लघुग्रह मोठ्या लघुग्रहाच्या कक्षेत आहे. ‘डार्ट’ छोट्या लघुग्रहावर धडकवण्यात आला. या धडकेमुळे छोट्या लघुग्रहाच्या गतीमध्ये साधारणपणे दोन ते तीन सेंटीमीटर प्रतिसेकंद इतका फरक होईल, असा अंदाज आहे. सर्वसाधारणपणे लघुग्रहांची गती साडेनऊ ते 11 किलोमीटर प्रतिसेकंद इतकी असते. त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे थोडा फरक झाला तरी पृथ्वीवरील फार मोठा धोका टळू शकतो. पुढच्या दोन-तीन महिन्यांच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांना लघुग्रहाच्या गतीत नेमका किती फरक झाला आहे, हे नेमकेपणाने समजू शकेल. त्यावरून अशा प्रयोगांची पुढची दिशा ठरवणे शक्य होईल.

या प्रयोगामध्ये एक उपग्रह लघुग्रहावर धडकवण्यात आला असला तरी त्यात कोणत्याही स्फोटकांचा वापर करण्यात आला नव्हता. आधी सांगितल्याप्रमाणे स्फोटकांचा वापर करून स्फोट घडवला असता तर खूप मोठी हानी झाली असती. त्यामुळे हा मार्ग टाळण्यात आला. एक गाडी दुसर्‍या गाडीला टक्कर मारते, तशा पद्धतीची ही टक्कर होती. दुर्बिणीच्या सहाय्याने अनेक अभ्यासक, संशोधक प्रत्यक्ष ही घटना घडताना बघत होते. त्याचे फोटो घेतले जात होते. त्यामुळेच पुढचे काही दिवस त्यांचा अभ्यास करण्यात जातील. त्यानंतर काही ठोस माहिती हाती येऊ शकेल. अशाप्रकारे धडक होऊन एखाद्या लघुग्रहाची कक्षा वळवण्यात यश येणे ही खूप मोठी बाब आहे, कारण एकदा कक्षा बदलली की तो उपग्रह कधीच आधीच्या स्थितीत येऊ शकत नाही. याखेरीज त्याच्या गतीत फरक होतो की नाही हेदेखील आपल्याला बघायचे होते, कारण एकदा गतीत बदल झाला तर तो कायमस्वरुपी असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी हीदेखील खूप मोठी गोष्ट म्हणायला हवी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com