आव्हान मुलांना शिक्षणाशी जोडण्याचे!

आव्हान मुलांना शिक्षणाशी जोडण्याचे!

संदीप वाकचौरे (सदस्य, राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समिती सदस्य)

मार्च 2020 ला बंद केलेल्या शाळा मधल्या काही काळाचा अपवाद वगळता पुन्हा सुरू (Schools Reopen) झाल्या आहेत...

शाळा सुरू होत असताना शाळा आणि शिक्षकांसमोर (Teachers) मोठी आव्हाने आहेत. भौतिक अंगाने असलेल्या सुविधा आपल्याला प्राप्त करता येतील, पण मोठे आव्हान मुलांना शिक्षणाशी (Education) जोडण्याचे आहे.

एकतर काही मुले ऑनलाईन (Online Education) स्वरुपात जोडलेली होती. काही मुले मात्र अजिबातच शिक्षणाशी जोडलेली नाहीत. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर पुन्हा यांना समान संपादन स्तरापर्यंत आणणे शिक्षकांसाठी जिकिरीच होणार आहे. मात्र हे काम अशक्य आहे असे नाही.

देशभरातील विविध सर्वेक्षणातील आकडेवारीवर नजर टाकली तर असे दिसते की, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाषिक, गणितीय क्षमता गमावल्या आहेत. 2020 ला पहिलीत असणारे विद्यार्थी आता तिसरीत आले आहेत.

तिसरीतील विद्यार्थी पाचवीत आले आहेत. याकाळात विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता पक्क्या केल्या जात असतात. त्या क्षमतांसाठी सराव केला जातो. प्रत्यक्षपणे कृती करून अध्यापन करणे आवश्यक असते.

त्यामुळे ऑनलाईन स्वरुपातील शिक्षणाने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यास मर्यादा पडल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थी आता शाळेत आल्यानंतर त्यांनी काय गमावले आणि काय मिळवले याचा अंदाज बांधणे आवश्यक ठरणार आहे.

एकतर इतक्या वर्षांनंतर विद्यार्थी (Students) शाळेत येणार आहेत. त्याचा आनंद असेलही मात्र त्यांना शाळेत रमवणे, गुंतवणे हे आव्हान शिक्षकांसमोर असणार आहे. त्यामुळे आरंभीच्या काही दिवसांत शिक्षकांना पायाभूत क्षमतावरती काम करणे आवश्यक असणार आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर पाठ्यक्रम पूर्ण करायचा म्हणून पुस्तकातील आशय सुरू केला तर मुले शिकू शकतील का? याबद्दल शंका आहे. त्यामुळे काही दिवस आनंददायी शिक्षणासाठी गाणी, गोष्टी, विद्यार्थ्यांना अधिक बोलके करणे, त्यांना संवादाकरता अधिक संधी देणे, विद्यार्थ्याची अभिरूची, कल लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

या काळात विद्यार्थ्यांनी बरेच काही अनुभवले आहे. कोणी काय गमावले आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. मुलांच्या मनात मोठी मानसिक भीती आहे. त्यावर मात करण्यासाठी भावनिक भरण करणे महत्त्वाचे आहे.

काही मुलांनी पालकांचा आधार गमावला आहे. तो आधार देणे महत्त्वाचे आहे. भावनिक समायोजन करणे, मुलांना शाळेत रमवणे झाल्यानंतर मुलांच्या अध्ययन स्तर निश्चितीची गरज पडणार आहे.

शेवटी प्रत्येक मूल क्षमतांच्या दृष्टीने कोठे आहे हे जाणून घेण्यासाठी पायाभूत क्षमतांचे मूल्यमापन करावे लागणार आहे. त्यानंतर मुलांना अध्यापन करण्यासाठी द्यावे लागणारे अध्ययन, अनुभवाची बांधणी करताना अधिक सूक्ष्म विचार करावा लागेल.

जोवर पायाभूत क्षमता पक्क्या होत नाही तोवर शिकवण्याचा परिणाम फारसा साधला जाणार नाही. याकाळात अध्ययन अध्यापनासाठी अध्ययन अनुभवातदेखील बदल करावे लागतील. ते अधिक कृतिशील असावे लागणार आहेत. त्यामुळे गरजेप्रमाणे कालावधी निश्चित करून नियोजन करणे महत्त्वाचे.

अपेक्षित क्षमतांचे संपादन झाल्यानंतरच नियमित पाठयक्रमाचा विचार करता येईल. मात्र मुलांसाठी भाषा व गणिताच्या मूलभूत क्षमता प्राप्त करू देण्याच्या दृष्टीने शाळा व शिक्षकांना नेहमीच्या वाटेने चालता येणार नाही त्याकरता नियोजनातही बदल करणे महत्त्वाचे आहे. या सगळ्याचा विचार शिक्षकांना करावा लागणार आहे. नवी आव्हाने पेलतच पुढे जावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.