लोकसाहित्याचा सहवास हवाच

लोकसाहित्याचा सहवास हवाच

दारावर रामप्रहरी येणार्‍या वासुदेवापासून सर्वांनी लोकसाहित्यातून मराठीची जोपासना केली. ती वाढवली. रुजवली. लोकसाहित्य ही लोकमानसाचा वेध घेणारी ज्ञान शाखा आहे. मराठी भाषेच्या जपणुकीसाठी लोकसाहित्याचा सहवास हवाच हवा..

लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक, जाणतो मराठी

एवढ्या जगात माय, मानतो मराठी

ही माझी मराठी ‘माय’ आहे. अशी ‘माय मराठी’ प्राचीन भाषांपैकी एक. तिचे संवर्धन करण्याचे, तिला जपण्याचे काम लोकसाहित्यातून झाले आहे. लोकसाहित्य हा आपला वारसा आहे. तो विसरून चालणार नाही. पहाटे पहाटे येणार्‍या वासुदेवाच्या गाण्यापासूनच त्याची अनुभूती येते. कृष्णगीत, पांडुरंगाचे अभंग, गवळण गाऊन, नृत्य करून लोकांचे मनोरंजन करत गात गात दान मागणारा वासुदेव.

दान पावलं बाबा दान पावलं

वासुदेव आला हो वासुदेव आला

सकाळच्या पारी हरिनामा बोला

असे म्हणत मराठी भाषेचा गोडवा लोकांपर्यंत पोहोचवत मराठीची गोडी समाजात निर्माण करतो. या वासुदेवाप्रमाणे.

शकून जाणून घे माय

असे म्हणत दारावर येणारा पांगुळ किंवा पिंगळाही आपल्या पारंपरिक पद्धतीने शुभचिंतन करून मराठी भाषेचे पवित्र जपत असल्याची जाणीव आज निश्चित होते. तसेच डोहाळ्यापासून बाळाला जोजवत अंगाई गीतापर्यंत शिवाय शेतीवरची कामे, झिम्मा फुगडी, नाच गाणी, लग्नाची गाणी, आदिवासी गीते, निसर्ग गीत, पोतराज, भारूड, गोंधळी, बहुरुपी, वाघ्या मुरळी, श्रमगीते, स्त्रियांची सासर-माहेरसंबंधी गीते या सर्व लोकसाहित्यातून मराठी भाषा जोपासण्याचे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे झाल्याचे दिसून येते.

अरे घरोटा घरोटा

तुझ्यातून पडे पिठी

तसे तसे माझे गाणे

पोटातून येई ओठी

अशा ओव्यांमधूनही मराठी भाषा समृद्ध होत असल्याचे जाणवते. लोकसाहित्यात लोकगीत, लोककथा, लोकनाट्य यांचाही समावेश होतो. लोकसंकेत लोकभ्रम, म्हणी, वाक्प्रचारातून संस्कृतीचे दर्शन घडते. प्रत्येक कलाप्रकार संस्कृतीचा उलगडा करून विचार प्रकट करणारा असतो. स्थानिक कथा, वीरगाथा, लोकगीते, नृत्य, संगीत, कला, कीर्तनकार, शाहीर या सर्वांच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे, मराठीचे संवर्धन झाले म्हणूनच लोकसाहित्य ही लोकमाणसाचा वेध घेणारी ज्ञान शाखा आहे. विनोद हाही लोकसाहित्याचे महत्त्वाचे अंग आहे. पु. ल. देशपांडे यांनी आपल्या विनोदी शैलीत मराठीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

पु.ल. -- व्हता बरोबर आहे की होता?

श्रोता -- अर्थात होता. व्हता चूक आहे

पु.ल. -- व्हता चूक आहे तर नव्हता कुठून आला?

असो. मराठी भाषा म्हणून तिचा अभिमान बाळगून ती हृदयस्थ करावी. त्यासाठी लोकसाहित्याचा सहवास हवाच हवा. प्रत्येक जिल्ह्यात मराठी बोलली जाते. पण ठिकठिकाणच्या बोलीभाषेतील वेगळेपणा जाणून येतो. त्यातील गोडवा, भावूकता, रांगडेपणा हे सर्व जसे दिसून येते त्याप्रमाणे त्या भाषेतील आदरातिथ्यही सर्वांना भावून जाते. भटक्या, आदिवासी, झाडीपट्टीतील बोलीभाषेचेही संवर्धन होणे अतिशय आवश्यक आहे.

सातशे वर्षांपूर्वीपासूनची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायानेदेखील मराठी भाषेचा विकास केल्याचे दिसून येते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज अशा सर्वच संतांनी मराठी अभंगवाणीला आपल्या बोलीभाषेतून जोपासले. तर संत ज्ञानेश्वर माऊलींनी

माझी मराठीचे बोलू कौतुके ।

परी अमृतातही पैजाशी जिंके।

असे म्हणून मराठी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे दाखवून दिले. भाषा ही माणसाला मिळालेली एका अर्थाने जीवशास्त्रीय देणगी आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकडोजी महाराज, संत नामदेव, संत सावता माळी, संत चोखामेळा, समर्थ रामदास, संत निळोबाराय, संत गोरा कुंभार ते संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत वेणाबाई, संत कान्होपात्रा, संत निर्मलाबाई, संत जनाबाई, संत सोयराबाई, संत महदंबा या सर्व संतांनी कोणी ओवी, कोणी भारूड, कोणी श्लोक, कोणी आर्या लिहिले. हे अक्षर साहित्य सर्वांसाठीच मार्गदर्शक आहे.

संत नामदेवांनी

‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’

असे प्रबोधन केले, तर काही कवींनी काळावर भाष्य केले. शाहिरी या प्रकारात नाद व सौंदर्य खुलवले. लोकसाहित्यातून मराठी भाषेचे संवर्धन झाल्याचे दिसून येते. लोकसाहित्याने मराठी भाषा जपली, वाढवली आणि टिकवली.

आजच्या तरुणांनी सकस साहित्याचे वाचन करावे. भाषेचा अभिमान बाळगावा. रोजच्या व्यवहारात मराठी भाषा सक्तीने नव्हे सवयीने वापरायला हवी. लोकसाहित्यातून तिचे संवर्धन झाले असले तरी आज ती पुन्हा लयाला जाताना दिसते. म्हणून तिचे संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी भाषिकाचे काम आहे. त्यासाठीच कविवर्य कुसुमाग्रजांच्या भाषेत म्हणावे लागेल.

परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी!

माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका!

भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे!

गुलामभाषिक होऊनी आपुल्या प्रगतीचे शीर कापू

नका !!!

(लेखिका कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत.)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com